भावना जपताना अभिव्यक्तीवर हल्ला का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 09:46 PM2018-09-19T21:46:04+5:302018-09-19T21:47:14+5:30
समाजात काहींच्या भावना इतक्या नाजूक झाल्या आहेत की, त्या पटकन दुखावतात. त्यामुळे विनोद बुद्धीही अनेकांना अंगलट येते, असे अनेक प्रकरणात दिसून आले आहे.
धर्मराज हल्लाळे
घटनादत्त अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर न्यायालयांनी अनेक निवाड्यांमध्ये भाष्य केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या विचारांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्नही न्यायालयांनी वेळोवेळी रोखला आहे. अशाच एका खटल्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन दिवसांपूर्वी सुनावणी केली. भावना दुखावल्याचे प्रकरण होते. त्यावर भाष्य करताना न्यायमूर्तींनी पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण केले. समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा यावर भाष्य करणे गुन्हा ठरत नाही. किंबहुना इतरांच्या धर्मश्रद्धांना धक्का न पोहोचवता विचार मांडण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य घटनेनेच दिले आहे. महाराष्ट्राला समाजसुधारकांची थोर परंपरा आहे. इतकेच नव्हे संतांनीही अनिष्ठ प्रथांवर कठोर प्रहार केले आहेत. सदाचार, सद्वर्तनाचा पुरस्कार करताना संतांनी समाजाच्या दांभिक मनोवृत्तीचा कायम धिक्कार केला आहे. अनेक अभंग, दोहे अन् एकूणच संत साहित्य अभ्यासले तर अनिष्ठ परंपरांना हद्दपार करण्याचा संदेश त्यातून मिळतो.
आजकाल मात्र भावना विशेषत: धर्मभावना फार लवकर दुखावल्या जातात. राज्य घटनेने प्रत्येकाला धर्माचरणाचे, उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे, त्या चौकटीत राहून कोणी आपले चिंतन, विचार मांडत असेल तर त्यालाही रोखणारे रक्षक निर्माण झाले आहेत. औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी समाजाला अंतर्मुख करणारा निकाल दिला आहे. समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ठ प्रथा यांच्यावर प्रश्न निर्माण करण्याचा अधिकार नागरिकांना आहे. धर्म, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य जसे आहे तसे एखाद्याला निधर्मी असण्याचाही अधिकार आहे. ती व्यक्ती इतरांच्या धर्मश्रद्धांशी सहमत असेलच असे नाही. वैज्ञानिक दृष्टीकोन हेही घटनेने दिलेले एक मूलतत्व आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार करताना ज्या कथित पुराण कथांमुळे अंधश्रद्धा वाढीला लागतील त्यावर भाष्य होऊ शकते. अर्थात चिकित्सा होऊ शकते. अशा विचारांना पायबंद घालणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे.
समाजात काहींच्या भावना इतक्या नाजूक झाल्या आहेत की, त्या पटकन दुखावतात. त्यामुळे विनोद बुद्धीही अनेकांना अंगलट येते, असे अनेक प्रकरणात दिसून आले आहे. व्यंगचित्र वा अन्य साहित्यातून केले जाणारे विडंबनही वादग्रस्त करण्याचे प्रयत्न होतात. कुठल्याही गुन्ह्यामध्ये हेतू हा महत्वाचा आशय आहे. लोकांचे प्रबोधन करणे, त्यांना वैज्ञानिक दृष्टी देऊन सत्याच्या जवळ नेण्याने कुठलाही कायदा भंग होत नाही. एखादी नाट्य वा कलाकृती ही मनोरंजन अथवा मनोरंजनातून प्रबोधनासाठी केली जाऊ शकते. त्यावर आक्षेप असतील तर साहित्याचे उत्तर साहित्याद्वारे अर्थात विचारांचे उत्तर विचारांनी दिले जाऊ शकते. मात्र आज धार्मिक मुद्यांवर बोलणे, लिहिणे अधिक कठीण झाले आहे. २१ व्या शतकात १६ व्या शतकातील संतांचे विचार जरी मांडले तरी भावना दुखावल्याचा एखादा खटला दाखल होऊ शकतो, अशी आजची स्थिती आहे. त्यावेळी विचार मांडणाऱ्या व्यक्तीला हे आपण सांगितले नाही, तर संतांनी सांगून ठेवले आहे, असाच खुलासा करावा लागेल. जो कोणत्याही कसोटीवर मान्य करावा लागेल. या परिस्थितीत स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि मूलभूत हक्कांचे रक्षण करणारी एकमेव व्यवस्था म्हणजे न्याय व्यवस्था आहे. ज्याची प्रचिती औरंगाबाद खंडपीठातल्या याचिकेवरील २० पानी निकालातून पुन्हा आली आहे.