बाप्पा... पुढल्या वर्षी लवकर या
By दिलीप तिखिले | Published: September 6, 2017 01:31 AM2017-09-06T01:31:10+5:302017-09-06T01:31:57+5:30
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती नको, मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करा, मांगल्य तलावात टाकू नका असे कितीतरी नियम दरवर्षीच सांगितले जातात.पण पब्लिक ऐकत नाही.
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती नको, मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करा, मांगल्य तलावात टाकू नका असे कितीतरी नियम दरवर्षीच सांगितले जातात.पण पब्लिक ऐकत नाही. पूर्वी घरावर कावळ्याने काँव काँव केली की मुलं आनंदानं ओरडायची आणि घरात जाऊन आईला सांगायची... आर्ई, आपल्याकडे पाहुणे येणार, बरं का! मग संपूर्ण घर आनंदून जायचे. नक्की कोण येणार हे माहीत नसतानाही त्यांच्या स्वागताला लागायचे. आज काळ बदलला. जीवन धकाधकीचे तेवढेच धावपळीचे झाले. शहरातल्या वन रुम फारतर टू रुम किचनमधील स्वत:चाच संसार सांभाळताचा नाकीनऊ येऊ लागले. त्यात पाहुणे येतात म्हटले की कटकटच. टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपमध्ये सतत तोंड खुपसून बसलेल्या मुलांनाही आता पाहुणे ब्याद वाटू लागले. विज्ञानाने जग जवळ आणले पण माणूस मात्र माणसापासून दूर जाऊ लागला आहे. आता कावळ्यांनाही माणसातील हा बदल जाणवू लागला. घरावरील त्यांची काँव काँव थांबली. घरावरच काय आता शहरातही ते येईनासे झाले.
पण एक सांगतो, बाप्पा गजानना तू मात्र याला अपवाद आहेस. तुझ्या आगमनाची तर आम्ही चातकासारखी वाट पाहतो. खरं सांगू, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणून तुला आम्ही निरोप देतो ना! अगदी त्या क्षणापासून पुढच्या वर्षीच्या तुझ्या आगमनाकडे आमचे डोळे लागलेले असतात. तूसुद्धा दरवर्षी नित्यनेमाने येतोस. दहा दिवस हक्काने राहतोस आणि पुढच्या वर्षी नक्की येतो म्हणून निघूनही जातोस. कालही तू असाच निघून गेलास. निरोप देताना डोळे भरून आले. बाल मंडळीही अगदी हिरमुसली झाली.
असो...गेले बारा दिवस कसे भुर्रकन उडून गेले कळलेच नाही. या दिवसात आम्ही मोठ्या भक्तिभावाने तुझी आवभगत केली. यात काही कमतरता राहिली असल्यास आम्हाला क्षमा कर. पहिल्या दिवशी वाजतगाजत धूमधडाक्यात तुझी मिरवणूक काढायची होती पण, ती डॉल्बी की काय म्हणे कोर्टाच्या कचाट्यात सापडली होती. त्यामुळे लाऊडस्पीकर, बँण्डबाजाचा जल्लोष आम्हाला करता आला नाही. पण विसर्जनाला एक दिवस उरला असताना कोर्टाने सरकारचाच बँड वाजविला आणि आम्ही बँडबाजासह डीजेच्या कर्णकर्कश आवाजात तुझी विसर्जन मिरवणूक काढली. मला माहीत आहे या डीजेचे किंचाळणे तुला नक्कीच आवडले नसेल. आज या पृथ्वीला कितीतरी प्रकारच्या प्रदूषणांचा विळखा पडला आहे. त्यात हे ध्वनिप्रदूषण तर माणसाच्या आरोग्यावर उठले आहे. न्यायालयांचेही काही समजत नाही. अनेकवेळा त्यांच्या निर्णयात विसंगती जाणवते. न्यायालय कधी ध्वनिप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करून राज्य सरकारला झापते तर कधी नेमका त्याच्याशी विसंगत असा आदेश जारी होतो. राजकारण्यांची तर बातच सोडा. कोल्हापूरचेच उदाहरण घ्या!. डॉल्बीच्या मुद्यावर तेथे सरकारातील दोन पक्षच आपसात भिडले होते. भाजपाने डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा आग्रह धरला तर शिवसेनेने ‘आम्हाला डॉल्बी पाहिजेच’ चा हट्ट धरला. मुस्लिमांना मुभा मग हिंदूंनाच बंधन का? असा सेनेचा सवाल होता. बाप्पा गणेशा प्रत्यक्ष तुझ्या दरबारात ही मंडळी अशी भांडतात तर विधिमंडळ आणि संसदेत ते किती गोंधळ घालत असतील याची कल्पना तुला आलीच असेल. जातपात, धर्म याच्या पलीकडे आमचे राजकारण जातच नाही. वास्तविक पाहता ध्वनिप्रदूषण ही सामाजिक समस्या आहे. अशा मुद्यावरही ही मंडळी एकत्र येत नाहीत हा चिंतेचा विषय आहे. केवळ कायदे करून भागत नाही. त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पण प्रशासन याबाबतीत गंभीर नसते. गंभीर झाले तरी राजकारणी त्यात खोडा टाकतात. नद्यातील, तलावातील प्रदूषण टाळण्यासाठी नियम बनले नाहीत असे नाही, पण ते पाळणार कोण. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती नको, मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करा, मांगल्य तलावात टाकू नका असे कितीतरी नियम दरवर्षीच सांगितले जातात. पण पब्लिक ऐकत नाही आणि प्रशासनही ढिम्म असते. या प्रशासनाच्या कामकाजाचा फटका तुम्हालाही बसला असेल. आमच्या नागपुरातील रस्त्यांची हालत तर तुम्ही बघितलीच. येताना आणि जातानाही खाचखळग्यातून वाट काढताना तुमची पुरेवाट झाली असणार! आमच्यासाठी मात्र हे रुटीन आहे. गुळगुळीत सिमेंट रस्त्यांचे स्वप्न पाहत आज आम्ही खड्डे झेलतो आहोत. पुढच्या वर्षीपर्यंत हे रस्ते झालेच तर तुम्हाला हा त्रास होणार नाही याची नागपूर मनपाच्या वतीने आम्ही ग्वाही देतो. नाहीतर आमची मेट्रोसुद्धा येऊ घातली आहे. त्याची आजची गती बघता पुढच्या वर्षी एखादा टप्पा सुरू होऊ शकतो. असं करा बाप्पा पुढच्या वर्षी मेट्रोनेच या! हीच ती श्रींची (अर्थात तुमचीच) इच्छा.