बालनाट्य संमेलन पैशाविना पोरके

By admin | Published: November 26, 2015 10:06 PM2015-11-26T22:06:22+5:302015-11-26T22:06:22+5:30

श्रमदेवतेचे पूजक आणि गिरणगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर शहरात सध्या बालनाट्य संमेलनाच्या चर्चेची धूम आहे. अ. भा. नाट्य परिषदेच्या इतिहासातील पहिल्या अ. भा. बालनाट्य

Balatattya Convention Pashavina Porke | बालनाट्य संमेलन पैशाविना पोरके

बालनाट्य संमेलन पैशाविना पोरके

Next

श्रमदेवतेचे पूजक आणि गिरणगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर शहरात सध्या बालनाट्य संमेलनाच्या चर्चेची धूम आहे. अ. भा. नाट्य परिषदेच्या इतिहासातील पहिल्या अ. भा. बालनाट्य संमेलनाची नोंद आपल्या उत्सवप्रिय सोलापूरच्या नावावर व्हावी यासाठी रंगकर्मींबरोबरच सर्वच क्षेत्रातील लोक संमेलन मैलाचा दगड ठरावे यासाठी धडपडत आहेत. या धडपडीला दुनियादारीचे भान मात्र राहिलेले नाही. कारण, पैशाचे सोंग आणता येत नाही, या व्यवहारी नियमाचा थोडासा विसर पडल्यामुळे संमेलन आयोजनासाठी लागणाऱ्या दीड कोटी रुपयांची जुळवाजुळव करताना सर्वांचाच जीव मेटाकुटीला आलेला दिसतो. खरे तर बालसंस्कारांची महती जाणवणाऱ्या फडणवीस सरकारने बालनाट्य संमेलनाला राजाश्रय देणे सोलापूरकरांना अपेक्षित होते; पण सरकारने दमडीही दिली नाही. डिसेंबर १९५७ मध्ये सोलापुरातच ३९ वे नाट्यसंमेलन रेजीसॉर पार्श्वनाथ आळतेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. २००८ साली रमेश देव यांच्या अध्यक्षतेखाली ८८ वे अ. भा. नाट्यसंमेलन येथेच गाजले. २००६ साली मारुती चितमपल्ली यांच्या अध्यक्षतेखालील ७९ वे अ. भा. साहित्य संमेलनही येथेच पार पडले. आता अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाची मुहूर्तमेढही रंगकर्मी कांचन सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली २८ नोव्हेंबर रोजी या शहरात रोवली जात आहे. या संमेलनाचे मार्गदर्शक सुशीलकुमार शिंदे तर आमदार प्रणिती शिंदे स्वागताध्यक्ष आहेत. कार्याध्यक्ष ‘लावण्यखणीकार’ व ज्येष्ठ रंगकर्मी विजय साळुंके यांनी प्रकाश यलगुलवार, प्रा. अजय दासरी, अमोल धाबळे, मुकुंद हिंगणे, प्रा. इसाक शेख, पंचप्पा मेणसे, डॉ. मीरा शेंडगे, कमलप्रभा हावळे, प्रशांत बडवे, विद्या काळे, दिलीप कोरके यांच्यासह जिल्ह्यातील नाट्यप्रेमींची मोट बांधून संमेलन यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. बालनाट्याची चळवळ गावपातळीवर पोहोचविण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील अनेक संस्था आणि कार्यकर्ते पुढे आल्याने आवश्यक वातावरण निर्मिती झाली. तब्बल २००० विद्यार्थी आपल्या कलेचे सादरीकरण या संमेलनात करतील. राज्यभरातून ६०० बालनाट्य कलावंत या संमेलनात सहभागी होणार आहेत. रोज सुमारे साडेतीन हजार रंगकर्मींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रंगमंच थाटण्यात येत आहे. पहिले बालनाट्य संमेलन पुढे होणाऱ्या नाट्यसंमेलनासाठी सोलापूरचे संमेलन मॉडेल ठरावे, या भावनेने सोलापूरकर या उत्सवाकडे पाहतात. त्याच कारणाने संमेलन संयोजनासाठी प्रत्येक जण पुढे येतो; पण हे सगळे करण्यासाठी पुरेसा निधी मात्र जमा झालेला नाही. महापालिकेने मोठ्या दिमाखात २५ लाखांची मदत जाहीर केली. प्रत्यक्ष धनादेश मात्र आज तरी हवेतच विरलेला दिसतो. अखेर संयोजकांनी वेगवेगळ्या कामांसाठी आश्रयदाते शोधण्याचा फंडा काढला. त्यातूनच भोजन व्यवस्थेची जबाबदारी मार्केट यार्डातील व्यापारी मंडळ व उदय चाकोते मित्रमंडळाने उचलली. सालाबादप्रमाणे आ. सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’ संस्थेतर्फे याही वर्षी सामूदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. योगायोगाने त्या सोहळ्याचे स्थळ आणि बालनाट्य संमेलनाचे स्थळ एकच असल्याने विवाहाचा सेट, व्यासपीठ, शामियाना तयार होता. आ. देशमुखांनी तो तसाच संमेलनासाठी ठेवण्याचा निर्णय घेऊन मुख्य सभामंडपाची जबाबदारी उचलली. सुहास आदमाने या उद्योजकाने पिण्याच्या पाण्याची जबाबदारी घेतली. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी आता शेवटच्या क्षणी मदतीला आले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तांत्रिक मुद्दे बाजूला सारून या संमेलनासाठी आर्थिक मदत करायला हवी. सोलापूरकर संमेलन काहीही करून यशस्वी करतील, पण अ. भा. बालनाट्य संमेलन पैशाविना पोरके ठरणे शासनाला शोभणार नाही.
- राजा माने

Web Title: Balatattya Convention Pashavina Porke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.