दलित युवकांच्या हाती झेंडा कोणाचा, आठवलेंचा की प्रकाश आंबेडकरांचा ?
By सुधीर महाजन | Published: January 17, 2019 11:57 AM2019-01-17T11:57:33+5:302019-01-17T11:59:37+5:30
पण एक गोष्ट नाकारता येत नाही, ती अशी की, महाराष्ट्रातील सामान्य दलित या दोघांवरही मनापासून प्रेम करतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात परवा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सभेत गोंधळ झाला. गेल्यावर्षीसुद्धा असाच प्रकार घडला होता. यावेळी मिलिंद शेळके यांनी प्रकाश आंबेडकरांना उद्देशून अपशब्द वापरताच समोरचा जमाव क्षणात उठला आणि दगडफेक, खुर्च्यांची मोडतोड सुरू झाली. आठवलेंच्या या सभेला पाच-सात हजारांची गर्दी असावी. यांना आपण आठवले समर्थक किंवा त्यांच्यावर प्रेम करणारी म्हणू शकतो, तर याठिकाणी प्रकाश आंबेडकरांविषयी आरोप होताना हा जमाव संतप्त का झाला ? खरे तर हा प्रश्न आहे; पण एक गोष्ट नाकारता येत नाही, ती अशी की, महाराष्ट्रातील सामान्य दलित या दोघांवरही मनापासून प्रेम करतो.
प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेबांच्या वारशाची प्रभावळ आहे. त्याच्या जोडीने बाबासाहेबांनी सुरू केलेला समतेचा लढाही तितक्याच निष्ठेने ते लढतात. दुसरीकडे रामदास आठवले हे वादळ वडाळ्याच्या सिद्धार्थ होस्टेलमधून महाराष्ट्रभर पसरले. पूर्वीच्या पँथरची झलक आजही दिसते; पण या माणसाने आयुष्यभर कार्यकर्ता जपला आणि उभा महाराष्ट्र अनेकदा पिंजून काढला. हे त्यांचे बलस्थान म्हणता येईल. आजही आठवले मुंबई-दिल्लीपेक्षा देशभर फिरताना दिसतात. महाराष्ट्रात दलित समाज व्यापक अर्थाने या दोघांच्या नेतृत्वाखाली विभागला गेला. तसा एक रिपब्लिकन ऐक्याचा प्रयोग झालाच होता आणि या ऐक्याने रा.सू. गवई, जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले हे चार खासदार निवडून आले होते. या ऐक्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा होता, त्यांनी उपोषणही केले होते. सारा दलित समाज एकवटला, तर ती प्रभावी ‘व्होट बँक’ होईल आणि आपल्याला काँग्रेस किंवा भाजप गृहीत धरणार नाही, ही त्यामागची भूमिका होती; पण वैयक्तिक अहंकारातून हे ऐक्य विस्कटले आणि आंबेडकरांनी आपली वेगळी वाट चोखाळली, गवई काँग्रेसकडे गेले, तर आठवले राष्ट्रवादीच्या तंबूत सामील झाले. ऐक्याच्या अशा चिरफळ्या उडाल्या.
प्रकाश आंबेडकरांनी दलित-वंचितांना एकत्र आणून मतपेटीची मोळी बांधत ‘अकोला पॅटर्न’ला जन्म दिला. यातून दशरथ भांडे पुढे बहुजन महासंघाशी युती करून मखराम पवार, केराम, अशी मंडळी विधानसभेत पाठविली, तर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळविली. दलित-वंचितांच्या मतांची व्होट बँक तयार करीत आता एमआयएमशी युती करून ती विस्तारण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांचा हा प्रवास चालू असताना आठवले राष्ट्रवादीसोबत होते. पुढे ते भाजप-शिवसेनेसोबत गेले आणि सेनेने उमेदवारी नाकारताच भाजपची सोबत केली. या दोघांमध्ये कोणताही तात्त्विक वाद नाही, तर अहंकार आणि सत्ता ही दोन महत्त्वाची मुद्दे त्यांच्या मतभेदांचे आहेत. दोघांनाही अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे.
परवा आठवलेंच्या सभेत युवकांची संख्या जास्त होती. गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडी सध्या युवकांमध्ये चर्चेचा विषय आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या चर्चांचे विषय आहेत मॉबलिचिंग, गुजरातमधील उना हत्याकांड, नयनतारा सहगल यांच्या भाषणावरून उठलेले वादंग, इंडियन हिस्ट्री काँग्रेस ऐनवेळी रद्द होणे. या सगळ्या घटना संवेदनशील असल्याने युवकांमध्ये चर्चा होणे साहजिक आहे. यातून भाजप सरकारविरुद्धची नाराजी वाढताना दिसते. त्याची ही प्रतिक्रिया दिसते. आठवलेंचे भाजपशी साटे-लोटे त्याला कारणीभूत आहे. कारण बाबासाहेबांनंतर रिपब्लिकन पक्षाचे राजकारण भरकटले. रा.सू. गवई यांनी जी ‘काँग्रेस लाईन’ पकडली होती तिचा विस्तार राष्ट्रवादी, भाजप असा प्रवास करीत आठवलेंनी त्याचा विस्तार केला. आंबेडकर दलित-वंचितांची मोट बांधून मतपेटीचे राजकारण करताना दिसतात; पण आजवरच्या त्यांच्या राजकारणात निळू फुले, जयदेव गायकवाड, लंकेश्वर गुरुजी, नीलम गोऱ्हे ते बंडू प्रधान, रतन पंडागळे, के.बी. मोरे सारखे साथीदार का दुरावले, याचाही विचार करावा लागेल. आठवलेंचे राजकारण सत्तेच्या साथीने चाललेले दिसते. नवा युवक कोणाचा झेंडा हाती घेणार, हे आता स्पष्ट होईल.
- सुधीर महाजन