गंडस्थळावरच हल्ला
By admin | Published: January 3, 2016 10:54 PM2016-01-03T22:54:02+5:302016-01-03T22:54:02+5:30
भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पंजाबातील पठाणकोटच्या हवाई अड्ड्यावर पाच अतिरेक्यांनी केलेला हल्लादेखील देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या गंडस्थळावरील हल्लाच मानला गेला पाहिजे
भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पंजाबातील पठाणकोटच्या हवाई अड्ड्यावर पाच अतिरेक्यांनी केलेला हल्लादेखील देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या गंडस्थळावरील हल्लाच मानला गेला पाहिजे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास हा हल्ला चढविला गेला व त्यामागे जैश-ए-महम्मदचा हात असल्याचा भारताच्या संरक्षण दलाचा कयास आहे. हल्ला चढविणारे अतिरेकी मारले गेले असले तरी त्यात काही भारतीय अधिकारीही शहीद झाले आहेत. हल्ला होण्यापूर्वी पंजाबातून एका पोलीस अधिकाऱ्याचे ज्यांनी अपहरण केले त्यांचाच या हल्ल्यात हात असल्याचेही सांगितले गेले आहे. अपहरण झाल्यानंतर संबंधितांचा मागमूसही लागू नये आणि हल्लेखोर तीन दिवसांपासून त्या परिसरातच फिरत होते अशीही जी एक माहिती दिली गेली आहे ती तर आणखीनच गंभीर आणि संरक्षण सज्जतेमधील उणिवा अधोरेखित करणारी आहे. भारतीय जवानांनी अतिरेक्यांना ‘मुँहतोड जबाब’ दिल्याची केन्द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची प्रतिक्रिया जवानांचे मनोधैर्य वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त असली तरी, असा जबाब देण्याची वेळच का यावी, हा यातील महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा केव्हा असे अतिरेकी हल्ले होतात तेव्हा दोन मुद्दे हिरीरीने मांडले जातात. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सुरळीत होण्याने ज्यांचे मनसुबे उधळले जाऊ शकतात अशा व्यक्तींचे वा संघटनांचे हे कार्य आहे आणि संबंध सुधारले जाऊ नयेत म्हणून खुद्द पाकिस्तानचे लष्करच अतिरेक्यांच्या मदतीने असे उद्योग करीत असते. यातील पहिला मुद्दा आपणच आपले सांत्वन करून घेण्याचा एक प्रयत्न असतो. दुसऱ्या मुद्द्याचा अर्थ आपण पाकिस्तानातील लोकनियुक्त सरकार व लष्कर ही दोन स्वतंत्र अस्तित्वे असल्याचे मान्य करतो. अशा वेळी ‘करारा किंवा मुँहतोड जबाब देंगे’ तो नेमका कोणाला, असा प्रश्न उपस्थित होतो. उभय देशांमधील चर्चेला अपशकुन करण्यासाठी त्या देशातील विघातक शक्ती जाणीवपूर्वक असे घातपाती उद्योग करीत असतात हे मान्य असल्यास ‘अतिरेकी हल्ले आणि चर्चा हातात हात घालून चालू शकत नाहीत’ हे विधान निरर्थक ठरते.