बापरे.. नवऱ्यांचा पगार २८ लाख, तरीही बायका पोलिस ठाण्यात !

By सचिन जवळकोटे | Published: July 10, 2023 04:30 PM2023-07-10T16:30:30+5:302023-07-10T17:12:46+5:30

होय. एका संस्थेनं केलेला ‘ॲव्हरेज सॅलरी इन इंडिया’ सर्व्हे लोकांच्या मोबाईलवर गरागरा फिरू लागलेला.

Bapre.. Husband's salary is 28 lakhs, yet wives are in police station! servey of salary | बापरे.. नवऱ्यांचा पगार २८ लाख, तरीही बायका पोलिस ठाण्यात !

बापरे.. नवऱ्यांचा पगार २८ लाख, तरीही बायका पोलिस ठाण्यात !

googlenewsNext

सचिन जवळकोटे

आज सकाळपासून सोलापुरातल्या काही घरांमध्ये प्रचंड भांडणं पेटलेली. भांड्यांच्या आदळ-आपटीचा आवाज या भिंतीवरून त्या भिंतीवर रिफ्लेक्ट होऊ लागलेला. अनेक घरातल्या गृहिणी मुसमुसून रडू लागलेल्या, ‘नवऱ्यानं विश्वासघात केला,’ म्हणत माहेरी जाण्यासाठी बॅग पॅक करू लागलेल्या. वीकेंडनंतरचा पहिला दिवस म्हणून घाईघाईनं आवरून कामासाठी घराबाहेर पडू पाहणारे नवरे बावचळून गेलेले. गडबडून गेलेले.. कारण तसंच घडलेलं. अत्यंत धक्कादायक. आश्चर्यकारक. अनाकलनीय.

होय. एका संस्थेनं केलेला ‘ॲव्हरेज सॅलरी इन इंडिया’ सर्व्हे लोकांच्या मोबाईलवर गरागरा फिरू लागलेला. यात सर्वाधिक पगार घेणाऱ्या सात प्रमुख शहरांचा उल्लेख. मुंबई, बंगळुरू, दिल्ली, भुवनेश्वर, जोधपूर, पुणे अन्‌ हैदराबाद. थांबा.. गोष्ट एवढ्यावरच नाही थांबलेली. या सातही मोठ्या शहरांपेक्षा सर्वात जास्त पगार म्हणे एका दुसऱ्याच सिटीत मिळालेला. अन् या गावाचं नाव म्हणे सोलापूर. होय. होय.. चक्क सोलापूर !

पुणे-हैदराबादमध्ये सरासरी वार्षिक पगार १८ ते १९ लाख. दिल्ली-भुवनेश्वर-जोधपूर अन् मुंबईचा पगार १९ ते २१ लाख; परंतु सोलापूरकरांचा पगार म्हणे तब्बल २८ लाख १० हजार ९२ रुपये. बाप रे.. हे लिहितानाही आम्हा पामराचा हात थरथरलेला.. कारण या सर्व्हेनुसार एक सोलापूरकर दरमहा सव्वादोन लाख रुपये कमवू लागलेला. पॉईंट टू पॉईंट बोलायचं तर २ लाख ३४ हजार १७४ रुपये अन् ३३ पैसे.

.. अन् हाच आकडा वाचून आज सकाळपासून घराघरातल्या बायका हादरलेल्या, ‘आमच्या मालकांनी कधी सांगितलं नाही गं एवढा आकडा. तुझ्या नवऱ्याला किती पगार गं ?’ असं फोनाफोनी करून एकमेकींना विचारू लागलेल्या. नवऱ्याला मालक म्हणणं, ही सोलापूरची खासियत बरं का. भलेही तो एखाद्या किराणा दुकानात पुड्या बांधायला असला तरीही.

ड्यूटीवर चाललेल्या पुरुषांना या बायकांनी दारातच अडवलेलं, ‘एवढा पगार तुम्ही मला का नाही सांगितलात. आजपर्यंत एवढा मोठा विश्वासघात कसा काय करू वाटला तुम्हाला माझा ?’ या प्रश्नांच्या सरबत्तीनं सारीच नवरे मंडळी हादरून गेलेली. आजपावेतो बायकोपासून चोरून जास्तीत दोन-पाचशे रुपये बाजूला काढण्याइतपतच त्यांची मजल. तेही रात्री ‘सोडा वॉटर’च्या गाडीवर गुपचूप खर्च करण्यासाठी. त्यामुळे बायकोची समजूत काढता-काढता या मंडळींची पुरती त्रेधातिरपीट उडालेली. तेही ऑफिसमधल्या मित्रांना फोन करून ‘२८ लाख म्हणजे किती शून्य रे भाऊऽऽ?’ असा प्रश्न विचारू लागलेले.
 
काही बायका तर पोलिस ठाण्यातही पोहोचलेल्या. हा आकडा ऐकून तिथले ‘वसूलदार’ही हादरलेले. जेलरोड, जोडभावी, फौजदार चावडी अन् एमआयडीसी हद्दीतही एवढं कधी ‘मंथली कलेक्शन’ होत नाही, हे ते ठामपणे आपापल्या साहेबांना शपथेवर सांगू लागलेले.

  कार कंपन्यांचे कार्पोरेट ऑफिसरही सोलापूरच्या डीलर्सना फोन करून ‘अब शोलापुर का टार्गेट मल्टिपल बढाना होगा,’ अशी नवी स्कीम देऊ लागलेले.. ‘पण नवीन कार तर सोडाच, ३०-४० वर्षांपूर्वीच्या लूना-चॅम्पसारख्या अँटिक पीस खटारा गाड्या घेऊनच इथली कामगार मंडळी रस्त्यावर मोठ्या दिमाखात फिरताहेत,’ हे पटवून देता-देता सेल्स एक्झिक्युटिव्ह मंडळींच्या तोंडाला फेस सुटलेला.

  बीअर बारवाल्यांचीही तातडीची मीटिंग ठेवली गेलेली, ‘आपण रोज फुकट चकणा देऊनही लाखो रुपये कमावणारी मंडळी रस्त्यावरच्या चायनीज गाड्यांवरच का बसतात ?’ असा तळकट प्रश्न हॉटेल मालकांना पडलेला. हे सारं कमी पडलं की काय म्हणून सोलापूरच्या वधू-वर सूचक मंडळांना देशभरातून धडाधड मेसेज येऊ लागलेले, ‘काहीही करून आमची मुलगी तुमच्या सोलापुरातच द्यायचीय. चांगलं स्थळ पाठवा लवकर’.. परंतु गंमत अशी की या सूचक मंडळाचे संचालक सुट्टी घेऊन पुण्याला मुक्कामाला गेलेले. तिथंच चांगलं पॅकेज मिळतं म्हणून सोलापूर सोडून स्थलांतरित झालेल्या आपल्या लेकरांबाळांकडे.

विमान कंपन्यांचे खुद्द सीईओ सोलापुरात आलेले. मात्र रात्री त्यांची विमानं उतरण्यास इथं परवानगी नसल्यानं त्यांनी रिकाम्या ‘वंदे भारत’नं प्रवास केलेला. ‘२८ लाख कमविणारा सोलापूरकर चार-पाचशे रुपयांसाठी इंटरसिटीनंच का जातो,’ असाही गूढ प्रश्न या विमानवाल्यांसमोर उभा ठाकलेला.

सोलापुरात प्रचंड मोठा भूकंप घडविणारा हा ‘सॅलरी सर्व्हे’ नेमका कोणी केला अन् कसा केला, याचाही शोध आम्ही पामरांनी घेतलेला, तेव्हा अत्यंत आश्चर्यकारक माहिती हाती आलेली. सोलापुरात केवळ दोनच इसमांनी म्हणे इथं येऊन हा सर्व्हे केलेला. २८ लाख आकडा फायनल केलेला. क्या बात है.. १३-१४ लाखांच्या गावात दोनच लोकं घरोघरी फिरलेली. धन्य तो सर्व्हे. धन्य तो आकडा.

कदाचित असंही झालं असेल..

एसटीनं आलेली ही दोन माणसं स्टँडबाहेर पडलेली. समोरच्या टपरीवर गेलेली. त्यांनी सहजपणे टपरीवाल्याला विचारलेलं, ‘सॅलरी किती बसते ?’ तेव्हा हातातल्या चिट्ट्या भराभरा रखडत त्यानं खाली मान घालूनच नेहमीप्रमाणे तंद्रीत सांगितलेलं, ‘आज दोनावर आठ.. २८ बसला.’ शेजारी तोंडभरून ‘रवंथ’ करणाऱ्या तरुणालाही या टीमनं विचारलेलं, ‘तुमचा सॅलरी कोटा किती ?’ तेव्हा तोंडातला मावा इकडून तिकडं सरकवत अन् खिशातल्या पुड्या मोजत तोही पुटपुटलेला, ‘ रोज अठ्ठावीस.’

 पुढच्या चौकात ‘डीजे’वर काम करणारा बिहारी भेटलेला. त्यानंही मोठ्या तोऱ्यात खरंखरं सांगितलेलं, ‘जी हां.. इथं वर्षभरातल्या मिरवणुकांमधून मला मिळतो २८ लाख पगार. त्यासाठी पटना सोडून मी इथंच सेटल झालेलो. पुढच्या वर्षी माझं पॅकेज डबल  करणार असल्याचं माझ्या डीजे मालकानं ठरवलेलं.. कारण आणखी आठ-दहा नव्या जयंत्या इथल्या कार्यकर्त्यांनी हुडकून काढलेल्या.’

(लेखक लोकमत सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक, आहेत)

Web Title: Bapre.. Husband's salary is 28 lakhs, yet wives are in police station! servey of salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.