दृष्टिकोन- ‘मानस मित्र’च्या माध्यमातून ‘अंनिस’कडून जनजागृती मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 01:27 AM2020-04-18T01:27:20+5:302020-04-18T01:27:36+5:30

परिणाम करीत आहेत. उद्याविषयीची अनिश्चितता, माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आलेली अनेक बंधने, आर्थिक ताण आणि सततच्या खºया-खोट्या बातम्या... या

Awareness campaign from 'Annis' through 'Manas Mitra' | दृष्टिकोन- ‘मानस मित्र’च्या माध्यमातून ‘अंनिस’कडून जनजागृती मोहीम

दृष्टिकोन- ‘मानस मित्र’च्या माध्यमातून ‘अंनिस’कडून जनजागृती मोहीम

Next

डॉ. प्रदीप जोशी ।

कोरोनाच्या कहराने संपूर्ण जगच हादरले आहे. या पिढीतील कोणीही एवढे मोठे सार्वजनिक संकट बघितलेले नसावे. निदान जाणत्या वयात तरी. अशावेळी कोरोनामुळे येणारे शारीरिक आजाराचे संकट आणि कोरोना टाळण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या खबरदारीचे उपाय, या दोन्ही गोष्टी लोकांच्या मनावर विपरीत

परिणाम करीत आहेत. उद्याविषयीची अनिश्चितता, माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आलेली अनेक बंधने, आर्थिक ताण आणि सततच्या खºया-खोट्या बातम्या... या समस्यांमुळे प्रचंड ताण समाजात दिसत आहे. कोरोनाच्या महामारीचे हे एक महासंकट आहे. म्हणजे ज्याला डिझास्टर म्हणतात तसे.
अशाप्रसंगी केवळ शारीरिक मदत पुरेशी पडत नाही. शारीरिक काळजी घेणे तर आवश्यक आहेच; पण ते पुरेसे नाही. कारण खचलेल्या मनाला उभारी देण्याचे काम कोणाला तरी करावे लागणार असते. मन खंबीर असेल तर या संकटाला यशस्वीपणे तोंड देण्याची ताकद समाजात निर्माण करावी लागते. महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्र्मूलन समिती ‘मानस मित्र’ हा प्रकल्प गेली सुमारे दहा वर्षे राबवत आहे. याचा उद्देश समाजात मानसिक आजारांविषयी जे अज्ञान आहे, अंधश्रद्धा व गैरसमज आहेत ते दूर करण्याचे कार्य करणाºया स्वयंसेवकांची फळी निर्माण करणे हा आहे. या माध्यमातून आम्ही असे अनेक मानस मित्र कार्यकर्ते आणि संघटनेतील मानसोपचार तज्ज्ञांच्या सहाय्याने तयार केले आहेत. याचेच एक ठळक उदाहरण म्हणजे चाळीसगाव येथे उभी राहिलेली मानस मित्रांची फळी. या मानस मित्रांचे आम्ही १२ ते १५ सेशन्समध्ये प्रशिक्षण घेतले. मानसिक आजार कसे ओळखावे, प्राथमिक स्तरावर ते कसे हाताळावे, बुवाबाजीकडे न जाता योग्य उपचारांकडे त्यांनी कसे वळावे याबरोबरच उपचार चालत असताना आणि नंतरही पेशंट व नातेवाईकांना कसा आधार द्यावा, याचे त्यांना प्रशिक्षण दिले. यातूनच चाळीसगाव येथील बामोई बाबाच्या दर्ग्यावर अंधश्रद्धांमुळे येणाºया अनेक मनोरुग्णांना मोफत तपासणी आणि उपचार करण्यासाठी डॉ. दाभोलकर मानसिक आधार केंद्र आम्ही गेली सात वर्षे चालवित आहोत. त्यातून अनेक मनोरुग्ण अंधश्रद्धांच्या अघोरी संकटातून मोकळे झाले आहेत. तशाच प्रकारे या महामारीच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण महाराष्टÑात अशी मानस मित्रांची फळी उभी केलेली आहे. आमच्या सुमारे ८० कार्यकर्त्यांनी या कामासाठी उत्साह दाखविला आहे. या सर्वांचे आम्ही आॅनलाईन

प्रशिक्षण घेतले आहे. या सर्वांना महासंकटाचे मानसिक दुष्परिणाम काय होतात, अशा लोकांची मन:स्थिती काय काय होऊ शकते, ती कशी ओळखावी, त्यांना धीर कसा द्यावा, अफवा आणि वास्तव यांची त्यांना जाण कशी करून द्यावी, अधिक गंभीर आजार कसे ओळखावेत, त्यांना योग्य मदतीसाठी मार्गदर्शन कसे करावे, याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले. एकूण ८० कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षणात भाग घेतला. संपूर्ण महाराष्टÑातून या कार्यकर्त्यांचे आम्ही पाच विभाग केले आहेत. मुंबई व परिसर, पश्चिम महाराष्टÑ, मराठवाडा विदर्भ व खान्देश. प्रत्येक गटात साधारण दहा ते वीस मानस मित्रांचा सहभाग होता. या प्रत्येक गटाचा एक प्रमुख नेमण्यात आला आणि त्या सर्वांना मिळून मानसोपचारांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. सोबत काही स्थानिक डॉक्टर आणि मनोविकार तज्ज्ञांचेही सहकार्य घेण्यात आले. या सर्व मानस मित्रांचे अनुभव चांगले आहेत. अनेक मानसिक आजार असलेल्या लोकांचे त्यांना फोन येऊ लागले. गोपनीयतेचे त्यांना आश्वासन देण्यात आले होते. स्वत:ची ओळख द्यायची असेल तर द्या, नाहीतर नका देऊ, असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे सर्वचजण अतिशय मोकळेपणे बोलत होते. अनेक वयस्क मंडळींमध्ये चिंतेचे वातावरण दिसले. वयस्करांना असा हा आजार झाल्यास मृत्यूचे प्रमाण जास्त असते. अशा बातम्यांमुळे ते घाबरलेले होते. काहींची मुले परदेशात किंवा दुसºया गावात अडकलेली होती. त्यांच्या काळजीचे निराकरण करण्यात आमचे मित्र यशस्वी झाले. काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनिश्चिततेने, काही जणात घरातच रहावे लागल्याने वेळ कसा घालवावा, याचे मार्गदर्शन करावे लागले. काही फोन तर असे होते की, नवरा-बायको, मुले २४ तास घरात असल्याने आपापसात खटके उडण्याचे प्रमाण वाढले होते. तिथे संपूर्ण कुटुंबाशी बोलून मार्गदर्शन करता आले. काही जणांना आधीचा मानसिक आजार होता. त्याची लक्षणे या ताणामुळे वाढली होती. त्यांना योग्य मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला. कोणतेही सामाजिक काम करताना काही विकृत लोकांकडून
वाईट अनुभव येतातच. तसा एखादा अनुभव आलाही
पण अशावेळी सर्व संघटना एकत्रित येऊन पोलीस
आणि सायबर गुन्हा शाखेच्या सहाय्याने अशा
वितुष्ठांचा बंदोबस्तही करण्यात आला आहे. एकूण सर्व ८० मानस मित्रांचा अनुभव अतिशय चांगला आहे.
त्यांंचे काम जोमाने चालू आहे. यातूनच पुढे वेगवेगळ्या प्रकारे हा मानस मित्र प्रकल्प अधिक प्रगत स्वरूपात
विकसित करण्याचा आमचा निर्धार आहे. मानसिकतेविषयी समाजात असलेले अज्ञान, अंधश्रद्धा आणि तुटपुंजे मानसिक स्वास्थ्य याला ते चांगले उत्तर आहे, असे आम्हाला वाटते.

( लेखक मनोविकार तज्ज्ञ आहेत )
  

Web Title: Awareness campaign from 'Annis' through 'Manas Mitra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.