बालगुन्हेगारीचा विळखा
By admin | Published: April 3, 2017 12:14 AM2017-04-03T00:14:35+5:302017-04-03T00:14:35+5:30
३५ हजार प्रकरणे उघडकीस येतात आणि त्यातील एक तृतीयांशपेक्षा अधिक प्रकरणे केवळ महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील आहेत.
देशात दरवर्षी बालगुन्हेगारीची सरासरी ३५ हजार प्रकरणे उघडकीस येतात आणि त्यातील एक तृतीयांशपेक्षा अधिक प्रकरणे केवळ महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील आहेत. बालगुन्हेगारीत राज्याचे आघाडीवर असणे अत्यंत चिंताजनक तर आहेच; पण या वास्तवाने मुलांवरील संस्कार, त्यांची जडणघडण, शिक्षणातील त्रुटी तसेच व्यवस्थेतील अकार्यक्षमतेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एरवी बालगुन्हेगारी म्हटले की आपल्यासमोर अनाथ, बेकार, रस्त्यावर वाढणारी अथवा घरातून पळून जाणारी मुलेच नजरेसमोर येतात. परंतु बालगुन्हेगारीचे हे विश्व आता केवळ गरिबांपुरतेच सीमित राहिलेले नाही. एकट्या महाराष्ट्राचा विचार केल्यास गेल्या दोन वर्षांत अल्पवयीनांकडून गुन्ह्यांचे प्रमाण धोकादायक स्तरावर पोहोचले आहे. चोरी, पाकीटमारी, हाणामारी हे किरकोळ गुन्हे झाले. आता तर खून, दरोडे, बलात्कार, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांमधेही त्यांचा समावेश वाढला आहे. विशेषत: अल्पवयीनांकडून होणाऱ्या बलात्काराचे प्रमाण दुप्पट झाले आहे. अल्पवयीन मुलाने पोर्नसाइट बघून तीन वर्षांच्या बालिकेवर केला अत्याचार, नातवंडांनी केला आपल्याच आजीचा खून, प्रेमास नकार देणाऱ्या मुलीवर अल्पवयीनाने उगवला सूड, अशा मन हादरवून टाकणाऱ्या घटना दररोजच कानावर पडू लागल्या आहेत. निष्पाप बालमन एवढे विकृत होतेच कसे? ही सूड भावना त्यांच्यात कुठून येते हा गंभीर प्रश्न आहे आणि शासनासोबतच कुटुंब आणि समाजानेही यावर सखोल चिंतन करण्याची गरज आहे. मुले गुन्हेगारीकडे वळण्याची अनेक कारणे आहेत. घरातील आर्थिक, भावनिक परिस्थिती, मित्रांची साथसंगत हीसुद्धा वाढत्या बालगुन्हेगारीस कारणीभूत आहे. शाळांमधून आता मुलांना नैतिकतेचे धडे आणि लैंगिक शिक्षणासोबतच कायद्याचीही ओळख करून द्यावी लागणार आहे. याशिवाय बालगुन्हेगारांचे शिक्षण, पुनर्वसन आणि समुपदेशनही अत्यंत महत्त्वाचे असते. शासन आणि समाजाने एकजुटीने या दिशेने योग्य पावले उचलली तरच बालगुन्हेगारी नियंत्रणात आणता येईल.