बा देवेंद्रा... वैष्णवांची काळजी वाहा..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 12:09 AM2018-07-16T00:09:14+5:302018-07-16T00:09:45+5:30

आपल्या इंद्रलोकांच्या स्टार रिपोर्टर यमकेने यावर्षीची वारी स्वत: करायचा निर्धार केला.

 Baa Devendra ... Take care of Vaishnava .. | बा देवेंद्रा... वैष्णवांची काळजी वाहा..

बा देवेंद्रा... वैष्णवांची काळजी वाहा..

Next

- राजा माने
आपल्या इंद्रलोकांच्या स्टार रिपोर्टर यमकेने यावर्षीची वारी स्वत: करायचा निर्धार केला. त्यामुळे आळंदीहूनच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर निघायचे ठरविले आणि तयारीला लागलाच होता, एवढ्यात महागुरू नारदांचा फोन आलाच ! ‘नारायणऽऽ नारायणऽऽ’ यमकेने नाराजीनेच फोन घेतला आणि संवाद सुरू झाला.
यमके- प्रणाम गुरुवर्य ! काय आज्ञा?
नारद- तू नागपूरला जाण्याऐवजी आळंदीत काय करतोय? तिकडे हवा तापलेली असताना असे इकडेच भटकणे बरे नव्हे.
यमके- क्षमा करा गुरुवर्य! पण तिकडे नेहमीचेच चाललेले असते. मला यावेळी पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी व्हायचे आहे. वैष्णवांच्या संगतीने विठोबाचे दर्शन घ्यायचे आहे...
नारद- मुंबापुरीत पावसाने उडविलेली दाणादाण तसेच खड्डे आणि पावसात अडकलेल्या लोकल्स्नी मुंबईकरांची केलेली तारांबळ याविषयी तू एक शब्दही कळविला नाहीस. यावरूनच तुझे काही वेगळेच चालले असल्याचा संशय मला आलाच होता.
यमके- अफवा बहाद्दरांनी जन्मी घातलेल्या संकटांपासून ते ‘लोकमत’ने विधिमंडळातील चांगले काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीवर टाकलेल्या कौतुकाच्या थापेपर्यंतची सगळी माहिती मी इंद्रलोकी पोहोच केली असताना तुम्ही असा संशय घेताच कसा? तुमचा मेलबॉक्स ओव्हरफुल्ल झाल्याने तुम्हाला पाठविलेले सर्व ई-मेल्स बाऊन्स तर झाले नाहीत ना?
नारद- मला तुझे सगळे रिपोर्ट्स मिळाले. पण अंतर्ज्ञानाने तू वैष्णवमेळ्यात सहभागी होतो आहेस हे उमजल्याने तुला शुभेच्छा देण्यासाठीच फोन केला...
यमके- अंतर्ज्ञानाने मी वैष्णव मेळ्याला निघालो हे जसे तुम्हाला उमजले तसे पंढरीत सुनील उंबरे नामक व इतर नारदपंथीयांनी चंद्रभागेच्या मलिनतेबद्दल उठविलेला आवाजही तुम्हाला उमजलाच असेल.
नारद- हो, चंद्रभागा नदीवरील घाणीच्या साम्राज्याबद्दल गेली २५ वर्षे आम्ही ऐकत आलो आहोत. चंद्रभागेवर पंढरीनगरीतील सांडपाण्याने सदैव आक्रमण केले आहेच, मांस विक्रीच्या व्यापाºयांनीही बिच्चारी चंद्रभागा वेढली गेली आहे. आषाढी वारीच्या वेळी लाखो वैष्णवांना तशाच पाण्यात दुर्दैवी स्नान घालण्याचे काम नियती करते आहे...
यमके- हे तुम्ही म्हणता गुरुवर्य ! ‘आप कुछ करते क्यों नही?’ इंद्रदेवांना सांगून एक तर सगळ्यांची बुद्धी पालटा नाहीतर त्यांच्या खुर्च्या तरी काढून घ्या, म्हणजे त्यांंना चंद्रभागा, वारकरी आणि पंढरपूरवासींच्या वेदनांची जाणीव होईल.
नारद- इंद्रदेवांकडे तक्रार केली तर गहजब होईल यमके ! त्यापेक्षा जनतेच्या दरबाराची भीती आपण खुर्च्यांवर नटलेल्या महानुभवांना देऊ !
यमके- त्याच मार्गाने नीलमताई गोºहे या कन्येने नागपूरच्या विधिमंडळ मेळ्यात नारदपंथी सुनीलच्या दाखल्याने चंद्रभागेतील मैलामिश्रित खड्ड्यांवर आवाज उठविला होता...
नारद- असे आवाज काही पहिल्यांदाच उठविले गेलेले नाहीत. पण देवेंद्रभाऊंनी २०४९ सालापर्यंतच्या कोटी-कोटीच्या स्वप्नांची उधळण करून गप्प केले.
यमके- म्हणूनच आता, ‘बा देवेंद्रा... २०४९ पर्यंत चंद्रभागेच्या शुद्धीकरणासाठी जे भले-बुरे होईल ते होवो ! पण आषाढीसाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वैष्णवांची या वारीत चंद्रभागा स्वच्छ ठेवून काळजी वाहा... एवढेच आर्जव !’

Web Title:  Baa Devendra ... Take care of Vaishnava ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.