दृष्टिकोन: कोरोना काळात सोने तारण योजनेचा बळिराजाला आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 12:19 AM2020-07-03T00:19:42+5:302020-07-03T00:20:03+5:30
यंदा कोरोनाचा परिणाम राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका व वित्तीय संस्थांवरदेखील झालेला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यापारी प्रतिष्ठाने दोन महिने बंद होते.
मिलिंद कुलकर्णी
कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षीचा कापूस, मका अद्याप घरात पडून आहे. राज्य सरकार, सीसीआय व बाजार समित्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. नगदी पिकांच्या भरवशावर असलेल्या शेतकºयांना ऐन हंगामाच्या तोंडावर आर्थिक चणचण जाणवू लागली आहे. खरीप हंगामासाठी पूर्वतयारी, पेरणीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी पैशांची मोठी आवश्यकता असते. त्यामुळे हाती असलेल्या सोन्याचा त्याला नेहमी आधार वाटत आला आहे. मुलांचे शिक्षण, लग्न, विहीर खोदणे, ट्रॅक्टर घेणे, घर बांधणे अशा कामांमध्ये सोने विक्रीला तो नेहमी प्राधान्य देत आला आहे.
यंदा कोरोनाचा परिणाम राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका व वित्तीय संस्थांवरदेखील झालेला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यापारी प्रतिष्ठाने दोन महिने बंद होते. अनलॉकनंतरही म्हणाव्या तशा हालचाली या क्षेत्रात नाही. कर्जवसुलीसंबंधीच्या निर्णयांमुळे बँकांच्या आर्थिक व्यवस्थापनावर काहीअंशी परिणाम झाला आहे. नवीन कर्जप्रकरणांचे प्रमाण अल्प आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नोकरदार यांना आकर्षित करण्यासाठी पूर्वीच्याच सोने तारण योजनेला नवीन रूप देण्यात आले आहे. व्याजदरात सुमारे तीन टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. परिणामी शेतकरी, व्यापारी, छोटे उद्योजक, नोकरदार या योजनेकडे वळत आहेत.
सोन्याचे आकर्षण पूर्वापार आहे. आभूषणे, विविध वस्तूंची खरेदी प्रत्येकजण आपल्या ऐपतीनुसार करीत असतो. सामान्य माणूस ते अब्जाधीश कोणीही असला तरी त्याला सोन्याचे आकर्षण आहेच. दागिन्यांपासून तर घड्याळे, मूर्ती अशा स्वरूपात सोन्याची खरेदी होत असते. मुला-मुलींच्या लग्नासाठी सोने खरेदी करून ठेवण्याची परंपरा आहे. हेच सोने अडीअडचणीच्या वेळी विकून गरज भागविली जाते. जुने सोने विक्री करताना घट लावली जात असल्याने नुकसान होत असल्याची ग्राहकांमध्ये भावना असते. जळगावातील सुवर्ण बाजारात काही प्रतिष्ठानांनी जुन्या दागिन्यांवर घट न लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, काही प्रतिष्ठाने अद्यापही जुन्या दागिन्यांवर घट आकारत असल्याने सोने विक्री करण्यापेक्षा तारण योजनेचे व्याज परवडत असल्याची भावना अलीकडे ग्राहकांमध्ये रुजू लागली असल्याने त्याचा परिणाम या योजनेला मिळणाºया प्रतिसादामधून दिसून येत आहे.
कोरोनाच्या संकटाने सुवर्ण व्यवसायालादेखील मोठा फटका बसलेला आहे. सुमारे दोन महिने सगळी बाजारपेठ बंद होती. एप्रिल-मे हे दोन महिने लग्नसराईचे म्हणजे सुवर्ण व्यवसायासाठी तेजीचे दिवस असतात. प्रचंड उलाढाल लग्नसराईत होत असते. परंतु, यंदा तसे घडले नाही. अनलॉकनंतरही बहुसंख्य शहरांमध्ये सम-विषम तारखांना बाजारपेठ सुरू असते. त्यामुळे सुवर्ण व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुवर्ण तारण योजना आणि सुवर्ण गुंतवणूक योजना या दोन योजनांवर अधिक भर दिला. या दोन्ही योजनांच्या प्रचार आणि प्रसारावरदेखील जोर दिला जात आहे. तारण योजनेचे फायदे अधोरेखित केले जात असून, त्याला शेतकºयांसोबत नोकरदार, व्यापारी व छोट्या उद्योजकांचा प्रतिसाद लाभत आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यापार क्षेत्रावर परिणाम झाला आहे. उद्योग काही प्रमाणात सुरू झाले असले तरी रेडझोनमधील दुकाने बंद असल्याने उत्पादनांना फारसा उठाव नाही.
मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने उद्योगांमधील उत्पादनावर परिणाम झालेला आहे. किराणा व औषधी दुकानदार सोडले तर अन्य क्षेत्रातील व्यापाºयांपुढे लॉकडाऊनमुळे अडचणी आहेत. वीज बिल, कामगारांचे पगार ही देणी चुकविणे भाग असते. त्यामुळे हे दोन्ही घटकदेखील सुवर्ण तारण योजनेकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. उद्योगातील मंदीचा मोठा फटका नोकरदारांना बसला आहे. वेतनकपातीसह नोकरीवर गंडांतर येण्याचे प्रकार घडू लागल्याने हक्काचे सोने तारण ठेवण्याशिवाय या घटकाकडे पर्याय उरलेला नाही. या पार्श्वभूमीवर व्याजदरात कपात करून राष्टÑीयीकृत, सहकारी बँका आणि वित्तीय संस्थांनी सोने तारण योजनेत सुलभता आणली आहे.
त्यासोबत सोने हा गुंतवणुकीसाठी सर्वांत विश्वासार्ह पर्याय असल्याचा आक्रमक प्रचार सुवर्ण व्यावसायिकांनी सुरू केला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या जागतिक मंदीच्या काळात गुंतवणुकीसाठी पर्याय असलेले समभाग व मुदत ठेवींमधून मिळणाºया परताव्यात घट होत आहे. ही घट ८ ते १८ टक्के असल्याचा दावा करीत सुवर्ण व्यावसायिकांनी सोन्याचे दर गेल्या एक वर्षात १५ हजार रुपयांनी वाढल्याकडे ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. त्यानुसार समभाग, मुदत ठेवीच्या तुलनेत सोन्यातील गुंतवणुकीचा परतावा ४७ टक्क्यांनी वाढला असल्याचा दावा सुवर्ण व्यावसायिकांचा आहे. स्वाभाविकपणे सुवर्ण तारण योजना आणि सुवर्ण गुंतवणूक योजना या दोन्ही योजनांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
(लेखक जळगाव लोकमतचे निवासी संपादक आहेत)