अयोध्या : सांस्कृतिक सौहार्दाचा इतिहास!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 12:51 AM2020-08-05T00:51:02+5:302020-08-05T00:51:26+5:30
अयोध्येत आता राम मंदिराच्या निर्माणाची सुरुवात झाली आहे. अयोध्या ऊर्फ साकेत हे स्थान रामपूर्व काळापासून भारताच्या सांस्कृतिक/ राजकीय इतिहासात महत्त्वाचे राहिलेले आहे. येथेच वेदपूर्व समन संस्कृती बहराला आली.
संजय सोनवणी
अयोध्येत आता राम मंदिराच्या निर्माणाची सुरुवात झाली आहे. अयोध्या ऊर्फ साकेत हे स्थान रामपूर्व काळापासून भारताच्या सांस्कृतिक/ राजकीय इतिहासात महत्त्वाचे राहिलेले आहे. येथेच वेदपूर्व समन संस्कृती बहराला आली. नाभी व जैनांचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथांनी येथूनच राज्य चालविले. भारताचे नाव भारतवर्ष होण्यापूर्वी नाभीवर्ष होते. भारताचा सांस्कृतिक इतिहास पाहिला तर रामकथेच्या पूर्वीच हे स्थळ समन संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे बनले होते. जैन धर्माचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथ ?व अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ व अनंतनाथ यांचा जन्म अयोध्येत झाला. इक्ष्वाकु वंशातील श्रीरामाचा काळ पौराणिकदृष्ट्या त्यानंतरचा. ऋषभनाथ व अजितनाथ या वेदपूर्व ऐतिहासिक व्यक्ती होत्या, असे मत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व अनेक विद्वानांनी सिद्धही केले. बौद्ध साहित्यानुसार गौतम बुद्धांनी आठ वर्षे अयोध्येत वास्तव्य केले होते. जैनांचे रामायणही प्रसिद्ध असून, त्यांनी रामासही आपले मानले होते असे दिसते. वैदिक धर्माच्या आगमनानंतर रामाचेही वैदिकीकरण झाल्याचे दिसते. हिंदू, जैन, बौद्ध धर्मांच्या दृष्टीने अयोध्या महत्त्वाची राहिली व सर्वांनीच या ना त्या रूपात रामाचा स्वीकार केला.
राम मंदिराचे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत की नाहीत, यावर वाद आहेत. असे असले तरी हे स्थळ रामजन्मभूमीच अशीही श्रद्धा आहे. मुळात मंदिरे बांधण्याची संस्कृती फार उशिराची. पहिल्या शिवमंदिराचा नाणकीय पुरावा कुनिंद नाण्यावर मिळतो तो इ.स.पू. दीडशेमधील. तत्पूर्वी बौद्ध व जैन विहार, स्तूप, लेण्यांचे अस्तित्व मिळते. हिंदू देवतांची प्रतीके व प्रतिमाही सर्वत्र मिळतात; पण मंदिरे नाहीत. वैदिक धर्मात प्राचीन काळी मूर्तिपूजा निषिद्ध असल्याने इंद्र-वरुणादींची मंदिरे असण्याचा प्रश्नच नव्हता. अयोध्येत वादग्रस्त जागेवरील १९७६ मध्ये केलेल्या उत्खननांत पुरातत्वविद बी. बी. लाल यांना मृण्मयी जैन प्रतिमा मिळाली होती. या प्रतिमेचा इतिहास इ.स.पू. चवथे शतक निघाला. तेथे नाणी, प्रतिमा मिळाल्या, त्यांचा संबंध राम, सीता वा दशरथाशी असल्याचे सूचन मिळत नाही, असा त्यांचा निर्वाळा आहे. असे असले तरी यावरून रामजन्मही अयोध्येला झाला नाही असा निष्कर्ष काढता येत नाही. हिंदू श्रीरामाला भारतातील वैदिकांसह सर्व धर्मसंस्कृतींनी आपलेसे केले. अयोध्येचा इतिहास अपवाद वगळता सांस्कृतिक सौहार्दाचा राहिला आहे.
अहिल्यादेवी होळकरांनी अयोध्येत राम मंदिरासह चार मंदिरे बांधली, तेव्हा अयोध्येवर आसिफौद्दुला अमानी याचे राज्य होते. १७३६मध्ये अयोध्येच्या मुस्लिम सुभेदाराचा दिवान केसरी सिंगने अयोध्येत जन्मलेल्या पाच तीर्थंकरांची पाच मंदिरे उभारली. अयोध्या नावाचा अर्थच आहे ‘जेथे युद्ध केले जात नाही अशी भूमी’. नगरी फक्त आमचीच असा कोणी दावा करणे सांस्कृतिक सहजीवनाच्या इतिहासावर अन्याय करणारे आहे. जैनांनी आपली तत्त्वधारा पाळत वादग्रस्त जागेवर दावा केलेला नाही. बौद्धांनीही दाव्यात कडवेपणा येऊ दिला नाही. याचे भान ठेवत सांस्कृतिक सौहार्दाच्या इतिहासाचे नव्याने पुनरुज्जीवन केले पाहिजे.
(लेखक इतिहास संशोधक आहेत, पुणे)