बाप बाप है.. पब्लिकही बाप है !
By सचिन जवळकोटे | Published: July 18, 2021 06:19 AM2021-07-18T06:19:28+5:302021-07-18T06:20:13+5:30
लगाव बत्ती....
- सचिन जवळकोटे
परवा एका व्यासपीठावर ‘कासव’वाल्या ‘सुभाषबापूं’नी जाहीरपणे ‘सुशीलकुमारां’ना ‘राजकारणातला बापमाणूस’ असं संबोधलं. तेव्हा आजपर्यंत ‘लाडके सुपुत्र’ शब्द ऐकण्याची सवय असलेला हा ‘बापमाणूस’ही आपल्या भाषणात भावूकपणे बोलून गेला, ‘आता आपण साऱ्याच नेत्यांनी एकत्र येऊन सोलापूरचा विकास करायला हवा’ हे ऐकून समोरचं ‘पब्लिक’ गालातल्या गालात हसलं.. कारण यांच्या पक्षातलेच नेते कधी एक होत नाही, तिथं वेगवेगळ्या पक्षांचं काय घेऊन बसलात. खरंच.. जन्ता लय हुशार. बाप बाप है.. पब्लिकही बाप है !
‘बापूं’चं आमंत्रण.. अन् ‘सुशिल’ हास्य !
गेल्या चार-पाच दशकांच्या राजकारणात ‘सुशीलकुमारां’ना अपयश कधी ठावूक नव्हतं. मात्र या परंपरेला पहिला धक्का दिला ‘सुभाषबापूं’नीच. तेही ‘सीएम’च्या खुर्चीवर ‘शिंदे’ आरुढ असताना. २००४ ला लोकसभा निवडणुकीत घरचं सीट गेलं. ‘सुभाषबापूं’चा टीआरपी वाढला. वर्षानुवर्षे सत्तेच्या कुरणात सुखनैवपणे फिरणारे ‘हात’वाले कैक दिवस या धक्क्यातून बाहेर न पडलेले. अनेकांना स्वप्नातही ‘कासव’च दिसू लागलेलं. ‘शिंदे’ घराण्यासाठी सर्वात मोठे राजकीय दुश्मन ‘देशमुख’च ठरले.
आता हेच ‘देशमुख’ व्यासपीठावर ‘शिंदें’ना आवतन देतात, ‘चला साहेब.. सोलापूरच्या विकासासाठी आपण दोघे एक होऊ या’ मग काय.. ‘शिंदे’ही नेहमीचं ‘सुशील’ हास्य फेकतात. ‘रसिक’ डायलॉगही टाकतात, ‘चला तर बापू.. आपण खरंच एक होऊ या.’ हे ऐकून भारावलेल्या जनतेला बरीच स्वप्नं पडू लागलीत. ‘बापूं’नी ‘दिल्ली’हून मोठा उद्योग सोलापुरात आणलाय. तोही ‘लोकमंगल’ नाव नसलेला. ‘शिंदें’नीही लगेच ‘मुंबई’हून सारी सरकारी प्रक्रिया सुरळीत करून दिलीय. भलेही त्यांच्या शब्दाला किंमत नसली तरी. ‘विजयकुमारां’नीही नेहमीप्रमाणं साऱ्या अधिकाऱ्यांना दमात घेऊन स्थानिक यंत्रणा कामाला लावलीय.
मंगळवेढ्याच्या ‘आवताडें’नी हार-तुऱ्याच्या सोहळ्यातून बाहेर पडून छानपैकी रस्ता तयार करून दिलाय. ‘अनगरकरांनी’’ही मानापमानाचा मुद्दा सोशल मीडियावर व्हायरल न करता उद्घाटन सोहळ्याला यावं, असा हट्ट ‘यशवंत’ करताहेत. बार्शीचे सर्वपक्षीय ‘राजाभाऊ’ही गावातले खड्डे चुकवत या नव्या उद्योगाला खमकं ‘मनुष्यबळ’ पुरवतो म्हणालेत. करमाळ्याच्या ‘संजयमामां’नी या उद्योगाला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांच्या पाहुणचाराची सोय आपल्या फार्म हाऊसवर केलीय. माढ्याचे ‘बबनदादा’ही कारखान्याच्या केबिनमधून बाहेर पडून या नव्या उद्योगाला बारमाही पाणी सोडण्यासाठी नेहमीप्रमाणं कालव्याच्या अधिकाऱ्यांशी बोलताहेत. माळशिरसचे ‘रामभाऊ’ही ‘निलंबित’ होण्याचा नस्ता उद्योग करण्यापेक्षा हा नवा उद्योग किती चांगला, यावर ‘रणजितदादां’शी चर्चा करताहेत. अक्कलकोटचे ‘सचिनदादा’ झेडपीतल्या ‘काकूं’च्या राजकारणातून लक्ष काढून या उद्योगाला भेट देण्यासाठी ‘सुभाषबापूं’ना परवानगी मागताहेत.
आता सोलापुरात नवनवीन उद्योग येणार. विमानसेवाही सुरू होणार. पुण्या-मुंबईला गेलेली तरुणाई पुन्हा गावी परतणार. सोलापुरात पुन्हा गोकुळ नांदणार, या स्वप्नात काही सोलापूरकर दंग झालेत.. पण एकाच पक्षातले ‘दोन देशमुख’ कधी एक होतील हे ‘सुभाषबापूं’ना अन् ‘विजयकुमारां’नाच ठावूक नाही. एकाच आघाडीतले दोन ‘शिंदे’ एकमेकांना पाण्यात पाहायचं कधी सोडतील, हे ‘प्रणितीताई’ अन् ‘संजयमामां’नाही माहीत नाही. ‘घड्याळ’ प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला खुद्द ‘जिल्हाध्यक्ष काका’च का येत नाहीत, हे ‘भरणेमामां’ना समजलं नाही.. अन् मारे निघाले सारे एकत्र येण्याची भाषा करत.. पण कायबी म्हणा. इथली जन्ता येवढीबी खुळी नाय.. कारण बाप बाप है, पब्लिकही बाप है !
‘हायवे’ लगतच्या जमिनी..
गुप्तता बाळगणारे ब्रोकर !
‘सुरत-चेन्नई एक्स्प्रेस हायवे’ जिल्ह्यातून जाणार असल्याची हवा जोरात. हा ‘ग्रीन कॅरिडोर’ करमाळ्यातून जाणार असल्याचा नकाशाही व्हायरल झालेला; मात्र आता नवीनच कुजबूज पॉलिटिकल वर्तुळात सुरू. या रस्त्याचा फायनल नकाशा ‘दिल्ली’तून म्हणे काही स्थानिक नेत्यांना पाठविण्यात आलाय. बार्शी, उत्तर, दक्षिण अन् अक्कलकोट तालुक्यातून जाणाऱ्या या ‘एक्स्प्रेस हायवे’लगतच्या गावांत आता इस्टेट ब्रोकची वर्दळ वाढलीय. अत्यंत गुप्तता पाळत इथल्या जागा कवडीमोल भावात घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू झालीय. एकराच्या रेटमध्ये जमिनी घेऊन नंतर गुंठ्यात विकण्याचा हा धंदा म्हणे झटपट पैसा कमवून देणार.. अन् याची साधी खबरबातही तिथल्या गावकऱ्यांना नाही कळणार. आता तुम्हीच सांगा.. या राजकीय जुगारातले खरे बाप कोण ?
आमदारांसाठी दिल्लीहून कॉल
समोरच्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून त्याच्याकडून फुटाणे काढून घेण्यात ‘सुभाषबापू’ तसे माहीर. भलेही ‘शिंदें’ना ते ‘बाप’ किताब देत असले तरी प्रत्यक्षात ‘राजकारणातले बाप’ म्हणे तेच आहेत, याचा प्रत्यय परवा अधिकाऱ्यांना आलेला. ‘तिऱ्हे’ येथील पुलाचा ऑनलाईन कार्यक्रम करण्यासाठी ‘बापूं’नी ‘गडकरी’ अन् ‘फडणवीस’ या दोघांचीही वेळ घेतलेली. तसं ‘हायवे’वाल्या ‘कदमां’नाही सांगितलेलं. मात्र कार्यक्रमाच्या आदल्या दिवसापर्यंत कसलीच तयारी नाही. ‘बापू’ या ‘संजय’ना कॉल करून थकले. कधी मोबाईल बंद तर कधी ‘नो रिस्पॉन्स’.
तेव्हा बिथरलेल्या ‘बापूं’नी लगेच ‘दिल्ली’शी कॉन्टॅक्ट केला. मग काय.. ‘गडकरीं’च्या ‘मिनिस्ट्री’तून थेट ‘कदमां’ना कॉल, ‘बापूंचा फोन का उचलत नाही तुम्ही ?’.. मग त्यानंतर झाला दोघांचा संवाद.
गोष्ट म्हटली तर साधी. म्हटली तर लय मोठी. एका आमदाराचा कॉल घेत नाही म्हणून थेट ‘दिल्ली’हून झापाझापी पहिल्यांदाच झाली असावी. आता तुम्हीच सांगा. सोलापूरच्या राजकारणातले बाप कोण ?
सध्या सोलापूरला दोन ‘श्रीमंत’ खाती लाभल्यात. एक ‘हायवे’ तर दुसरं ‘स्मार्ट सिटी’. एकीकडे ‘कदम’ तर दुसरीकडे ‘ढेंगळे’. दोघांचाही कारभार चालतो ‘पाटीलकी’च्या स्टाईलमध्ये, असा आरोप राजकीय कार्यकर्त्यांचाच.. कारण इथं आपल्याला नेत्यांचाच थाट बघायची सवय लागलेली. अशा अधिकाऱ्यांचा ‘थाटमाट’ प्रथमच बघायला मिळतोय.. पण काही का असेना. दोघांच्या कामाचा झपाटा जबरदस्त. जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याची ऐतिहासिक घटना दोघांच्याही हातून घडतेय; मात्र हे ‘घडविण्या’साठी यांनी आजपावेतो वरच्या साऱ्यांनाच ‘मॅनेज’ केलंय, हा भाग वेगळा.. मात्र त्यामुळं स्थानिक पातळीवरील राजकीय नेत्यांना हे गिनत नाहीत, त्याचं काय ? आता सांगा.. इथले खरे बाप कोण !
लगाव बत्ती.....