कीर्तनकारांचा परिवर्तनाचा टाळ

By admin | Published: May 21, 2016 04:44 AM2016-05-21T04:44:34+5:302016-05-21T04:44:34+5:30

कीर्तन ऐकून कुणी सुधारला नाही व तमाशा पाहून कुणी बिघडला नाही

Avoid the change of keertankara | कीर्तनकारांचा परिवर्तनाचा टाळ

कीर्तनकारांचा परिवर्तनाचा टाळ

Next


कीर्तन ऐकून कुणी सुधारला नाही व तमाशा पाहून कुणी बिघडला नाही, हे वाक्य महाराष्ट्राच्या समाजजीवनात वारंवार उच्चारले जाते. आपल्या अध्यात्मिक क्षेत्राने या वाक्याला खरे तर आक्षेप नोंदविणे अपेक्षित होते. पण, तसा तो नोंदविला न गेल्याने एकप्रकारे कीर्तनातून काही सुधारणा घडत नाहीत या गृहीतकाला आपण मान्यताच देऊन बसलो आहोत. पुण्यात आजपासून सुरू होत असलेल्या पाचव्या मराठी संत साहित्य संमेलनात मात्र हे गृहीतक मोडण्याच्या दृष्टीने काही पावले पडणार आहेत.
नगर जिल्ह्यातील ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे हे या वर्षीच्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. वारकरी हा शेतकरी आहे, हे सूत्र घेऊन हे संमेलन त्यांनी पूर्णत: दुष्काळग्रस्तांना समर्पित केले आहे. या संमेलनात होणारे सर्व परिसंवाद दुष्काळ, शेती, पाणी, शेतकरी याच विषयांशी निगडित आहेत.
तनपुरे मूळचे दगडवाडीचे. त्यांचे वडील कुशाबा तनपुरे म्हणजेच ‘तनपुरे महाराज’ हे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून परिचित होते. ‘जेथे कीर्तन करावे, तेथे अन्न न सेवावे’ हा वसा त्यांनी आयुष्यभर जपला. गाडगेबाबांचे ते शिष्य. साने गुरुजींना पंढरपुरातील उपोषणात त्यांनी सहाय्य केले. व्यसनमुक्ती, पशुहत्त्याबंदी याबाबत काम करतानाच दुष्काळात माणसांसाठी भाकरी व पशुधनासाठी वैरण पाण्याची सोय करण्याची मोठी मोहीम त्यांनी आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून राबविली. नाम सप्ताहातून राष्ट्रभक्ती व स्वातंत्र्यांचे संस्कार रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ‘देवभक्ती’ व ‘राष्ट्रभक्ती’ यांची सांगड त्यांच्या कीर्तनाने घातली. कीर्तनाच्या माध्यमातून चालणारे त्यांचे काम पाहून तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद ते इंदिरा गांधी यांच्यापर्यंत बहुतांश राष्ट्रीय नेते हे त्याकाळी तनपुरे महाराजांना भेटले होते. १९५३च्या दुष्काळात नगर जिल्ह्यातील माही जळगाव येथे त्यांनी सुरू केलेल्या दुष्काळी केंद्राला पंडित नेहरुंनी भेट दिली. त्यावेळी पंडित नेहरुंच्या गळ्यात त्यांनी ओल्या हरभऱ्याचा हार घातला व हातात भाकरी पिठल्याचा प्रसाद दिला. नेहरुंनीही मोठ्या आनंदाने तो सेवन केला. ‘ऐसे महात्मा और होंगे तो भारत बदलेगा’ असे नेहरू त्यावेळी म्हणाले होते.
आज तर महाराष्ट्रात २५ हजार कीर्तनकारांची फौज आहे. ठरविले तर हे सर्व कीर्तनकार- प्रवचनकार महात्मा बनू शकतात. गावात लोक ग्रामसभेला जमत नाहीत. पण, कीर्तन-प्रवचनाला हजर असतात. सार्वजनिक कामासाठी लोकसहभाग लवकर जमत नाही. पण, धार्मिक सप्ताहाची वर्गणी देण्यासाठी लिलावात बोली लागते. हा सगळा पैसा व शक्ती जलसंधारणाच्या कामात एकत्र आली तर महाराष्ट्राचे चित्र बदलू शकते. हाच विचार आता बद्रीनाथ तनपुरे यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सुरू केला आहे. कीर्तनकारांनी ठरवून जलसंधारणाचा अभंग सेवेत घेतला, तर आपण दुष्काळ हटवू शकतो. त्यासाठी प्रत्येक कीर्तनकाराने एक गाव दत्तक घ्यावे, असे आवाहन ते करणार आहेत. स्वत:चे दगडवाडी गाव दत्तक घेऊन या अभियानाचा ते प्रारंभ करणार आहेत.
‘बुडता हे जन न देखवे डोळा’ ही संतांची भूमिका होती. ती भूमिका आता कीर्तनकारांनी वठवावी असे वारकरी परिषदेचेच म्हणणे आहे. तुकाराम महाराजांनी ‘मढें झाकूनिया करिती पेरणी, कुणबियाचे वाणी लवलाहे’ म्हणजे प्रसंगी घरात मढे झाकून ठेवून कुणबी पेरणी करतो, असे शेतकऱ्याच्या कर्तव्याचे धाडसी वर्णन केले. हेच शेतकरी व गावे परिवर्तनाचे टाळ हाती घेऊ शकतात. मात्र त्यासाठी कीर्तनकारांना प्रबोधनाची वीणा गळ्यात बांधावी लागेल. राज्य दुष्काळाने होरपळत आहे. अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यातील तीन गावांनी भजन-कीर्तनासाठी ९० लाख रुपये जमविल्याची बातमी कानावर आली. एवढा देवभोळेपणा आजच्या महाराष्ट्राला कसा परवडेल?
- सुधीर लंके

Web Title: Avoid the change of keertankara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.