बाबा कहता है... अब बस् !
By राजा माने | Published: July 2, 2018 04:16 AM2018-07-02T04:16:41+5:302018-07-02T04:17:01+5:30
महागुरू नारद आज खूपच चिडलेले होते. त्यामुळे ‘नारायण... नारायण...’चा त्यांचा जपही गतीने चालू होता. अखेर संतापाने त्यांनी शिष्य यमकेला फोन लावला... ‘बाबा कहता है...!’ या गाण्याचा डायलर टोन त्यांना ऐकू आल्याने तर ते अधिकच संतापले. तिकडून यमकेने फोन उचलला...
महागुरू नारद आज खूपच चिडलेले होते. त्यामुळे ‘नारायण... नारायण...’चा त्यांचा जपही गतीने चालू होता. अखेर संतापाने त्यांनी शिष्य यमकेला फोन लावला... ‘बाबा कहता है...!’ या गाण्याचा डायलर टोन त्यांना ऐकू आल्याने तर ते अधिकच संतापले. तिकडून यमकेने फोन उचलला...
यमके : नमस्कार गुरुवर्य. काय सेवा करू?
नारद : अरे, इकडे मी त्या बाबा पुराणाने वैतागलो आहे आणि तुझ्या मोबाईलवरसुद्धा ‘बाबा’चीच डायलर टोन!
यमके : हो, सध्या ‘संजू’ फार्मात आहे ना! सल्लूभाईचे ३८ कोटीचे रेकॉर्डही त्याने मोडले. त्यापेक्षाही मला ‘बाबा कहता है...’ म्हणत अनेक महाभागांचे कंबरडे मोडले, याचा आनंद व्यक्त करण्यासाठी मी ती डायलर टोन ठेवली.
नारद : (रागात) शतमूर्ख आहेस यमके! त्याने आपल्या तमाम जमातीचे कपडे उतरवून टाकले तरी तुला त्याचेच कौतुक कसे?
यमके : गुरुवर्य, मुळात तुम्हीच मला राजकुमार हिराणी-अमीर खानच्या ‘पीके’चा डुप्लिकेट म्हणून इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर म्हणून निवड केली. मग हिराणीचा ‘संजू’च काय, तो करेल ती कृती मला आवडणारच!
नारद : प्रश्न आता तुझ्या आवडीचा राहिलेला नाही. डिजिटल जगताने मोठी पंचायत केली आहे. तुझ्या मराठी भूमीतील तमाम बांधवांनी ‘नारद पंचायत’नामक संघटना स्थापन करून थेट इंद्रदेवांनाच ई-मेलद्वारे तक्रार केली आहे.
यमके : कशाची आणि कुणाची तक्रार गुरुदेव?
नारद : मराठी भूमीतील यदु, एस.एम., भोकरेपासूनच्या ते थेट गावागावातील बोरुबहाद्दरांच्या संघटनांनी मुंबापुरीत तळ ठोकला. त्यांनी ऋषिवर्य केतकर, रायकर, तोरसेकर, खाडिलकर, खांडेकर, निरगुडकर, वागळेंपासून अगदी अभय, अतुल, काथे, देशपांडे, मोईत्रापर्यंतच्या दिग्गजांना गळ घालून ‘नारद पंचायती’ची स्थापना करून लेटरपॅड पण छापले आणि त्यावर इंद्रदेवांना राजकुमार हिराणी यांनी आमचे वस्त्रहरण करून आमची बदनामी केल्याचा तक्रारी मेल पाठविला आहे.
यमके : मग त्यात काय एवढे! तुम्ही राजकुमार हिराणीला खेचा इंद्र दरबारात!
नारद : अरे, ‘नारद पंचायत’च्या लेटरहेडवरील तक्रार पाहून इंद्रदेवांनी मलाच जाब विचारला आहे. तुमच्या जमातीने थेट माझ्याकडे तक्रार करावी असे काय घडले? असे दटावून विचारले.
यमके : गुरुदेव, मी तुम्हाला ‘टेक्नोसॅव्ही’ समजत होतो. अहो, यू ट्यूब चालू करून त्यांना ‘बाबा कहता है... अब बस्!’ हे गाणे आणि दोन्ही ‘संजू’चा डान्सही दाखवायचा होता ना!
नारद : अरे, त्यांनी अगोदरच पाहिलेला होता. ‘नारद पंचायती’चा तो अर्ज त्यात विनोद तावडेंकडेही काही बुद्धिजीवींनी ‘बाबा...’ हे गाणे राज्यातील पत्रकारिता अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, अशी मागणी करणारे निवेदनही सादर केल्याचे समजले.
यमके : गुरुवर्य, काय चूक आहे त्यात? कळते, समजते, विश्वसनीय सूत्र यातून तुम्ही कधी बाहेर पडणार आहात? टीव्हीच्या खोक्यात बसलो की इंद्रदेवापेक्षाही तुम्ही मोठे असल्याच्या थाटात न्यायनिवाडा करता. पंचायतीचे प्रमुख म्हणून काळानुसार तुम्ही नाही बदललात तर ‘नारद पंचायती’त कसे बदल होतील?
नारद : खरं आहे शिष्या! आता मी क्षमा मागून मुक्त तर होईनच, पण समाजाला त्रास होणार नाही अशीच ‘नारदगिरी’ करा, असा संदेशही नारद जमातीस देईन...
(तिरकस)