भन्नाट मस्क! स्टारशिपचे तुकडे त्यांना मनोरंजन वाटले!
By Shrimant Mane | Updated: January 18, 2025 09:03 IST2025-01-18T09:03:48+5:302025-01-18T09:03:59+5:30
स्टारशिप या महाकाय रॉकेटच्या अपघाताने इलॉन मस्क यांच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला खोडा घातला; पण तरीही ते खचलेले नाहीत.

भन्नाट मस्क! स्टारशिपचे तुकडे त्यांना मनोरंजन वाटले!
- श्रीमंत माने
(संपादक, लोकमत, नागपूर)
स्टारशिप या तब्बल पाच हजार टन वजन व चारशे फूट उंच महाकाय राॅकेटला मेक्सिकोच्या सामुद्रधुनीत पुढच्या प्रवासासाठी धक्का देऊन सुपरहेवी नावाचा बूस्टर पुन्हा पृथ्वीच्या दिशेने परत फिरला. तुफान आग ओकत वेगाने दक्षिण टेक्सासच्या कॅमेरून काउंटीतील बोका चिका येथील स्पेसएक्सच्या स्टारबेस स्थानकाकडे येऊ लागला. बहुचर्चित उड्डाणाचा रोमांच अनुभवणाऱ्या हजारोंच्या नजरा त्यावर खिळून होत्या. कारण, गेल्या ऑक्टोबरप्रमाणेच यावेळीही हा बूस्टर जिथून निघाला त्या लाँचपॅडवर परत येणार होता. लाँचपॅडवरील मोठाले यांत्रिक बाहू स्वागताला सज्ज होते. काही क्षणात सुपरहेवी बाहुपाशात सामावून घेतला गेला.
टाळ्यांचा कडकडाट झाला. ही करामत ऑक्टाेबरमध्ये घडली असतानाच, ताशी १३ हजार २४५ किलोमीटर या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या कक्षेबाहेर निघालेल्या स्टारशिपच्या अप्पर स्टेजमध्ये स्फोट झाला. उड्डाणानंतर नवव्या मिनिटाला, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १४५ किलोमीटर अंतरावर स्टारशिपचे तुकडे-तुकडे झाले. अजस्त्र राॅकेटचे ते जळते तुकडे आकाशातून कोसळताना आसमंत उजळून निघाला. एरव्ही ही आतषबाजी मनमोहक ठरली असती. तथापि, गुरुवारी पहाटेचा हा एक अपघात होता. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला या अपघाताने खोडा घातला.
या अपघाताने उत्तर व दक्षिण अमेरिका खंड जोडणाऱ्या भागात विमानसेवा विस्कळीत झाली. तरी बरे उड्डाणावेळी विमाने इतरत्र वळविण्यात आली होती. काही फेऱ्या लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. राॅकेटच्या पुन:पुन्हा वापराची सोय करणारी, पर्यायाने अंतराळ मोहिमांचा खर्च कमी करणारी इलॉन मस्क यांची ही मोहीम जगभर चर्चेत आहे. स्टारशिप राॅकेटची ही सातवी चाचणी होती. आधीच्या पाचव्या चाचणीत, गेल्या ऑक्टाेबरमध्ये यशस्वी बूस्टर कॅच मेकॅनिझमने जग अचंबित झाले होते. आणखी एखादी चाचणी घेऊन थेट मंगळाकडे झेप घेण्याची मस्क यांची योजना आहे.
इलॉन मस्क हे विक्षिप्त वाटावेत इतके मस्त कलंदर व्यक्तिमत्त्व आहेत. अपयशही कसे साजरे करावे हे जगाने त्यांच्याकडून शिकावे. अटलांटिक महासागरातील टर्क्स अँड केकस बेटांवर स्टारशिपचे तुकडे-तुकडे झाले. मोहीम अपयशी ठरली. तेव्हा दुसरा कोणी असता, तर अब्जावधी रुपये मातीत गेले, म्हणून दु:खी झाला असता. काही तरी परंपरागत छापाची प्रतिक्रिया दिली असती. इलॉन मस्क मात्र भन्नाट आहेत. ते म्हणाले - सक्सेस इज अनसर्टन, बट एंटरटेन्मेंट इज गॅरंटीड!
या तात्पुरत्या अपयशाने इलॉन मस्क अजिबात निराश होणार नाहीत. ट्विटर विकत घेताना कितीतरी अडचणी आल्या होत्या. तीन-साडेतीन लाख कोटी रुपयांची जुळवाजुळव करून त्यांनी जिद्दीने तो साैदा केलाच. भविष्याचा वेध घेऊन स्पेसएक्स कंपनी त्यांनी सुरू केली. आता, नासापेक्षा अधिक अंतराळ मोहिमा ही खासगी कंपनी काढते. डोनाल्ड ट्रम्प हे मस्क यांचे मित्र आहेत आणि ट्रम्प आता जेरड् आयझॅकमन अब्जाधीशांकडे नासा सोपवतील, असे बोलले जाते.
गेल्या २४ तासांत अंतराळ विज्ञानाशी संबंधित तीन मोठ्या घटना घडल्या. भारताने काल अंतराळवीर चंद्रावर पाठविण्याच्या, स्वत:चे अंतराळ स्थानक उभे करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. दाेन छोटे उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असतानाच एकमेकांशी जोडण्याची कामगिरी इस्रोने फत्ते केली. डाॅकिंग-अनडाॅकिंग तंत्र अवगत करणारा भारत जगातला चाैथा देश बनला. यानंतर काही तासांत अमेझाॅनचे जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीने न्यू ग्लेन हे अजस्त्र राॅकेट यशस्वीरीत्या अंतराळात पाठविले. सात इंजिनांचे हे राॅकेट ३२० फूट उंचीचे आहे.
अमेरिकेच्या पहिल्या पिढीतील अंतराळवीर जाॅन ग्लेन यांचे नाव आणि पन्नास वर्षांपूर्वी नासाने मरिनर व पायोनियर ही याने फ्लोरिडातील ज्या केंद्रावरून अंतराळात पाठविले तिथूनच न्यू ग्लेनचे प्रक्षेपण अशी इतिहासाशी सांगड घालण्याचा प्रयत्न बेझोस यांनी केला. इलॉन मस्क यांनी बेझोस यांनी जाहीरपणे काैतुक केले. स्टारशिपच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर बेझोस यांच्याकडून अशाच काैतुकाची अपेक्षा इलॉन मस्क करीत असावेत.
shrimant.mane@lokmat.com