बाबामहाराज सातारकर: शब्द जैसे कल्लोळ अमृताचे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2023 08:04 AM2023-10-27T08:04:53+5:302023-10-27T08:05:20+5:30
बाबा महाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तन परंपरा समृद्ध केली. कीर्तन परंपरेत वेगवेगळे प्रयोग केले. महिलांचा कीर्तनाचा अधिकार अधोरेखित केला..
शामसुंदर सोन्नर, संत साहित्याचे अभ्यासक
साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे... अशी अनुभूती ज्येष्ठ कीर्तनकार वारकरीरत्न, महाराष्ट्रभूषण बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन ऐकताना येत असे. परंपरेच्या जोखडात अडकून न पडता नव्या काळाचं नवं संगीत त्यांनी आपल्या कीर्तनात आणलं. म्हणूनच ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले.
बाबामहाराज सातारकर म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा अनोखा संगम होता. दादा महाराज सातारकर यांची फड परंपरा त्यांनी अधिक जोमाने पुढे नेली. वारकरी फडकरी एका साच्यात अडकून पडले होते. ही परंपरा नव्या काळातील नवे बदल स्वीकारायला तयार नव्हती. त्यामुळे कीर्तन परंपरेत एक साचलेपण आले होते, तेव्हा या प्रस्थापित व्यवस्थेला झिडकारून बाबामहाराज सातारकर यांनी नव्या काळासोबत स्वत:ला जोडून घेतले. खरं तर घरात वारकरी, फडकरी परंपरा असल्याने संस्कृतचा त्यांचा चांगला अभ्यास होता. इतर कीर्तनकार जास्तीत जास्त संस्कृतप्रचूर भाषा वापरत होते. अबोध वैदिक प्रक्रिया मांडत होते. पौराणिक कथांचा अन्वयार्थ लावण्यात मग्न होते, तेव्हा बाबामहाराज लोकांची भाषा बोलत होते. इतर कीर्तनकार स्वर्ग, वैकुंठ या पारलौकिक सुखाची स्वप्ने दाखवत होते तेव्हा बाबामहाराज आपल्या कर्तृत्वाने या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा आशावाद मांडत होते.
बदलत्या जगाची आव्हाने स्वीकारत असताना त्यांना वारकरी संप्रदायातील तथाकथित परंपरावाद्यांकडून खूप त्रास सहन करावा लागला; पण ते डगमगले नाहीत, तर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. वारकरी फडकरी परंपरेत महिलांना कीर्तन करू दिले जात नाही. बाबामहाराज यांनी त्याला छेद देऊन आपल्या मुलीला भगवतीताई सातारकर- दांडेकर यांना कीर्तन शिकविले. त्यावेळी फडकऱ्यांकडून प्रचंड विरोध झाला; पण बाबामहाराज त्या दबावापुढे झुकले नाहीत.
याबाबत एक प्रसंग खूप बोलका आहे. सातारा येथे ‘भक्ती शक्ती’ वारकरी संमेलन होते. या संमेलनात कीर्तन करण्याची संधी मिळणे खूप प्रतिष्ठेचे मानले जात होते. बाबामहाराज सातारकर हे त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यामुळे त्यांचे कीर्तन या संमेलनात व्हावे, असा स्थानिक संरोजकांचा आग्रह होता. मात्र, या नियोजनात काही परंपरावादी मंडळी होती. त्यांनी त्याला विरोध केला. कारण बाबामहाराज यांच्या कीर्तनात भगवतीताई यांच्यासह काही महिला टाळकरी उभ्या राहत असत.
परंपरावादी मंडळींचा त्याला विरोध होता; पण स्थानिक लोकांचा आग्रह वाढला तेव्हा, ठीक आहे, त्यांना कीर्तन करू द्या; पण महिला टाळकरी उभ्या करू नयेत, अशी अट घालावी, असे ठरले. तो प्रस्ताव घेऊन काही मंडळी महाराज यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, वारकरी संप्रदाय फक्त पुरुषांचा नाही. मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई आदीकरून सर्व जातीतील महिला संतांनी ही वारकरी परंपरा वाढविली आहे. त्यामुळे महिलांना निर्बंध घालणे चूक आहे. भगवतीताई टाळकरी चालत असतील तरच मी कीर्तन करील, असे ठणकावून सांगितले. परंपरावाद्यांना आपला हट्ट सोडावा लागला.
बाबामहाराज यांनी वारकरी कीर्तन परंपरेतील संगीताच्या चौकटीही मोडल्या. कीर्तनात मृदंग, टाळ आणि वीणा इतकीच वाद्ये असावीत, असा दंडक होता. महाराजांनी आपल्या कीर्तनात तबला, हार्मोनियम यांच्यासह इतर आधुनिक वाद्यांचा वापर केला.
एरवी हळवे असणारे बाबामहाराज मनाने खूप खंबीर होते. महाराज यांचे कीर्तन गिरगाव येथील परंपरागत विठ्ठल मंदिरात होते. महाराज यांचे संगीत उच्च दर्जाचे असल्याने ध्वनी व्यवस्थाही तितकीच चांगली लागत असे. ती ध्वनी व्यवस्था कीर्तनाच्या वेळी त्यांचे चिरंजीव चैतन्य महाराज सांभाळत होते. कीर्तन सुरू झाले. मध्ये आवाजात जरा डिस्टर्बन्स आला म्हणून चैतन्य महाराज माईक सेट करायला गेले. जोरात शॉक बसला. चैतन्य महाराज यांच्यातील चैतन्य निघून गेले होते... त्या परिस्थितीतही स्वत:ला सावरत महाराजांनी कीर्तन पूर्ण केले. आरती झाल्यानंतर पुढील सोपस्कार पार पडले.
मेणाहूनी मऊ आणि वज्राहूनी कठीण असणारे बाबामहाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तन परंपरा समृद्ध केली. ती पहिल्यांदा दूरचित्रवाणीवरून जगभर पोहाेचवली. कीर्तन परंपरेत वेगवेगळे प्रयोग केले. महिलांचा कीर्तनाचा अधिकार अधोरेखित केला. आज अनेक महिला कीर्तनकार मुक्तपणे कीर्तन करीत आहेत, याचे श्रेय बाबामहाराज यांना द्यावे लागेल. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.