दृष्टिकोन - आरोग्याच्या समस्या सोडवण्यास नवतंत्रज्ञानाची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 07:31 AM2019-04-06T07:31:17+5:302019-04-06T07:33:55+5:30
नेमेचि येतो पावसाळा तसेच नेहमी ७ एप्रिलला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य दिवस जाहीर करते.
डॉ.दीपक शिकारपूर
नेमेचि येतो पावसाळा तसेच नेहमी ७ एप्रिलला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य दिवस जाहीर करते. २0१९ चे ध्येय ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ म्हणजे सर्वांना आरोग्य हे आहे. जगभर लोकांना आरोग्याची काळजी ही अन्न, कपडे आणि निवारासारखीच अत्यावश्यक बाब आहे. इथेच आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला मदत करू शकते. आता इंटरनेट, स्मार्टफोन आणि त्यातील अॅप्स यामुळे चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा, वैद्यकीय सल्ला आणि इतर सुविधा रुग्णांपर्यंत तातडीने (किंवा पुष्कळच वेळेत) पोहोचवणे शक्य होते आहे.
लहानसहान खेडेगावांतून डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो तरी शहरांतल्या रुग्णांचीही स्थिती शंभर टक्के चांगली असते असे नाही!
आज स्मार्टफोनमार्फत आरोग्यविषयक असंख्य प्रकारची अॅप्स उपलब्ध आहेत, हृदयाचे ठोके, व्यायामादरम्यान जाळलेले उष्मांक उर्फ कॅलरीज, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, अन्नपदार्थांतील सत्त्वे अशी विविध प्रकारची माहिती या अॅप्समधून वापरकर्त्याला मिळू शकते. अनेकविध अभ्यासांतून आणि सर्वेक्षणांतून स्पष्टपणे दिसले आहे की आजाराचे निदान करण्याची संगणकीय क्षमता पारंपरिक मानवी डॉक्टरांपेक्षा जास्त चांगली आहे आणि या रोगनिदानातील संभाव्य चुकांचे प्रमाण तितकेच कमी आहे!! याला ‘एव्हिडन्स-बेस्ड् डायग्नॉसिस’ असे नाव आहे. किचकट स्वरूपाच्या आजारांचेही निरीक्षण आणि व्यवस्थापन अॅप्सद्वारे करता येते. ‘अॅप-बेस्ड पर्सनल मेडिकेशन’ या संकल्पनेच्या अमेरिका आणि कॅनडातील चाचण्या संपूर्ण यशस्वी झाल्या आहेत! रोगनिदान अधिक अचूक झाल्याचे रुग्णांचेच म्हणणे आहे आणि वैद्यकीय सेवेसाठीच्या त्यांच्या खर्चातही बचत झाली आहे. आता यासाठी ‘डॉक्टर यू’ असा नवा शब्दप्रयोगही रूळला आहे. उदाहरणार्थ मधुमेह म्हणजेच डायबेटिस घ्या. संबंधित रुग्णाला स्वत:च्या व्याधीविषयी जास्तीत जास्त माहिती अचूक आणि वेळेवर पुरवण्याचे महत्त्वाचे काम डायबेटिस अॅप्स करू शकतात. मेंदू आणि विचारप्रक्रि येशी संबंधित आजारांवरही अॅप्स उपयोगी पडू शकतात. ‘अटेन्शन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर’ या आजाराच्या रुग्णाच्या मेंदूतील विशिष्ट भाग उत्तेजित करण्यासाठी व्हिडीओ गेमचा वापर करण्याचा प्रयत्न अकिली इन्टरएक्टिवनामक ‘स्टार्टअप’ने केला असून तो मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे.
रुग्णांची वैद्यकीय माहिती मोठ्या प्रमाणात जमा होत असली तरी यंत्रणेकडून तिचा वापर दरवेळीच अचूकतेने होतो असे नाही. योग्य संयोजनाअभावी तसेच माहितीचा चुकीचा अर्थ लावल्याने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. या प्रक्रियेत संगणकीय बुद्धिमत्तेलाही समाविष्ट केले गेले आहे. सध्या ‘अल्फाबेट’ या ‘गूगल’च्या मूळ कंपनीकडून या बुद्धिमत्तेला कर्करोगाच्या पेशी तसेच डोळ्यातील खराबी ओळखण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. रु ग्णांची माहिती मुख्यत: त्यांच्याकडील स्मार्टफोन आणि त्यांच्या शरीरावरील ‘वेअरेबल इलेक्ट्रॉनिक्स’कडून येत असल्याने संगणकीय बुद्धिमत्तेचेही काम सोपे होणार आहे. नजीकच्याच भविष्यात आपल्या आजारांचे दूरस्थ पद्धतीने अचूक व त्वरित निदान संगणकीय बुद्धिमत्तेद्वारे केले जाण्याची खूप शक्यता आहे. यात प्रशासकीय आणि सुरक्षात्मक काळजी अर्थातच घ्यावी लागेल. कारण सध्याच्या युगात कोणत्याही स्वरूपाची माहिती दिसली की तिचा गैरवापर कसा करता येईल हेच पाहणाऱ्यांचीही (हॅकर्सची) संख्या वाढली आहे. खरे तर या नवतंत्रज्ञानाचा फायदा कुशलतेच्या मध्यम पातळीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे आणि पर्यायाने रु ग्णांना. हे तंत्र वापरून परिचारिका आणि प्रयोगशालेय व्यक्ती म्हणजेच ‘पॅरामेडिकल स्टाफ’ अधिक कार्यक्षमतेने आणि कमी खर्चात काम करू शकणार आहे. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारींचे निदान करून औषधे सुचवण्याचे मूलभूत काम तर ही सॉफ्टवेअर्स नक्कीच करू शकतील. त्यांना पॅरामेडिकल स्टाफची साथ मिळाल्याने रुग्णांच्या तुलनेने छोट्या समस्या चटकन आणि किफायतशीर दरात सुटण्याची शक्यता वाढेल. ही सॉफ्टवेअर्सही विशेषज्ञांची नावे पुरवतीलच. रुग्णाची तब्येत गंभीररीत्या ढासळू लागताच पुढील हालचाली करता येतील. डॉक्टरांचे मत ‘व्हर्चुअल’ मार्गाने मिळवता येईलच. मुख्य म्हणजे यातील बºयाचश्या सेवासुविधा मिळवण्यासाठी रुग्णाला घर सोडून दवाखान्यात जावे लागणार नाही! यामुळे गैरसोय कमी होऊन प्रत्यक्ष औषधोपचारासाठी जास्त वेळ मिळेल.
यामुळे आपल्याकडील ‘घरचा वैद्य’ या संकल्पनेप्रमाणेच ‘तुम्हीच व्हा तुमचे डॉक्टर’ या शब्दप्रयोगाचे शब्दश: प्रत्यंतर येईल, तेही स्मार्टफोन बाळगू शकणाºया सर्वांनाच.
( लेखक संगणक साक्षरता प्रसारक आहेत )