अराजकाची नांदी

By admin | Published: December 22, 2014 05:42 AM2014-12-22T05:42:21+5:302014-12-22T05:42:21+5:30

विकास आणि परिणामकारक प्रशासन’ अशी प्रगतिशील कार्यपत्रिका घेऊन देशाचा राज्यकारभार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या संघ परिवाराच्याच बेबंद व बेछूट वक्तव्यांनी आणि कारवायांनी उद्विग्न झाले

Azure | अराजकाची नांदी

अराजकाची नांदी

Next

विकास आणि परिणामकारक प्रशासन’ अशी प्रगतिशील कार्यपत्रिका घेऊन देशाचा राज्यकारभार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या संघ परिवाराच्याच बेबंद व बेछूट वक्तव्यांनी आणि कारवायांनी उद्विग्न झाले आहेत. देशाच्या राजधानीत आपल्या निकटवर्तीयांशी बोलताना ‘संघाचे लोक यापुढे असेच वागणार असतील तर आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊ’ अशी थेट धमकीच त्यांनी त्या परिवाराला दिली आहे. निरंजन ज्योती, गिरिराज सिंग, प्रवीण तोगडिया, सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी यांच्या अस्थानी व अविवेकी वक्तव्याने बेजार झालेल्या पंतप्रधानांनी त्यांना आधीच आपले वर्तन व वक्तव्य सुधारण्याची तंबी दिली आहे. त्यातल्या काहींनी ती गंभीरपणे घेऊन आपल्या तशा वागण्यात काहीसा बदलही अलीकडे केला आहे. परंतु पंतप्रधानांचे धमकावणे हा नुसताच हवेतला बार असल्याचे ज्यांना वाटले त्यांनी आपल्या वर्तनात जराही बदल न करता पंतप्रधानांनाच वाकुल्या दाखविणे सुरू केले आहे. तसे करणाऱ्यांत राजस्थानच्या एका बेजबाबदार मंत्र्यापासून थेट विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवार यातलीच ज्येष्ठ मंडळी सामील झाली आहे. प्रल्हाद गुंजाळ या राजस्थानच्या आमदारावर अशा बेजबाबदार वर्तनासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी निलंबनाची कारवाई केली. या गुंजाळाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा त्याच्यावर आरोप होता. मात्र गुंजाळावर कारवाई करणे आणि विश्व हिंदू परिषदेच्या तोगडियांवर किंवा रा.स्व. संघाच्या मोहन भागवतांवर ती करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मोदींची भाषा विकासाची व गुड गव्हर्नन्सची आहे तर संघ परिवारातील या मंडळींची भाषा राम मंदिर, ३७० वे कलम, धर्मांतर किंवा घरवापसी अशी धर्मसंबद्ध आहे. ही भाषा उघडपणे देशात दुही माजविणारी आहे. या देशात हिंदूंची संख्या ८० टक्के असली तरी इतर समाज २० टक्के आहेत. त्यांची संख्या २६ कोटी एवढी आहे. हा वर्ग अल्पसंख्य असल्याने संघटित पण स्वत:ला असुरक्षित मानणारा आहे. हिंदुत्वाच्या आक्रमक प्रचारामुळे व सामूहिक धर्मांतरे घडविण्याच्या संघ परिवाराच्या धमक्यांमुळे तो स्वत:ला जास्तीचा असुरक्षित मानू लागला आहे. एखादा समाज व वर्ग स्वत:ला असा असुरक्षित वाटून घेऊ लागला, की तो कोंडीत अडकलेल्या मांजरासारखा हिंसक व बेभान होतो. एकेकाळी पंजाबातील शिखांचा एक मोठा वर्ग जर्नेलसिंग भिंद्रानवाले या तथाकथित संताच्या नेतृत्वात असा बेभान व हिंस्र झालेला देशाने पाहिला आहे. ही पाळी संघ परिवाराचे लोक देशातील २६ कोटी लोकांवर उद्या आणणार असतील तर या देशातील अल्पसंख्यच नव्हे तर बहुसंख्यकही सुरक्षित राहू शकणार नाहीत. त्या स्थितीत गुड गव्हर्नन्स नाही आणि विकासही असणार नाही. संघ परिवाराच्या आताच्या आक्रमक कार्यपद्धतीमुळे नरेंद्र मोदींचा विकास कार्यक्रमच अडचणीत आला आहे. मोदी विकासाखेरीज दुसऱ्या विषयावर बोलत नाहीत. धर्म, जात, पंथ, धर्मविस्तार, धर्मांतर किंवा अल्पसंख्य वा बहुसंख्य अशी भाषाही ते बोलत नाहीत. ते स्वत: संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत. मात्र आता त्यांच्यावर असलेली जबाबदारी देशाच्या नेतृत्वाची आहे. त्यांना केवळ हिंदूंनाच आपल्यासोबत ठेवून चालणार नाही. या देशातील मुसलमान, ख्रिश्चन, बुद्ध, शीख, जैन व पारशी अशा साऱ्यांनाच सोबत घेऊन हा देश समोर न्यायचा आहे. सारांश संघाची वाटचाल दुहीची तर मोदींची जबाबदारी ऐक्याची आहे. संघ ही धार्मिकदृष्ट्या एकारलेली संघटना आहे. भारत हे हिंदुराष्ट्र आहे असे म्हणत तिला देशातील इतर धर्मांतील लोक घरवापसीच्या नावाखाली हिंदू धर्मात आणायचे आहेत. धर्म ही नागरिकांची जन्मदत्त निष्ठा आहे. ती सोडायला कोणी सहजासहजी तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांचे धर्मांतर कुठे सक्तीने तर कुठे प्रलोभनाने घडवून आणण्याची संघाची तयारी आहे. ही बाब भारताच्या धर्मनिरपेक्षता या घटनादत्त मूल्याचा अवमान करणारी तर आहेच शिवाय ती देशातील शांतता व सुव्यवस्था नाहीशी करणारीही आहे. काही काळापूर्वी ‘लव्ह जिहाद’ किंवा ‘मिट जिहाद’ अशी चिथावणीखोर भाषा संघ परिवारातील शाखांकडून वापरली गेली. आताचा तिढा त्याहून मोठा व पुढचा आहे. नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याच्या धमकीमुळे संघ परिवार शांत होईल अशी शक्यता कमी आहे आणि तो तसाच आक्रमकपणे वागत राहिला तर मोदी शांत राहतील याचीही शाश्वती कमी आहे. सारांश, संघ परिवारात बहुदा प्रथमच उभा राहिलेला हा बेबनाव व तिढा आहे. याकडे काँग्रेससह व इतर धर्मनिरपेक्ष पक्ष कुतूहलाने व काहीशा शंकेने पाहत आहेत. एक गोष्ट मात्र खरी, संघाने त्याचे आक्रमकपण असेच जारी ठेवले तर देशात नक्कीच अराजक माजेल.

Web Title: Azure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.