अटलजींची टीका विरोधकांनाही भुरळ पाडणारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 03:52 AM2018-08-18T03:52:13+5:302018-08-18T03:52:24+5:30

जो खरा ‘सांस्कृतिक’ असतो, तो कधीच कुणाचे वाईट चिंतित नाही. वाईट बोलतही नाही. अटलजींचे अंत:करण स्वच्छ, नितळ होते. म्हणून त्यांची टीकाही विशिष्ट स्तर जपणारी होती.

Atalji's criticism of the opponents news | अटलजींची टीका विरोधकांनाही भुरळ पाडणारी

अटलजींची टीका विरोधकांनाही भुरळ पाडणारी

Next

- डॉ. शरद कळणावत
(ज्येष्ठ साहित्यिक, यवतमाळ)

अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व अफाट समुद्रासारखे होते. वडवानल, अग्नी पचवूनही पुन्हा हा समुद्र शांत होऊ शकत होता. म्हणूनच देशासाठी कठोर निर्णय घेणारा हा नेता स्वभावाने तेवढाच संयमी म्हणून ओळखला जातो. विरोधकांवर सडकून टीका करतानाही त्यांनी आपल्या शब्दांचा स्तर कधीच खालावू दिला नाही. हल्ली राजकीय पुढाऱ्यांची भाषणे म्हणजे मनोरंजन बनले आहे. याने त्याच्यावर चिखलफेक करायची आणि त्याने याच्यावर, एवढेच सुरू आहे. म्हणूनच टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेतही चार-चार चौकटी ठेवाव्या लागत आहेत. पण राजकारणाच्या ‘चौकटी’ भेदून चर्चा कशी करावी, हे अटलजींकडून शिकण्यासारखे आहे.
मला विद्यार्थीदशेपासूनच अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण. नागपूरच्या सिटी कॉलेजमध्ये शिकत असताना पहिल्यांदा त्यांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. १९५३ मध्ये चिटणीस पार्कवर रात्री त्यांचे भाषण होते. त्यांच्या वक्तृत्वाविषयी अगदी सर्वसामान्य माणसांनाही आकर्षण होते. ज्यांचा राजकारणाशी काडीचाही संबंध नाही, असेही अनेक जण अटलजींना ऐकण्यासाठी आले होते.
त्यावेळच्या गलितगात्र झालेल्या काँग्रेसवर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर अटलजींनी टीकास्त्र सोडले होते. पंडित नेहरूंवर, ते विरोधी काँग्रेसचे मुर्धण्य नेते असले तरी, त्यांच्यावर शंकराचे रूपक करण्याची उदारता अटलजींच्या ठिकाणी होती. ते म्हणाले, नेहरूजी की दशा एक शिवजी जैसी हैं. भोलेशंकर अपने दोनो हाथों मे पार्वती का निष्प्राण कलेवर लेकर बेतहाशा दौड रहे हैं. क्या इसमे प्राण फुंके जायेंगे? कभी भी नही. विरोधकाला देवाची उपाधी देण्यासाठी अटलजींसारखे दिलदार व्यक्तिमत्त्वच हवे. आपल्याला काँग्रेसची विचारधारा, धोरणे आवडत नाही, हे सांगण्यासाठी काँग्रेसच्या नेत्याला वाईट शब्दात बोलणे हा पर्याय त्यांनी कधीच निवडला नाही. काँग्रेसला निष्प्राण पार्वती म्हणताना त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंसाठी शिवशंकराचे रूपक वापरले. नेमकी हीच भाषा आजच्या राजकीय पुढाºयांनी गमावलेली आहे. पुढच्या काळात इंदिरा गांधींचा गौरव करताना अटलजींनी त्यांना ‘दुर्गा’ म्हटले, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. पण ही त्यांची संस्कृतीच होती. चिटणीस पार्कवरील राजकीय सभा आटोपल्यावर आमच्या सिटी कॉलेजमध्येही त्यांचे भाषण झाले. पण विद्यार्थ्यांसमोर दीड तास बोलताना त्यांनी राजकारणाला साधा स्पर्शही केला नाही. त्यांचा विषय होता, उत्तर प्रदेशातील हुंडा प्रथा. ते म्हणाले, उत्तर प्रदेश की जो कन्याए अविवाहित रहती हैं, उस का कारण यह नही की उन मे गुण नही होते. सच कहू तो गुण के ग्राहक नही होते. अटलजींची ही शैली अशिक्षितांनाही भुरळ पाडणारी होती. ज्यांच्यावर ते टीका करायचे, त्या विरोधकांनाही टीकेची ही पद्धत प्रिय वाटायची, हे विशेष.
अटलजींनी आयुष्यभर उमदेपणा सोडला नाही. निष्कलंक चारित्र्य, असामान्य नेतृत्व आणि अजातशत्रुत्व हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यामुळेच विरोधकांनाही त्यांच्याकडे बोट दाखवायला जागा उरली नाही. १३ दिवसात अटलजींचे सरकार पाडल्याचे दु:ख विरोधकांनाही व्हावे, इतका त्यांचा चांगुलपणा पराकोटीचा होता. हा चांगुलपणा जपण्यासाठी नुसता नेता असून चालत नाही. आधी तो चांगला माणूस असावा लागतो. अटलजी हे असेच निर्लेप, निरलस ‘माणूस’ होते. विद्यार्थीदशेपासून आजपर्यंत हा माणूस माझ्या आठवणीत कधीच छोटा झाला नाही. स्वातंत्र्यलढ्यात अटलजींप्रमाणे अनेक जण सहभागी होते. पण त्यातले अनेक नंतर चळले. अटलजी मात्र शेवटपर्यंत कुठल्याही पाशात अडकले नाहीत. व्यक्ती वेगळा आणि पक्ष वेगळा. अटलजी आदरणीय होते आणि आदरणीयच राहतील.
राजकारणात येण्याऐवजी अटलबिहारी वाजपेयी सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रात रुळले असते, तर ते संत म्हणून ओळखले गेले असते. संतत्वाची सारी वैशिष्ट्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. केवळ राजकारणात आहेत, म्हणून त्यांना संत म्हणणे अनेकांना अवघड वाटेल. मात्र ते सत्पुरुष होते, हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य आहे. आजच्या राजकारणात त्यांच्या तोडीचा ‘माणूस’ दुसरा दिसत नाही. मला अटलजी आणि नेहरूजी सारखेच वाटतात. कुणाविषयी दुराग्रह न ठेवता जे करायचे ते अगदी प्रामाणिकपणे करायचे, ही त्या दोघांचीही पद्धत. राजकारणी म्हणून त्यांची काही धोरणे चुकू शकतात, पण त्यांच्या प्रामाणिकतेविषयी शंकाच नाही.
जो खरा ‘सांस्कृतिक’ असतो, तो कधीच कुणाचे वाईट चिंतित नाही. वाईट बोलतही नाही. अटलजींचे अंत:करण स्वच्छ, नितळ होते. म्हणून त्यांची टीकाही विशिष्ट स्तर जपणारी होती. पण आजच्या राजकारणी मंडळींनी हा स्तर पार धुळीस मिळविला आहे. एकाचे मोठेपण दाखविताना दुसºयाला खुजे दाखविण्याची स्पर्धा लागली आहे. एखादा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असला तरी राजकीय नेते तेथे एकमेकांना चिमटे काढण्याची हौस सोडत नाही. त्यांच्या टीकाही नुसत्या टीका न राहता गरळ बनते. पण राजकीय चर्चांमध्ये ‘लोक’ हा केंद्रबिंदू ठेवायचा असेल, तर अटलजींच्या दर्जेदार टीकेची आठवण ठेवणे अत्यावश्यक आहे.
 

Web Title: Atalji's criticism of the opponents news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.