दृष्टीकोन : जगण्याच्या समृद्धीसाठी पुस्तकांची साथसोबत हवी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 03:03 AM2020-06-12T03:03:17+5:302020-06-12T03:03:36+5:30

मी स्वत:देखील बराच काळ पुस्तके जीवनावश्यक असायला हवीत, असा आदर्श विचार पुढे सरकवत राहिलो

Attitude: Books are needed for the prosperity of life! | दृष्टीकोन : जगण्याच्या समृद्धीसाठी पुस्तकांची साथसोबत हवी!

दृष्टीकोन : जगण्याच्या समृद्धीसाठी पुस्तकांची साथसोबत हवी!

googlenewsNext

संजय भास्कर जोशी

जगातील गोष्टी जीवनावश्यक, जीवनसमृद्धीकारक आणि निरूपयोगी अशा तीन गटांत विभागता येतील. प्रत्येकाची व्याख्या सूक्ष्म तपशीलांत निराळी असली तरी बहुतांश बाबतीत ती एकसारखीच असेल. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षा या जीवनावश्यक गोष्टी असतील तर संगीत, साहित्य, कला वगैरे गोष्टी बहुतेकांच्या दृष्टीने जीवनसमृद्धीकारक असतील. लेखक, प्रकाशक, विके्रते या ग्रंथ व्यवसायाशी निगडित लोकांकडून नेहमीच प्रस्तुत केला जाणारा प्रश्न म्हणजे पुस्तके जीवनावश्यक आहेत का, नसतील तर का नाहीत आणि ती कशी जीवनावश्यक करता येतील? यात बहुतेकवेळा पुस्तके जीवनावश्यक नाहीत, आशी प्रच्छन्न कबुली दिलेली असतेच व ती जीवनावश्यक होण्याविषयी पराकोटीची साशंकता असते. अर्थात, पुस्तके जीवनावश्यक व्हायला हवीत, या इच्छेमागे वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वार्थ जसा असतो तसेच आपला समाज बौद्धिक, नैतिक व अभिरूचीच्या दृष्टीने उन्नत व्हावा, ही प्रामाणिक इच्छादेखील असतेच. ती नाकारता येणार नाही आणि तिचा आदर करायला हवा.

मी स्वत:देखील बराच काळ पुस्तके जीवनावश्यक असायला हवीत, असा आदर्श विचार पुढे सरकवत राहिलो; पण या प्रश्नाचा आदर्शवादी आणि व्यावहारिक विचार केला तर पुस्तके जीवनावश्यक ठरविणे अवघड दिसते. कारण ती खरेच जीवनावश्यक झाली तर अनेकांच्या मर्यादित उत्पन्नात अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्याशी झगडा करून आपला वाटा मागू लागतील, आणि ते अडचणीचे ठरेल. मुळात समाधानकारक अस्तित्व (जिवंत राहणे या अर्थाने) सर्वाधिक मोलाचे. तेव्हा यासाठी (अपवाद सोडले तर) ‘जीवनावश्यक’ या शब्दाची मूळ व्याख्याच बदलावी लागेल आणि ती सार्वत्रिक करणे जवळपास अशक्य असल्याने तात्त्विक किंवा व्यावहारिकदृष्ट्या पुस्तके जीवनावश्यक होणे अवघड दिसते. एकदाच हे मान्य करून टाकूया.
मग उरले काय? तर हेच उरले की, ‘पुस्तके जीवनावश्यक नाहीत तर जीवनसमृद्धीकारक आहेत!’
म्हणजे ग्रंथ व्यावसायिक आणि पुस्तकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या सज्जनांनी समाजात हा दुपेडी संदेश अतिशय प्रभावीपणे पसरवायला हवा आहे की -
१. केवळ जिवंत राहणे पुरेसे नाही. आपले जीवन समृद्ध करणे हे प्रत्येकाचे स्वत:प्रती कर्तव्य आहे आणि
२. आपले जगणे समृद्ध करण्यासाठी संगीत, कला याप्रमाणे पुस्तके आवश्यक आहेत.
तर मित्रहो, हा संदेश समाजात प्रभावीपणे पसरवायचे मूलभूत असे ५ मार्ग मला दिसतात, ते असे-
१. लोक आदर्शाला अनुसरतात म्हणजे ऋङ्म’’ङ्म६ ळँी छींीि१ या न्यायाने आपण समाजात ज्यांना प्रेमादराचे स्थान आहे अशा नेते, अभिनेते, खेळाडू, लेखक वगैरे लोकांना या कामात गुंतविले तर अतिशय सकारात्मक परिणाम हाती येतील. उदाहरणार्थ किशोर कदम, सचिन खेडेकर, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, अजिंक्य राहाणे, सचिन तेंडुलकर, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, भालचंद्र नेमाडे, सानिया, रंगनाथ पठारे, मेघना पेठे आदींनी स्वत:च्या प्रभावी शब्दांत या दोन प्रश्नांवर विचार व्यक्त केले, तर जनसमूहावर त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम होऊ शकेल. त्याला भरपूर प्रसिद्धी द्यावी.
२. पुस्तकावर होणारा खर्च अनेकार्थांनी इंग्रजीत ज्याला ‘डाऊन द ड्रेन’ म्हणतात तसा वाया जाणारा नसतो, तर ती कायमस्वरूपी गुंतवणूक असते, हे लोकांना पटवून द्यायला हवे. पुस्तके वडिलांच्या फाटून जाणाºया विजारीसारखी नसतात, तर आईच्या सुती साडीसारखी असतात. तिच्या गोधडीची ऊब नातवंडांपर्यंत पोहोचते.
३. पोस्ट खात्याने म्हणजे पर्यायाने सरकारने पुस्तकांच्या ‘पार्सल’चे दर प्रकाशक आणि पुस्तक
विक्रेते यांच्यासाठी ते निम्मे केले, तर ग्रंथप्रसाराच्या बाबतीत मोठी क्रांती घडू शकेल. कारण गावोगावी पुस्तकाच्या दुकानांअभावी वाचक वंचित आहेत.
४. अनेक ठिकाणी बंद झालेली ग्रंथ प्रदर्शने पुन्हा नव्या जोमाने (शक्य तेथे सरकारी म्हणजे जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या शाळेच्या एखाद्या मोठ्या दालनात शाळेच्या वेळेनंतर) चालू करायला हवीत.
५. सरकारने मराठी विषय सक्तीचा केला आहे, ही सकारात्मक गोष्ट रोजगार आणि संस्कृती या दोन्हीदृष्ट्या अतिशय सकारात्मक आहे, हा संदेश पसरवायला हवा. त्यासाठी लेखकांनी मराठीच्या शिक्षकांसाठी भरीव कार्य करायला हवे. उदाहरणार्थ शाळांना भेटी देणे, शिक्षकांना वाचन साक्षर करणे वगैरे. प्रकाशकांनी आणि शाळांच्या मुख्याध्यापकांनी याबाबतीत पुढाकार घ्यावा.
विचार केला तर असे अनेक मार्ग समोर येतील. जगणे समृद्ध व्हायचे तर नाट्य-संगीत-नृत्य-चित्रपट याप्रमाणेच सर्व कलांचे माहेर असणाºया साहित्याला, पुस्तकांना महत्त्वाचे स्थान द्यायला हवे आहे. आपल्या चिमुकल्या जगण्यात पुस्तके अपार आनंदाबरोबरच एका आयुष्यात अनेक आयुष्ये जगण्याची संधी देतात. प्रत्यक्षात अशक्य असणारे अनेक अनुभव देतात. प्रत्येक नवे पुस्तक आपल्याला ‘फिरूनी नवी जन्मेन मी’ हा अनुभव देते.
म्हणजेच... पुस्तके आपले जगणे समृद्ध करतात. ही जीवनसमृद्धीकारक गोष्ट जगण्याच्या केंद्रस्थानाच्या अधिकाधिक जवळ न्यायला हवी.

(लेखक, समीक्षक व पुस्तक विक्रेते आहेत)

Web Title: Attitude: Books are needed for the prosperity of life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.