बा आणि बापू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 07:28 AM2018-10-02T07:28:34+5:302018-10-02T07:29:26+5:30
राष्ट्रपिता म. गांधींची १५० वी जयंती व कस्तुरबांची ७५ वी पुण्यतिथी यांचं स्मरण करीत देश व जग आज त्या पुण्यशील दाम्पत्याला अभिवादन करणार आहे.
राष्ट्रपिता म. गांधींची १५० वी जयंती व कस्तुरबांची ७५ वी पुण्यतिथी यांचं स्मरण करीत देश व जग आज त्या पुण्यशील दाम्पत्याला अभिवादन करणार आहे. २ आॅक्टोबर १८६९ हा बापूंचा तर ११ एप्रिल १८६९ हा बांचा जन्मदिवस. बा बापूंहून सहा महिन्यांनी वडील होत्या. त्यावरून त्यांच्यात विनोदी वाद झडत. बा म्हणायच्या, ‘मी तुमच्याहून वडील असल्याने तुम्ही माझे ऐकले पाहिजे’ तर बापूंना त्यांचे वडील असणे कधी मान्यच झाले नाही. बापू बॅरिस्टर तर बा निरक्षर होत्या. वयाच्या १३ व्या वर्षी झालेल्या त्यांच्या विवाहानंतर बापूंनी बांना साक्षरतेचे धडे देण्याचा प्रयत्न केला. पण बांनी त्यांना दाद दिली नाही. पुढे १९४२ च्या आंदोलनानंतर आगाखान पॅलेसमध्ये कारावास भोगत असताना बापूंनी त्यांना भूगोल शिकवायला घेतला. पण ‘कलकत्त्याची राजधानी लाहोर असल्याचे’ त्यांचे उत्तर ऐकताच ब्रिटिश साम्राज्याशी झुंज देणाऱ्या या महात्म्याने त्यांच्यापुढे तत्काळ शैक्षणिक शरणागती पत्करली. मात्र जराही न शिकलेल्या बा जाहीर सभेत बोलताना ‘कोणत्याही क्षणी मृत्यू येईल याची जाण ठेवून जगा’, ‘स्नेह व समन्वय यासाठी बोलाल तेव्हाच तुम्ही सुखी व्हाल’ किंवा ‘दुबळ्यांना क्षमाशील होता येत नाही, तो समर्थांचा सद्गुण आहे’ अशी वाक्ये उच्चारत तेव्हा खुद्द बापूच थक्क होत. स्वातंत्र्याच्या लढ्यात १९३०, १९३२, १९३३, १९३९ आणि १९४२ अशा पाच वेळा त्यांना दीर्घ कारावासाच्या शिक्षा झाल्या. ब्रिटिशांचा दुष्टावा असा की त्यांनी बांना अनेकदा एकांत कोठडीची सजा सुनावली.
भारतात येण्याआधीही त्यांनी द. आफ्रिकेतील गांधीजींच्या आंदोलनात भाग घेऊन कारावास भोगला होता. १८९६ मध्ये बापूंनी आपल्या देशात येऊ नये म्हणून आफ्रिकेतील गोऱ्यांनी त्यांची बोट समुद्रातच २१ दिवस अडकवून ठेवली. तो काळही बांनी त्यांच्यासोबत अनुभवला. १९०६ मध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी बापूंनी बांच्या संमतीने ब्रह्मचर्याची शपथ घेतली. ‘त्यानंतरचे आमचे जीवन अधिक मैत्रीचे व स्नेहाचे झाले’ अशी नोंद बापूंनीच करून ठेवली आहे. बापूंना न आवडणाºया अनेक गोष्टी बा करायच्या. त्यांना न चालणारा चहा प्यायच्या. त्यांना न आवडणारी कॉफीही घ्यायच्या. कधी कधी बापू स्वत:च त्यांना कॉफी करून द्यायचे. त्यांचे सारे जीवन आश्रमात व अनेकांच्या सहवासात गेले. बाही त्यात भागीदार होत्या. मात्र आपण बापूंची पत्नी आहोत याचा तोरा वा अभिमान त्यांना कधी शिवला नाही. बापूंची उपोषणे व त्यांचे आत्मक्लेषाचे मार्ग यावर त्या वैतागायच्या व त्यांच्याशी वाद घालायच्या. असहकाराच्या आंदोलनाच्या अखेरीस बापूंनी २१ दिवसांचे उपोषण जाहीर केले तेव्हा बांनी मीराबेनच्या मदतीने त्यांना ‘असे जीवावर उदार होऊ नका’ अशी तार पाठवली. ती पाहून बापूंच्याच डोळ्यात पाणी तरळले. ‘माझी काळजी नको, मुलांची काळजी घे’ असे त्यांनी बांना उत्तरादाखल पाठविलेल्या तारेत म्हटले. १९३२ मध्ये केलेल्या उपोषणाच्या वेळी बापूंची तब्येत ढासळली तेव्हा सरकारनेच बांना त्यांच्याजवळ येरवडा तुरुंगात आणले. त्या वेळी त्या काहीशा संतापाने म्हणाल्या, ‘आमची चिंता नको, पण जरा स्वत:ची तर काळजी घ्या.’ त्यांच्या चार मुलांपैकी हरिलाल व मणिलाल या दोन मोठ्या मुलांनी त्यांना फार त्रास दिला. हरिलाल व्यसनाधीन झाला. मुसलमान होऊन तो मुस्लीम लीगमध्ये सामीलही झाला. बांच्या अखेरच्या दिवसात त्याला आगाखान पॅलेसमध्ये आणले तेव्हाही तो प्यायलेलाच होता. त्यामुळे पाचच मिनिटांत त्याला त्यांच्यापासून दूर केले गेले. मणिलालने आश्रमाच्या पैशाचा गैरवापर केला म्हणून बापूंनी त्याला आश्रमाबाहेरच काढले. रामदास आणि देवीदास या धाकट्या मुलांनी मात्र स्वबळावर आपले जीवन घडविले. सामान्य माणसांच्या आयुष्यात येणाºया अशा व्यथांना तोंड देत त्या दोघांनी या देशाचा संसार उभा केला. ‘आपल्या पश्चात आपला अधिकार आपल्या मुलांना द्यायचा की नाही या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना बापू बांच्या उपस्थितीत म्हणाले ‘मुळीच नाही. मुलांपेक्षा अनुयायांचा परिवार मोठा असतो. द्यायचेच असेल तर ते त्यांना द्यायचे असते...’ असे अलौकिक जीवन जगणाºया व आपल्यासोबत आपला देश मोठा करणाºया बा व बापूंना आमचे विनम्र अभिवादन.
१९३२ मध्ये केलेल्या उपोषणाच्या वेळी बापूंची तब्येत ढासळली तेव्हा सरकारनेच कस्तुरबांना त्यांच्याजवळ येरवडा तुरुंगात आणले. त्या वेळी त्या काहीशा संतापाने म्हणाल्या, ‘आमची चिंता नको, पण जरा स्वत:ची तर काळजी घ्या.’