बा बळीराजा, तू जन्मजात पराभूत!

By admin | Published: August 30, 2016 05:06 AM2016-08-30T05:06:03+5:302016-08-30T05:06:03+5:30

यवतमाळहून बातमी आली की, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाने दिलेल्या तडाख्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी बापलेकांनी, शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाच वेळी आत्महत्त्या केली

Baa Baliaraja, you were born innocently! | बा बळीराजा, तू जन्मजात पराभूत!

बा बळीराजा, तू जन्मजात पराभूत!

Next

यवतमाळहून बातमी आली की, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाने दिलेल्या तडाख्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी बापलेकांनी, शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाच वेळी आत्महत्त्या केली. अवघी सहा एकर शेती, मोठे कुटुंब, तीन वर्षांपासून नापिकी, या वर्षी अतिवृष्टीचा फटका, डोक्यावर सेवा सहकारी सोसायटी व सावकाराचे कर्ज, स्वत:सकट लेकाचे आजारपण, अशा चोहो बाजूनी उभ्या ठाकलेल्या नैराश्याच्या डोंगरापुढे हात टेकून, काशीराम मुधळकर यांनी मुलगा अनिलसह मरण जवळ केले. त्यांच्या आत्महत्त्येच्या दुसऱ्याच दिवशी, सर्वोच्च न्यायालयाने दही हंडीसाठीची २० फुटांची मर्यादा वाढविण्यास नकार दिल्याची बातमी आली आणि लगेच अवघा महाराष्ट्र दही हंडीवरील चर्चेत आकंठ बुडाला. निवडणूक आली की हटकून ‘बळीराजा’ची आठवण येणाऱ्या एकाही राजकीय नेत्याला, दहीहंडीच्या उंचीवरील मर्यादेपेक्षा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बापलेकाची आत्महत्त्या चर्चेयोग्य वाटली नाही.
बापलेकानी विचारविनिमय करून हा निर्णय घेतला असावा का? की आधी बापाने गळफास घेतला आणि ते दृश्य बघून हादरलेल्या मुलानेही बापाशेजारीच स्वत:ची मान फासात अडकवली? की याच्या नेमके उलट झाले असावे? कोणत्याही संवेदनशील मनास पडावे असे हे प्रश्न, एकाही राजकीय नेत्याला पडल्याचे दिसले नाही; कारण घटनेस तीन दिवस उलटून गेल्यावरदेखील एकाही पदारुढ राजकीय नेत्याने मुधळकर कुटुंबास भेट देण्याची तसदी घेतली नाही. राज्य पातळीवरील नेत्यांचे सोडून द्या; पण किमान जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांनाही, त्या निराधार, सैरभैर झालेल्या कुटुंबाच्या पाठीवरून सहानुभूतीचा हात फिरवावासा वाटू नये? याला कोडगेपणा म्हणावे, की निगरगट्टपणा?
साधारणत: १९९० च्या दशकात शेतकरी आत्महत्त्यांचे सत्र विदर्भात सुरू झाले आणि २५ वर्षे उलटली तरी थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. काही तुरळक अपवाद वगळता या वर्षी विदर्भात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. सुदैवाने किडीचाही प्रादुर्भाव झालेला नाही. आणखी काही दिवस निसर्गाचा वरदहस्त असाच राहिल्यास, या वर्षी गेल्या तीन वर्षांची कसर भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात पल्लवित झाली आहे. या आशादायक पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्त्यांच्या दरात घसरण अभिप्रेत होती; पण प्रत्यक्ष चित्र वेगळेच आहे. एकट्या अकोला जिल्ह्यातच आॅगस्ट महिन्यात दहा शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला. गत तीन महिन्यातील हा आकडा २८ आहे. का निर्माण होत असावी ही टोकाची नैराश्याची भावना? आपले ‘अच्छे दिन’ कधी येऊच शकत नाहीत, हा प्रकांड विश्वास कोठून येत असावा?
अवघ्या काही दिवसांपूर्वी ग्राहकाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याला, अवघा पाच पैसे किलोचा भाव मिळतो, तूर निघण्यापूर्वीच तूर डाळीचे भाव कोसळू लागतात, तेव्हा पुढील चित्र शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर लख्ख उभे राहते अन् मग तो टोकाचा निर्णय घेतो. चांगले उत्पादन झाल्याने, उत्पन्न वाढत नाही आणि ‘अच्छे दिन’ तर मुळीच येत नाहीत, हे जेव्हा स्पष्ट होते, तेव्हा शेतकऱ्यासमोर दुसरा कुठला मार्गच शिल्लक उरलेला नसतो; कारण तो साठेबाजी करून बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करू शकत नाही, की मागणीपेक्षा पुरवठा कमी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक उत्पादन घटवू शकत नाही! ...अन् जेव्हा नैसर्गिकरीत्या उत्पादन घटते, तेव्हाही मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांताचा लाभ त्याच्या पदरात कधी पडतच नाही! त्याचा जन्मच मुळी निसर्ग, सरकार, व्यापारी, ग्राहक, सगळ्यांकडून मार खाण्यासाठी झालेला असतो. त्याच्यावर जन्मत:च पराभूत होण्याचा शिक्का बसलेला असतो.
- रवी टाले

Web Title: Baa Baliaraja, you were born innocently!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.