शेषरावांचे समंजसपण !

By admin | Published: September 8, 2015 04:28 AM2015-09-08T04:28:05+5:302015-09-08T04:28:05+5:30

अंदमानात भरलेल्या विश्व (?) साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून शेषराव मोरे यांनी जे भाषण केले त्याच्या लावल्या जाणाऱ्या व होत असणाऱ्या सर्व अर्थांबाबत वाचकांनी सावध

Balarabao's understanding! | शेषरावांचे समंजसपण !

शेषरावांचे समंजसपण !

Next

अंदमानात भरलेल्या विश्व (?) साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून शेषराव मोरे यांनी जे भाषण केले त्याच्या लावल्या जाणाऱ्या व होत असणाऱ्या सर्व अर्थांबाबत वाचकांनी सावध राहायला हवे. दुर्दैवाने शेषराव मोरे यांनीही ते सावधपण बाळगल्याचे दिसले नाही. सावरकरांचा भूमीनिष्ठ राष्ट्रवाद आणि धर्मनिष्ठ राष्ट्रवाद यांच्यातील फरक तर त्यांनी स्पष्ट केला नाहीच, शिवाय सावरकर जेव्हा हिंदुत्व म्हणतात तेव्हा ते त्यात आपल्या परंपरा, रुढी, जुनकट श्रद्धा आणि त्यातले आताचे अंधश्रद्ध समज यांचा समावेश करीत नाहीत हेही त्यांनी स्पष्ट केले नाही. झालेच तर त्यांचा हिंदुत्ववाद पुरोगामीत्व व विज्ञाननिष्ठा यांनाही मानणारा आहे. ‘गाय हा पशू आहे, ते दैवत नाही’ असे खणखणीतपणे बजावूनही ते हिंदुत्वनिष्ठच राहिले आहेत. रत्नागिरीत पतितपावन मंदीर उभारून ते सर्व जाती संप्रदायांसाठी खुले करणारे सावरकरही हिंदुत्वनिष्ठच आहेत. त्यांच्या पुरोगामीत्वाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या हिंदुत्वनिष्ठेवर एकेरी भर देणे हा त्यांच्यावरचा अन्याय आहे आणि अंदमानात जमलेल्या सावरकरांच्या भक्तांना बरे वाटावे म्हणून शेषरावांनी तो केला आहे. सावरकरांचे एक गाढे अभ्यासक राम शेवाळकर नेहमी म्हणत ‘सावरकरांना भक्त होते, त्यांना अनुयायी मात्र नव्हते’ त्यांचा उदोउदो करून त्यांच्या आरत्या करायला शहाणपण लागत नाही आणि धारिष्ट्याचीही त्याला गरज नसते. खरी अडचण त्यांचे अनुयायीत्व स्वीकारून त्यांनी सांगितलेल्या दलितमुक्तीपासून अंधश्रद्धामुक्तीपर्यंतच्या कार्यक्रमांना साथ देण्याची आहे. त्यांचा राष्ट्रवाद आपला मानणाऱ्यांनाही त्यांच्या सुधारकी भूमिका आपल्या वाटल्या नाहीत हा खरा दुर्देवाचा भाग आहे. प्रत्यक्ष सावरकरांच्या हयातीतही ‘भाला’कार भोपटकरांसारखे त्यांचे ज्येष्ठ अनुयायी हिंदूंमधील धर्मविषयक जुनाट चालीरितींच्या बाजूने उभे राहत आणि त्यांच्या पुरोगामीत्वापासून आपले वेगळेपणही सांगत. या देशाला आपली मातृभूमी, पितृभूमी व देवभूमी मानणारा प्रत्येकच जण (मग तो कोणत्याही धर्मपंथाचा असो) हिंदू होय या सावरकरी भूमिकेचा स्वीकार करणे संघनिष्ठ हिंदुत्ववाद्यांना न जमणारे आहे. परंतु सध्याचा संघाचा काळ सावरकरांना, त्यांचे विचार बाजूला सारून आत्मसात करून घेण्याचा असल्यामुळे ते सावरकरांवर आपला हक्क सांगत आहेत. अंदमानच्या संमेलनात शेषरावांनी ज्यांच्यासमोर भाषण केले त्यातला मोठा वर्ग हा होता. कदाचित त्यामुळेही शेषरावांसारख्या तर्ककठोर विचारवंताचा नाईलाज झाला असावा. एरव्ही १८५७ च्या बंडाला स्वातंत्र्ययुद्ध ठरविणाऱ्या सावरकरांना, त्याच युद्धाला ‘जिहाद’ ठरवून निकाली काढणाऱ्या शेषरावांनी अशी भूमिका घेतली नसती. सारेच हिंदू प्रतिगामी नाहीत. त्यांच्यातील एक मोठा वर्ग पुरोगामी व आधुनिक विचारांची कास धरणारा आणि विज्ञाननिष्ठ आहे. मात्र तो अबोल असल्यामुळे व त्याच्यावर धर्मभ्रष्टतेचा आरोप केला जात असल्यामुळे कडव्या व उग्र हिंदुत्ववाद्यांची सध्या चलती आहे. प्रवीण तोगडिया आणि बजरंगीबाबू हे त्यांचे आदर्श आहेत आणि त्यांना आवरण्याची संघाची इच्छा नाही. हिंदू धर्मातील रुढी, परंपरा आणि श्रद्धा यांची चिकित्सा थेट अन्य धर्मांच्या बरोबरीने करावयाच्या मताचे शेषराव हे आग्रही राहिले आहेत. मुसलमान व
अन्य धर्मातील अनिष्ट रुढींवर त्यांनी कठोर प्रहार
केलेही आहेत. त्याचवेळी सावरकरांचे १८५७ विषयीचे समजही त्यांनी चुकीचे ठरविले आहेत. मुळात हा श्रद्धा आणि विज्ञाननिष्ठा यातील फरक आहे. शेषरावांनी
जोवर इस्लामचे वाभाडे काढले तोवर त्यांच्यावर
प्रसन्न असणाऱ्यांचा मोठा वर्ग हिंदुत्ववाद्यात होता. मात्र ‘१८५७ चा जिहाद’ आणि ‘गांधींनी अखंड भारत
का नाकारला’ ही त्यांची पुस्तके बाजारात आली तेव्हा हा वर्ग त्यांच्यापासून जरा दुरावल्यासारखा झाला. अंदमानमधील आताच्या भाषणात तो पुन्हा आपलासा करून घेण्याचा प्रयत्न शेषरावांनी केला आहे. तो करताना राज्यघटना आणि सेक्युलॅरिझम यांची त्यांनी भलावण केली आहे. मात्र ती आपण आपली जुनी भूमिका अजून पुरती सोडली नाही हे दाखविण्यासाठी. एखादा मोठा वर्ग आपल्यावर नाराज असणे हे सध्याच्या काळात विचारवंतांना त्यांच्यावरील मोठे संकट वाटणारे आहे. हा वर्ग कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो त्याचे नमुने देशाने अलीकडे पाहिले आहेत. शेषरावांना त्यांची भीती नाही. पण जराशा बोलांनी हा वर्ग शमत असेल तर तसे का न करा असा समंजस विचार त्यांनी केला असणार. त्याचमुळे ‘हिंदुत्ववाद्यांना दहशतवादी म्हणणे’ त्यांनी चुकीचे ठरविले असणार. प्रत्यक्षात ज्या हिंदुत्ववाद्यांवर तशी लेबले लागली त्यांचे हिंस्र स्वरुप देशाने पाहिले आहे. मालेगाव, हैदराबाद, बेंगळुरु, समझोता एक्सप्रेस आणि त्याआधी गुजरात येथील घटना देशासमोर आहेत. या घटनात भाग घेणारी आक्रमक माणसे साऱ्या हिंदुंचे प्रतिनिधित्व करीत नाहीत, हे खरे असले तरी त्यांचे अस्तित्त्व दुर्लक्षिण्याजोगेही नाही हे शेषरावांसकट सगळ््यांनी लक्षात घेतले पाहिजे आणि त्यांचा तसा उल्लेख निर्भयपणे केलाही पाहिजे. शेषराव मोरे यांच्याकडून अशी अपेक्षा करायची नाही तर मग ती करायला दुसरेही फारसे गंभीर विचारवंत महाराष्ट्रात नाहीत.

Web Title: Balarabao's understanding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.