निदान एका मुलीच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, म्हणून...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 08:23 AM2023-03-09T08:23:08+5:302023-03-09T08:27:35+5:30
स्त्रियांच्या मुक्तीची कहाणी संथ गतीने सरकत असली तरी तिचा प्रवास योग्य दिशेने पुढे चालला आहे. तो उलट्या दिशेने मागे फिरलेला नाही.
द्रौपदी मुर्मू,
भारताच्या राष्ट्रपती
लहानपणापासूनच महिलांची समाजामधील स्थिती पाहून मला दु:ख होत असे. एकीकडे एखाद्या मुलीला सर्व बाजूंनी भरपूर प्रेम मिळते, तिचे कोडकौतुक होते, तर दुसरीकडे लवकरच तिच्या लक्षात येते की मुलांच्या तुलनेत तिच्या जीवनात संधी कमी उपलब्ध आहेत. एकीकडे कुटुंबातल्या सगळ्यांकडे लक्ष देणारी, कुटुंब चालवणारी म्हणून स्त्रीची प्रशंसा केली जाते; तर दुसरीकडे कुटुंबाशीच अगदी तिच्या स्वत:च्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तिची भूमिका अत्यंत मर्यादित असते.
गेल्या काही वर्षांत आधी विद्यार्थिनी, नंतर शिक्षिका त्यानंतर समाजसेविका अशा विविध भूमिकांतून वावरताना विरोधाभासाने भरलेल्या प्रश्नांनी मला हैराण केले आहे. विचाराच्या पातळीवर बहुतेक सारेच लोक स्त्री- पुरुष समानतेला मान्यता देतात; परंतु, प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की निम्म्या स्त्रिया बंधनात अडकवल्या जातात. समानतेचा प्रगतीशील विचार अंगीकारला जात असताना सामाजिक पातळीवर मात्र रितीरिवाज आणि परंपरा आपला पिच्छा सोडत नाहीत. ही जगातल्या सर्व स्त्रियांची व्यथा आणि कथा आहे. एकविसाव्या शतकात आपण अनेक क्षेत्रात कल्पनेपलीकडची प्रगती केली आहे, तरीही असे अनेक देश आहेत की जेथे महिला राष्ट्र किंवा सरकारची प्रमुख होऊ शकलेली नाही. जगात असेही कितीतरी देश आहेत, जिथे साधे शाळेमध्ये जाणेसुद्धा मुलींसाठी जीवनमरणाचा प्रश्न होऊन बसतो.
पूर्वापार ही परिस्थिती होती असे नव्हे. भारतात असेही दिवस येऊन गेले जेव्हा स्त्रिया निर्णय घेत असत. आपल्या शास्त्रात आणि इतिहासात अशा अनेक स्त्रियांचे उल्लेख सापडतात ज्या शौर्य, विद्वत्ता तसेच प्रभावी प्रशासन यासाठी ओळखल्या जात. आज पुन्हा एकदा अगणित महिला त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात काम करून राष्ट्रनिर्माणात योगदान देत आहेत. त्या मोठमोठ्या कंपन्यांचे नेतृत्व करतात; सशस्त्र दलातही कामगिरी बजावतात. फक्त त्यांना एकाच वेळी दोन आघाड्यांवर आपली योग्यता, उत्कृष्टता सिद्ध करावी लागते, करिअरमध्ये आणि घरामध्येही! त्या तक्रार करत नाहीत; पण समाजाने याबाबत सहानुभूती बाळगावी, अशी आशा मात्र त्यांना असते.
कनिष्ठ स्तरावर महिलांना चांगले प्रतिनिधित्व आहे; परंतु, जसजसे वर जावे, तसतशी महिलांची संख्या क्रमश: घटलेली दिसते. हे वास्तव राजकीय संस्थांच्या बाबतीतही तितकेच खरे आहे. केवळ शिक्षणाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक आणि राजकीय आत्मनिर्भरता सुनिश्चित करता येत नाही. एका शांतताप्रिय आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी विचारपूर्वक प्रयत्न केले गेले आहेत.
शिक्षण घेणे किंवा नोकरी मिळवणे या बाबतीत स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत खूपच मागे पडतात. त्यांच्या मागे पडण्याचे कारण सामाजिक रुढी-परंपरांमध्ये आहे. देशाच्या विविध भागात अनेक दीक्षांत समारंभांना मी उपस्थित राहिले आहे. संधी मिळाली तर शिक्षण- प्रशिक्षणाच्या क्षेत्रात स्त्रिया पुरुषांना मागे टाकतात हे मी पाहिले आहे. अर्ध्या मानवजातीने म्हणजे पुरुषांनी महिलांना मागे टाकून खूप मोठी प्रगती केली, अशातला भाग नाही. हे असंतुलन संपूर्ण मानवतेचे नुकसान करत आहे. महिलांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेतले तर केवळ आर्थिक प्रगतीच नव्हे पर्यावरणाशी संबंधित गोष्टींतही सुधारणा होतील. स्त्रियांना बरोबरीचे भागीदार केले गेले तर जग अधिक सुखी होईल.
लोक बदलतात हे मी माझ्या जीवनात पाहिले आहे. त्यांचा दृष्टीकोन बदलतो. तसे नसते, तर आपण अजूनही डोंगरकपारीत, गुहांमध्ये राहिलो असतो. स्त्रियांच्या मुक्तीची कहाणी संथगतीने सरकत असली, तरी तिचा प्रवास योग्य दिशेने पुढे चालला आहे. तो उलट्या दिशेने मागे फिरलेला नाही.
एक राष्ट्र म्हणून स्त्री-पुरुष न्यायाच्या भक्कम आधारावर आपण सुरुवात केली हे वास्तवही मला आशादायी वाटते. सुमारे १०० वर्षापूर्वी स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी महात्मा गांधींच्या चळवळीत स्त्रियांना घराचा उंबरा ओलांडून बाहेरच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. तेव्हापासून भारतीय स्त्रियांमध्ये एक चांगले भविष्य निर्माण करण्याची आकांक्षा सातत्याने दिसली आहे. हानिकारक पूर्वग्रह आणि रितीरिवाजांना कायद्याने किंवा समाज- जागरणातून दूर केले जाण्याचा सकारात्मक परिणाम आपण अनुभवतो आहोत. सध्याच्या संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व अधिक आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या राष्ट्रपतिपदी माझ्यासारखी स्त्री असणे हा सशक्तीकरणाच्या कहाणीचाच भाग आहे.
‘मातृत्वात सहज नेतृत्वा’ची भावना जागवण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. प्रगतीशील विचारांशी जुळवून घ्यायला समाजाला वेळ लागतो; परंतु, समाज अखेरीस माणसांचा तयार होतो; ज्यात अर्ध्या स्त्रिया आहेत! प्रगतीला गती देण्याचे काम आपले सगळ्यांचे आहे. म्हणून मी आज आपल्या सर्वांना एक आवाहन करते : तुमचे कुटुंब, कामाचे ठिकाण, आजूबाजूचा परिसर यात एक असा बदल करा; जो एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल, तिच्यासाठी नव्या संधी निर्माण करील!