अफगाणमध्ये महिलांच्या बोलण्यावरही बंदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 10:43 AM2024-11-05T10:43:57+5:302024-11-05T10:44:22+5:30
Women In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये महिलांवर इतक्या प्रकारची बंदी आहे की विचारता सोय नाही. तिथल्या तर बायकांचं म्हणणं आहे, इथे जन्माला येणं आणि मरणंही आमच्या हातात नाही. प्रत्येक गोष्टीला बंदी आणि आमच्या आयुष्याशी संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट तालिबान्यांच्या हातात.
अफगाणिस्तानमध्येमहिलांवर इतक्या प्रकारची बंदी आहे की विचारता सोय नाही. तिथल्या तर बायकांचं म्हणणं आहे, इथे जन्माला येणं आणि मरणंही आमच्या हातात नाही. प्रत्येक गोष्टीला बंदी आणि आमच्या आयुष्याशी संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट तालिबान्यांच्या हातात. त्यांनी म्हटलं बस की बसायचं, त्यांनी म्हटलं उठ की उठायचं. प्रत्येक गोष्ट तालिबान्यांच्या मर्जीनुसार.. खरं तर श्वास आपल्या मर्जीनुसार चालतो, त्यावर कोणाचं नियंत्रण नाही, पण आमच्या श्वासावरही त्यांचंच नियंत्रण आहे. तालिबान्यांची मर्जी असेल, आहे तोपर्यंत आमचा श्वास चालतो, त्यांना वाटलं की ते आमचा जीव घ्यायला म्हणजेच श्वास बंद करायलाही कमी करत नाहीत..
तालिबान्यांकडून महिलांवर सगळ्या प्रकारची बंदी लादून झाली, फक्त बोलण्यावरच त्यांनी अजून बंदी घातलेली नाही, असं म्हटलं जात होतं, पण तेही त्यांनी आता खरं करून दाखवलं आहे.
महिलांनी मोठ्या आवाजात बोलायचं नाही, यावर तालिबान्यांची बंदी होतीच, पण आता त्यात बदल करताना महिलांनी त्यांचं बोलणं इतरांना ऐकायला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असा ‘कायदा’ करण्यात आला आहे. अर्थात हा कायदा अजून तरी प्रार्थना म्हणण्यापुरताच मर्यादित आहे. तालिबाननं महिलांसाठी आता एक नवीन फर्मान जारी केलं आहे. त्यानुसार महिलांनी ‘मोठ्या आवाजात’ कुराण पढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तालिबानचे मंत्री मोहम्मद खालिद हनाफी यांनी आपल्या नव्या आदेशात म्हटलं आहे की, महिलांनी कुराणची आयते म्हणायला आमची काही हरकत नाही, पण ही आयते म्हणताना त्यांचा आवाज इतर कोणालाही ऐकू जायला नको. म्हणजेच त्यांनी ती मनातल्या मनात म्हणावीत, ‘नाहीतर त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल!’ अफगाणी न्यूज चॅनेल अमू टीव्हीनंही यासंदर्भातला वृत्तांत प्रसारित केला आहे. आता महिलांच्या तोंडाला खरोखरच कुलूप तेवढं लावायचं बाकी आहे, असंच अनेकांचं म्हणणं आहे.
२०२१मध्ये तालिबान पुन्हा सत्तेवर आल्यानंतर महिलांवर परत अनेक तऱ्हेच्या बंदी लादण्यात आल्या. त्यांना शिक्षणाला मनाई करण्यात आली. नोकरी करण्यापासून त्यांना परावृत्त करण्यात आलं आणि त्यांना बळजबरी घरी बसवण्यात आलं. हनाफी यांनी म्हटलं आहे, महिलांना अजान म्हणायलाही बंदी आहे, त्यामुळे अर्थातच संगीत ऐकणं किंवा गाणं म्हणणं या गोष्टीही महिला करू शकत नाहीत. महिलांचा आवाज म्हणजे ‘औराह’ आहे. ‘औराह’ याचा अर्थ अशी गोष्ट, जी लपवणं गरजेचं आहे. सार्वजनिकरित्या त्याचं प्रदर्शन करणं तर अत्यंत चुकीचं. त्यामुळे मोठ्या आवाजात जर महिला बोलल्या, तर त्यांना त्याची शिक्षा जरूर मिळेल! अनेक तज्ज्ञांचं मत आहे, ही पहिली पायरी आहे, असंही मोठ्यानं बोलण्यासह अनेक गोष्टींसाठी महिलांना बंदी आहे. महिलांचं बोलणं कायमचं बंद होणं थोड्याच दिवसांत अधिकृत होईल.
महिलांच्या बोलण्यावर तालिबाननं याआधीच बंदी लादली आहे. ते जाहीर मात्र आत्ता झालं. अफगाणिस्तानच्या महिलांवर कायमच तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ येते. सार्वजनिक ठिकाणीही महिलांच्या वावरण्यावर अनेक बंधनं आहेत. आपलं संपूर्ण अंग झाकण्याची त्यांना सक्ती आहे. इतकंच नव्हे, तर आपला चेहराही त्यांना मोठ्या, जाड्याभरड्या कापडानं झाकावा लागतो.
तालिबानचे सुप्रीम लीडर मुल्ला हिबाबतुल्लाह अखुंदजादा यांचं तर म्हणणं आहे, महिलांच्या नुसत्या आवाजानंही पुरुषांचं मन भरकटू शकतं. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तरी महिलांनी आपल्या तोंडाला ‘कुलूपच’ लावलं पाहिजे! त्यानं दुहेरी फायदा होईल.. नको त्या गोष्टींकडे पुरुषांचं मन भरकटणार नाही आणि आपसुकच महिलांचंही संरक्षण होईल. त्यांच्या या आदेशाचा आता कायदा करण्यात आला आहे.
अफगाणिस्तानमध्ये महिला फक्त सहाव्या इयत्तेपर्यंत शिकू शकतात. वयस्कर महिलांना मशिदीत प्रवेशावरही बंधनं आहेत. त्या मशिदीत प्रवेश करू शकत नाहीत. अफगाणिस्तानात महिलांशी बोलणं, ‘पाप’तर आहेच, पण कुठल्याही दुकानाच्या कुठल्याही फलकावर महिलांचा फोटो छापण्यावरही बंदी आहे. त्या कुठेच एकट्या फिरू शकत नाहीत, ड्रायव्हिंग लायसेन्स त्यांना दिलं जात नाही आणि हिजाब परिधान करणंही त्यांच्यासाठी अनिवार्य आहे..
कामानिमित्तही पुरुषांशी बोलण्यावर बंदी
अफगाणिस्तानच्या हेरात क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी सांगितलं, खरं तर बोलणं हे आमचं काम. महिलांना आरोग्याच्या विविध गोष्टी समजावून सांगण्यासाठी आम्हाला बोलावंच लागतं, बोललंही पाहिजे. पण महिलांशी बोलण्यासाठीही आम्हाला मंजुरी नाही. एवढंच नाही, रुग्णालयातील इतर पुरुष कर्मचाऱ्यांशी कामानिमित्तही बोलण्याला परवानगी नाही. अशानं रुग्णांच्या जीवालाही धोका होऊ शकतो.