प्रामाणिक मायावती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2016 02:45 AM2016-04-18T02:45:26+5:302016-04-18T02:45:26+5:30
उत्तर प्रदेशच्या मतदारांनी सत्तेत येण्याची पुन्हा संधी दिली तर आता आपण स्मारकांचे नव्हे तर विकासाचे राजकारण करु असा शब्द देऊन त्या राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन
उत्तर प्रदेशच्या मतदारांनी सत्तेत येण्याची पुन्हा संधी दिली तर आता आपण स्मारकांचे नव्हे तर विकासाचे राजकारण करु असा शब्द देऊन त्या राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी त्यांच्यातील प्रामाणिकपणाचे दर्शन घडविल्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. त्या राज्यातील मागासवर्गीय आणि अल्पसंख्यक यांना आधीच्या साऱ्या सरकारांनी सापत्नभावाने वागविले पण आपण ते चित्र बदलून टाकू असा शब्द देऊन व त्याच्या जोडीला आणखीही काही प्रयोग करुन मायावती सत्तेत आल्या होत्या. परंतु त्या संपूर्ण सत्ताकाळात त्यांनी केवळ स्मारकांचेच राजकारण केले व राज्याच्या तसेच या ‘बिछड्या वर्गा’च्या विकासाकडे ढुंकूनदेखील बघितले नाही असाच त्यांच्या या ताज्या अभिवचनाचा अर्थ निघतो. ते अभिवचन देतानाही आपण विकासाचे ‘राजकारण’ करु असेच त्यांनी म्हटले आहे. देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी हेच अभिवचन देऊन सत्तेत आले होते पण देशात विकासाचा कणदेखील सापडत नाही असा त्यांच्या विरोधकांचा त्यांच्यावर आक्षेप आहे. आपण उत्तर प्रदेश राज्याच्या तर भाग्यकर्त्या आहोतच पण दलितांचे भाग्य बदलणेदेखील आपल्याच हाती असल्याचा त्यांचा दावा असून त्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे. जाती-पातीचे राजकारण इतरानी केले तर ते पाप आणि आपण केले तर ते पुण्यकर्म हा दांभिकपणा सर्वच राजकीय पक्षात ठासून भरलेला असल्याने भाजपाने तिथे निवडणूक प्रभारी म्हणून एका दलित नेत्याची नियुक्ती केल्यावरुन मायावती यांनी भाजपालाही ठोकून काढले आहे. भाजपाने एखाद्या दलिताला मुख्यमंत्री वा अगदी पंतप्रधान जरी केले तरी तो समाजाचे भले करु शकणार नाही कारण तेव्हां तो दलित न उरता संघाच्या मुशीतील जातीयवादी ठरेल असे मोठे मनोज्ञ विश्लेषणदेखील मायावती यांनी केले आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी अन्य मागासवर्गातले असूनही त्यांनी देशाचे असे काय भले केले असा रोखठोक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. अर्थात असाच प्रश्न त्यांनादेखील विचारला जाऊ शकतो. पण त्याचे उत्तर त्यांनी आधीच देऊन टाकले आहे. स्मारकांचे राजकारण!