शुभ काळ, अवघ्या दिशा

By admin | Published: March 3, 2017 11:57 PM2017-03-03T23:57:02+5:302017-03-03T23:57:02+5:30

सकाळी सहा-साडेसहाची प्रसन्न वेळ होती. अवघा तो शकुन .... तुका म्हणे हरिच्या दासा।

Auspicious time, just directions | शुभ काळ, अवघ्या दिशा

शुभ काळ, अवघ्या दिशा

Next


सकाळी सहा-साडेसहाची प्रसन्न वेळ होती. अवघा तो शकुन .... तुका म्हणे हरिच्या दासा। शुभ काळ अवघ्या दिशा।। (तु.गा. २१७६) संत तुकारामांच्या कालातीत काव्याने आणि किशोरी आमोणकरांच्या सुरांनी मन चकित झाले तर नवल कसले? आजच्या विज्ञानयुगातसुद्धा आपण शुभ-अशुभ दिवस, लाभी दिशा, मुहूर्त यांचा हळूच शोध घेत असतो. समाजाला या गैरसमजुतींच्या जंजाळातून बाहेर काढण्यासाठी सतराव्या शतकात लिहिलेल्या या ओळी आहेत. तुकाराम बीजेची पहाट या शब्दांनी अधिक उजळ झाली.
जप-तप, भगवी वस्त्रे, कर्मकांड ही भक्तीची वरवरची साधने आपण महत्त्वाची मानतो. यापेक्षा ‘क्षुधेलिया अन्न’ म्हणजे भुकेनी कळवळणाऱ्याची जात, राहणी न पाहता आधी त्याला अन्न द्यायला हवे. जर ‘ईश्वराचा अंश प्रत्येक जिवात आहे’ असे शास्त्रे-पुराणे सांगतात तर हा प्रत्येक जीव समाजाच्या किंवा विश्वाच्या एकाच देहाचा भाग-अंश-अवयव आहे. मग त्यातील एकाला दु:ख, पीडा, वेदना असेल तर ते साऱ्यांचेच दु:ख नाही का? सामाजिक समतेचा हा विचार त्याकाळी संत तुकारामांनी सांगितला. पण प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या आजच्या मानवजातीलाही सामाजिक समता पेलत नाही हे कटुसत्य आहे. संस्कार संपन्न, सदाचारी माणूस घडवण्याचे कार्य निरपेक्षपणे संत करीत होते. सावळ्या, सुंदर विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जाणारे संत अद्वैत तत्त्वज्ञान जाणत होते.
‘कासयाने पूजा करू केशीराजा’ (तु.गा. ३७६८) हा त्यांचा बोलका अभंग पहा. संत तुकाराम यात म्हणतात- तीर्थक्षेत्री स्नान केले; पण मनप्रक्षालन झालेच नाही. केशीराजा ! तुझी पूजा मी कोणत्या साधनांनी करावी? पाण्याने तुला स्नान घालावे तर जीवनाचा निर्माता तूच आहेस. या फुलांच्या सौंदर्याचा आणि सुगंधाचा कल्पक निर्माताही तूच. नागवेलीची सुबक नक्षीदार पाने, क्षत नसणारे धान्य, गळलेल्या मोहरातून वाचलेली फळे, साऱ्यांचे सृजन तर तूच करतोस. राजमुद्रा असणाऱ्या शिक्क्यांची धातू, शेतातील सोनसळी धान्यराशी यांचेही निर्माण त्या जगनियंत्याचेच. संत तुकाराम महाराज म्हणतात, हाती चिपळ्या, गळ्यात वीणा घेऊन नामघोष करत ज्या भूमीवर आम्ही फेर धरतो ती धरती धारण करणाराही तोच. तेव्हा टाळ्या वाजवणारे दोन हस्तक आणि झुकलेले मस्तक याआधारे मी तुझी मानसपूजा करतो. आपल्या पोटच्या मुलांवर जसे आणि जेवढे प्रेम आपण करतो तेवढेच आपल्याकडे सेवारत असणाऱ्यांवर करावे हा माणुसकीचा अमोल संदेश नित्य व्यवहारात आणण्यासारखाच आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात
‘ज्ञानदेवे रचिला पाया....’
तुका झालासे कळस’
हा बहिणाबार्इंनी केलेला गौरवपूर्ण उल्लेख संत तुकारामांच्या अमोल कार्याची ग्वाही देणारा आहे.
-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे

Web Title: Auspicious time, just directions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.