Atal Bihari Vajpayee Death: अटलजींचे तुकाराम दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 08:22 PM2018-08-16T20:22:58+5:302018-08-16T20:26:26+5:30

Atal Bihari Vajpayee Death: विश्वव्यापी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान समाजोद्धारक आणि तारक कसे आहेत याचे दर्शन भारतवासीयांना घडले. उत्तम राजकारणी, फर्डे वक्ते,  कवी, लेखक आणि विचारवंत  असणा-या अटलजींनी विज्ञान भवनात तुकाराम दर्शन घडविले.

Atal Bihari Vajpayee: Atalji's Tukaram Darshan | Atal Bihari Vajpayee Death: अटलजींचे तुकाराम दर्शन

Atal Bihari Vajpayee Death: अटलजींचे तुकाराम दर्शन

Next

-  विश्वास मोरे

दिल्लीतील विज्ञान भवनात दिनांक ६ फेब्रुवारी २००३ अर्थात वसंत पंचमीचा दिवस. मराठी जणांसाठी अभिमानाचा आणि भाग्याचा दिन अर्थात वारकरी संप्रदायाच्या मंदिराचे कळस संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा नाणे प्रकाशन सोहळा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत रंगला. विश्वव्यापी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान समाजोद्धारक आणि तारक कसे आहेत याचे दर्शन भारतवासीयांना घडले. उत्तम राजकारणी, फर्डे वक्ते,  कवी, लेखक आणि विचारवंत  असणा-या अटलजींनी विज्ञान भवनात तुकाराम दर्शन घडविले. महाराष्ट्रातील वारकरी संस्कृतीचे दर्शन घडले. अवघा भक्तीरंग गहिरा झाला. 
वारकरी संप्रदायाचे पायिक अर्थात तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रयत्नातून २००३ मध्ये वारकरी संप्रदायाच्या मंदिराचे कळस संतश्रेष्ठ तुकाराम महाराज नाणे प्रकाशन सोहळा दिल्लीत झाला. विज्ञान भवनात प्रथमच वारकरी तत्त्वज्ञान आणि  संगीताचे सूर उमटले. वारक-यांना दिल्लीवारी घडविण्याचे पुण्य विखे पाटलांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने केले होते. वसंत पंचमीचा दिवस उजाडला. हा दिवस मराठी जणांसाठी अलौकिक आनंदाचा ठरला. विज्ञान भवनात नाणे प्रकाशन समारंभ सुरू झाला. प्रारंभी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांची अभंगवाणी सादर झाली. 'जय जय रामकृष्ण हरी...' या बीजमंत्राने वातावरणात रंग भरला. त्यानंतर 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी...', असे एकाहून एक सरस अभंगरचना सादर केल्या. अभंगवाणी रंगत असतानाच मुख्य सोहळ्यासाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्या वेळी पंतप्रधानांची छबी टिपण्यासाठी छायाचित्रकार पुढे सरसावले. त्याचवेळी 'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ...' असे वाजपेयी यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सोहळा सुरू झाला, व्यासपीठावर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री बाळासाहेब विखे पाटील, केंद्रीय मंत्री जसवंत सिंह, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते. या सोहळ्यात अटलजींचे सुमारे ३२ मिनिटांचे भाषण झाले. त्यातून एखाद्या संतसाहित्याच्या अभ्यासकालाही ज्ञात नसतील, एवढी तुकोबारायांची रूपे उलगडली. तुकोबाराय समाजमनाशी किती एकरूप झाले आहेत, हे सांगितले. भाषण हे हिंदीत असले तरी तुकोबारायांच्या अभंगांचे दाखले देत विवेचन केले. अटलजींनी आपल्या अर्थपूर्ण, अभ्यासपूर्ण रसाळ वाणीने मंत्रमुग्ध करून सोडले़ सभागृह भारावले होते, प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा कडकडाट होत होता. 
अभंगांचे दाखले देत भारत-पाक संबंध, स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण आदी विषयांवर भाष्य करून तुकाराम दर्शन घडविले.  'महाराष्ट्रातील समस्त वारक-यांना माझा नमस्कार, ज्ञानोबा-तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी...', असे म्हणून अटलजींनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले,'' महाराष्ट्र ही संतांची भूमी. संतांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. अभंगरचना, ओव्यांच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. कडक प्रहारही केला. डोळ्यांत अंजण घातले. ' भेदाभेद भ्रम अमंगळ, 'एकमेका साह्य करूं अवघें धरू सुपंथ...' हा बंधू भावाचा विश्वव्यापकतेचा संदेशही तुकोबारायांनीच दिला. झाडे लावा झाडे जगवा आज आपण सांगतो, त्यासाठी अभियान राबविले जाते. परंतु 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी...' हे तुकोबारायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सांगितले आहे. 
आपल्यावर कोणी अन्याय करीत असेल, अत्याचार करीत असेल, आपल्या स्वातंत्र्यावर कोणी गदा आणीत असेल, हिरावून घेत असेल  त्यावरही उपाय तुकोबारायांनीच दिला आहे. ' भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणो काठी' त्यामुळे आम्ही होऊन कोणाच्या वाटेला जाणार नाही. पण नाठाळ असतील त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. नाठाळाच्या माथी काठीच हाणा, असे आपल्या संतांनीच आपल्याला सांगितले आहे. संतांचे विचार प्रत्यक्षात आणण्याची गरज भासू नये याचे भान भारतावर हल्ले करणा-यांनी ठेवायला हवे. तुकोबारायांच्या वचनांचे दाखले देत तुकाराम दर्शन घडविले. सरते शेवटी श्रीक्षेत्र देहू-आळंदी आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाचा कार्यक्रम जाहीर केला. आज महाराष्टÑात तीर्थक्षेत्रांचा विकास झाला आहे, त्याची सुरुवात अटलजींनीच केली होती. अटलजींचे तुकाराम दर्शन आणि संतांविषयी व्यक्त केलेला प्रेमभाव, ऋण मराठी जणांच्या चिरस्मरणात राहणार आहे.

Web Title: Atal Bihari Vajpayee: Atalji's Tukaram Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.