आॅरोविल : आध्यात्मिक समाजनिर्मितीचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 02:42 PM2018-02-26T14:42:34+5:302018-02-26T14:42:34+5:30

‘पृथ्वीवर एक असे शहर असावे, ज्यावर संपूर्ण मानवजातीची मालकी असावी. त्या नगरीचा नागरिक भगवत्-चेतनेचा स्वयं-सेवक असावा. ते अविरत शिकण्याचे केंद्र असावे.

Auroville : The use of spiritual society | आॅरोविल : आध्यात्मिक समाजनिर्मितीचा प्रयोग

आॅरोविल : आध्यात्मिक समाजनिर्मितीचा प्रयोग

Next

- अरुण खोंडे
‘पृथ्वीवर एक असे शहर असावे, ज्यावर संपूर्ण मानवजातीची मालकी असावी. त्या नगरीचा नागरिक भगवत्-चेतनेचा स्वयं-सेवक असावा. ते अविरत शिकण्याचे केंद्र असावे. तेथे संस्कृती, सभ्यता, धर्म, संप्रदाय, जात, वर्ग, देश अशा, माणसाला माणसापासून तोडणा-या भिंती नसतील... ’ हे सारे स्वप्नवत वाटेल, कल्पना भासेल; पण आजपासून ५० वर्षांपूर्वी अशा आध्यात्मिक शहराची पायाभरणी पाँडिचेरीजवळ झाली, त्याचे नाव आॅरोविल-उषानगरी. वैश्विक एकता, सख्य आणि बंधुता यासाठी प्रतिज्ञाबद्ध असलेल्या या नगरीच्या सुवर्णमहोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते.

भारतातीलच नव्हे तर कोणत्याही देशातील खेडेगाव हे जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी एकत्र वास्तव्य करणा-यांचे वसतिस्थान असते. त्यातून पुढे शहरे विकसित होतात, जेथे माणसांच्या सोयी-सुविधांचा विचार होत असतानाच त्यांच्या विकासाला चालना दिली जाते. येथे कुटुंबाच्या पलीकडे जाऊन आपल्या देशाचा, विश्वाचा नागरिक यांच्या सुखाचा विचार होतो. पण हा, प्रगती आणि विकासाचा पूर्णविराम नाही. वैदिक काळापासून आजपर्यंत मानवाच्या सर्वांगीण आणि एकात्म विकासाचा विचार द्रष्ट्यांनी केला. अध्यात्मावर अधिष्ठित समाजनिर्मिती ही त्यांची तळमळ होती, करुणा होती. पाँडिचेरी येथील श्री अरविंद आश्रमाच्या संस्थापक आणि पूर्णयोगी श्री अरविंद यांच्या सहयोगी श्रीमाताजी (मीरा अल्फासा) यांनी पन्नास वर्षांपूर्वी या दिशेने पाऊल उचलले आणि ‘आॅरोविल’ या आंतरराष्ट्रीय नगरीची पायाभरणी झाली.

यापूर्वी जगाच्या पाठीवर समविचारी लोकांनी एकत्र येऊन वसाहती उभ्या केल्याही; पण त्यांचा शेवट स्वैराचार आणि अनागोंदी यात झाला. आध्यात्मिक आधाराशिवाय असे प्रयोग यशस्वी होत नाहीत, हेच यातून स्पष्ट झाले. श्रीमाताजींनी १९५६ साली हे ‘स्वप्न’ पाहिले, ‘‘पृथ्वीवर कोठेतरी असे एक स्थान असावे, ज्यावर कोणतेही राष्ट्र आपला अधिकार सांगणार नाही. येथे सदिच्छा बाळगणा-या आणि प्रामाणिक अभीप्सा (Aspiration) असणा-या लोकांना ‘जगाचे नागरिक’ म्हणून मोकळेपणे राहता येईल. सर्वोच्च सत्याचेच जेथे आज्ञापालन असेल. शांती, एकवाक्यता आणि सुसंवाद यांचे ते स्थळ असेल. शिक्षण हे, असलेल्या क्षमता समृद्ध करण्यासाठी आणि नवीन क्षमता विकसित करण्यासाठी असेल. तेथे अधिकाराची पदे नसतील तर सेवेची पदे असतील. सर्व कला या सर्वांना समान उपलब्ध असतील. धनसंपत्तीवरही सर्वांचा अधिकार असेल. स्पर्धा आणि संघर्षाची जागा सहकार्य आणि बंधुभाव घेतील.’’ श्रीमाताजींचे हे ‘सत्य-स्वप्न’ २८ फेब्रुवारी १९६८ या दिवशी प्रत्यक्षात आले, अवतरले.

युनेस्कोच्या आमसभेने १९६६ साली या नगरीच्या उभारणीला एकमुखाने सक्रिय पाठिंबा दिला. आज आॅरोविलचा मध्यबिंदू असलेल्या ‘मातृमंदिरा’जवळ कमलकलिकेचा आकार असलेले, पुरुषभर उंचीचे दगडी पात्र उभारण्यात आले. २८ फेब्रुवारीला उपस्थित, जगातील १२४ राष्ट्रे आणि भारतातील २३ राज्यांच्या प्रतिनिधींनी सोबत आपल्या देशातील माती (मृत्तिका) आणली होती. सोबत त्यांचे ध्वज होते. प्रत्येक देशातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने ती मृत्तिका त्या पात्रात अर्पण केली आणि एका वैश्विक संकल्पनेचा मंगल-आरंभ झाला. त्यादिवशी पहाटे श्रीमाताजींनी दिलेला संदेश होता, ‘‘आधुनिक मानवासमोरील अडचणींचे प्रतिनिधित्व भारत करीत असून, या अडचणींतून मानवाची सुटका करणारा उद्धारकर्ता भारतच होणार आहे. आणि भारतच मानवाला उच्चतर जीवनाप्रत नेणार आहे.’’ मानवाच्या कल्याणाचा, आत्मविश्वासपूर्ण संकल्प करणा-या, श्रीमाताजींचे त्यादिवशी वय होते अवघे ९० !

आज, २० चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या या आॅरोविल-उषानगरीत (City of Dawn) विविध देशांच्या १३० वसाहती वसल्या आहेत. ५४ देशांतील २८०० नागरिक तेथे कायम वास्तव्याला आहेत. (नियोजित लोकसंख्या ५० हजार). आॅरोविलमध्ये दहा शाळा व नगरीच्या सीमालगत सात शाळा आहेत. दोन आरोग्यकेंद्र दरवर्षी १२ हजार रुग्णांची तपासणी करतात. येथे सौर, बायोगॅस, पवन आणि वाफ यांच्या मदतीने पर्यायी ऊर्जा निर्माण करणारी ५००वर केंद्र आहेत. सौरऊर्जेच्या प्रयोगांची ही जगातील आद्य प्रयोगशाळा समजली जाते. एकेकाळी मैलोन्मैल उजाड पसरलेल्या माळरानावर आॅरोविल नागरिकांनी ३० लक्ष वृक्ष लावले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही नगरी उभारताना कोणालाही विस्थापित केले गेले नाही. उलट त्या खेड्यातील विकासासाठी ८० केंद्र, ३६ शिक्षण केंद्र, ६ आरोग्यकेंद्र कार्यरत आहेत. स्वप्नवत् वाटावी अशी बाब म्हणजे येथे पोलीस नाही. देशा-देशातील नागरिकांचे विभाजन करणारा व्हिसा नाही. आॅरोविलमध्ये ‘पैसा’ हे विनिमयाचे साधन नाही. दैनंदिन गरजांचे आदान-प्रदान होते. हजारो एकर जमिनीवर होणारे पारंपरिक आणि आधुनिक शेती प्रयोग आॅरोविलला तर समृद्ध आणि स्वयंपूर्ण करतातच शिवाय अनेक देशांतील शेतक-यांना मार्गदर्शन करतात.

देश-विदेशातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय आणि वास्तूनिर्मिती क्षेत्रातील विचारवंतांनी आजवर आॅरोविलला भेट देऊन तेथील उपक्रमांचे मुक्त कंठाने कौतुक केले आहे. युनेस्कोच्या आमसभेत पाचवेळा आॅरोविलच्या पाठिंब्याचे ठराव मंजूर झाले. भारताच्या संसदेत १९८८ साली विशेष कायदा पारीत झाला. आणि त्यातून ‘आॅरोविल फौंडेशन’ची स्थापना झाली. मा. डॉ. करणसिंह या फाऊंडेशनचे वर्तमान चेअरमन आहेत. भारताच्या दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे या उभारणीतील योगदान मोठे आहे. जगातील विविध संस्कृतींमध्ये सामंजस्य निर्माण करीत ही नगरी प्रकाश आणि शांतीची नगरी बनावी, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता.
सख्य-सहयोग-सह नागरी जीवनावर आधारित हा दिव्य प्रयोग यंदा आपल्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. विश्वाची रचना पृथ्वी, जल, तेज, वायु आणि आकाश या पाच तत्त्वांनी झाली आहे, असे तत्त्वज्ञान सांगते. यातील पृथ्वीतत्त्वाचा कृतज्ञ सन्मान आॅरोविलमध्ये १९६८ मध्ये वैश्विक समरसतेने झाला आणि आज सुवर्णमहोत्सव (२८ फेब्रुवारी २०१८) जलतत्त्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून होत आहे. त्यावेळी जगभरातून मृत्तिका आणण्यात आली. आणि यावेळी सांस्कृतिक, पौराणिक, भौगोलिक महत्त्व असलेल्या विश्वभरातील १५० वर नद्या, सरोवर, सागर, नद्यांची उगम स्थाने आणि भारतातील सप्तनद्यांचे जल एकत्र करण्यात आले आहे. नव्वद दिवसांपासून हे पाणी आॅरोविलला गोळा होत आहे. जगातील एक आश्चर्य असलेल्या ‘मातृमंदिरा’समोर २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या सुवर्णमहोत्सवाची सांगता जलतत्त्व सन्मानाने होईल. पाणी हे जीवन आहे, सकलांना एकत्र बांधून ठेवणारे तत्त्व आहे. पाण्याला बंधन नाही. त्याने स्वत:ला सीमेत कधीच बांधून घेतले नाही. मात्र ते आज संघर्षाचे कारण ठरत आहे. हे कारणच संपून एकत्व नांदावे, जागृती निर्माण व्हावी म्हणून २८ फेब्रुवारीला पहाटे सामुदायिक ध्यान होईल. खुल्या सभागृहाच्या मधोमध सोन्याचे पात्र ठेवून प्रत्येक देशातील आणि स्रोतातील पाणी, विद्यार्थ्यांच्या हस्ते अर्पण केले जाईल. त्यातील काही अंश मातृमंदिराच्या खाली असलेल्या २१६ पाकळ्यांच्या ‘कमल सरोवरात’ अर्पण केले जाईल. याचवेळी भारत सरकारने तयार केलेल्या नाण्यांचे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन होईल. यातील गंगा-भागीरथीच्या तीर्थाचा कुंभ स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्पण करणार आहेत. ते २५ फेब्रुवारीला खास उपस्थित राहतील.

दोन विश्वयुद्धानंतर मानवता होरपळून निघाली. त्यानंतर जगावर वर्चस्व निर्माण करण्याच्या शीतयुद्धात ‘माणूस’ कोसळत असताना, ‘भारत विश्वगुरु बनेल आणि विश्वाला मार्गदर्शन करेल’, असे भाकीत श्रीअरविंद यांनी केले. या भाकिताला श्रीमाताजींनी आकार दिला. मानवी एकतेला मूर्तरूप देणारे आॅरोविल हे भौतिक आणि आध्यात्मिक संशोधनाचे स्थान होईल, असा द्रष्टा विचार त्यांनी मांडला. आज आॅरोविल चेतना उत्थानाची प्रयोगशाळा बनली आहे. सर्वसमावेशकता आणि समरसता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. त्याला अडसर ठरणाºया जातींच्या भिंती, संप्रदायांचे भेद, संस्कृती संघर्ष यांना विसर्जित करीत त्यांना दैवी चेतनेच्या छत्राखाली श्रीमाताजींनी एकत्र आणले. त्यामुळेच आॅरोविलमध्ये सर्वधर्म, संस्कृती, संप्रदाय, देश, वंश, जाती, उपासना पद्धतीचे नागरिक एकत्र राहतात. तेथे असहिष्णुता नाही तर परस्पर सन्मान आहे. हा सर्वधर्मसमभाव वा समाजवाद नाही तर हा आहे अध्यात्माधिष्ठित समाजनिर्मितीचा भागवत संकल्प.



 

Web Title: Auroville : The use of spiritual society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.