बापूशाही ! जिल्ह्याचं पालकत्व.. वेध बदलत्या समीकरणांचा !

By सचिन जवळकोटे | Published: November 10, 2019 07:35 AM2019-11-10T07:35:40+5:302019-11-10T07:37:26+5:30

लगाव बत्ती...

Baptism! The guardianship of the district. | बापूशाही ! जिल्ह्याचं पालकत्व.. वेध बदलत्या समीकरणांचा !

बापूशाही ! जिल्ह्याचं पालकत्व.. वेध बदलत्या समीकरणांचा !

googlenewsNext

- सचिन जवळकोटे

काय मंडळी...दिवाळी कशी साजरी झाली ? यंदाचा फराळ कसा होता ? लाडू-चिवडा संपला की नाही ? बालूशाही खाल्ली की नाही ?...एक मिनिट. ‘बालूशाही’वरून आठवलं. यंदा ‘बापूशाही’ जोरात दिसतेय आपल्याकडं. राज्यात ‘ओन्ली वन भाजप गाडी’ निघाली तर म्हणे ‘दक्षिण’चे ‘सुभाषबापू’... अन् ‘महाशिवआघाडी’ जमली, तर म्हणे ‘सांगोल्या’चे ‘शहाजीबापू’. आलं का लक्षात ? होय... होय. जिल्ह्याचं ‘पालकत्व’ मिळविण्यासाठी या दोन्ही ‘बापूं’नी लावलीय आपापल्या गॉडफादरकडे जोरदार फिल्डिंग. लगाव बत्ती...

‘देवेंद्रपंतां’शी जवळीक वाढतेय ‘सुभाषबापूं’ची !
‘काळजापूर मारुती’जवळच्या ‘देशमुख’ बंगल्यात बरीच वर्षे ‘पालकत्वाची खुर्ची’ नांदली. त्यांनी या पदाचा जिल्ह्याच्या विकासासाठी अन् पक्षाच्या भल्यासाठी किती फायदा करून घेतला हा भाग वेगळा; मात्र त्यांच्या मतदारसंघापुरतंच बोलायचं झालं तर, त्यांना यंदा भरभरून मिळालेल्या ‘लीड’मधूनच ‘उत्तर’ मिळालेलं. 

खरंतर, जिल्ह्यात पार्टीचा अजून एक ‘कॅबिनेट’ असतानाही ‘राज्य’मंत्र्याला ‘पालकत्व’ मिळावं, ही खदखद शेवटपर्यंत ‘लोकमंगल’ ग्रुपमध्ये राहिलेली. अनेकांच्या तक्रारी असतानाही ‘विजयकुमारां’ची खुर्ची टिकली, केवळ दोन गोष्टींसाठी. पहिली म्हणजे महाराष्ट्रातील ‘तम् तम् मंदीं’ना खूश ठेवणे. दुसरी म्हणजे ‘सुभाषबापूं’चा ‘गडकरी पॅटर्न’ जिल्ह्यात स्ट्राँग होऊ नये म्हणून त्यांचा विरोधी गट बळकट करणे; मात्र यंदाच्या निकालानंतर परिस्थिती पूर्णपणे पालटलीय. राज्यात ‘वारणानगर’चे ‘विनय’ तर ‘अक्कलकोट’चे ‘सचिनदादा’ हेही ‘तम् तम् मंदी’ नेते म्हणून निवडून आलेत. या दोघांचीही ‘देवेंद्रपंतां’सोबत खूप चांगली सलगी. त्यामुळं केवळ समाजाच्या पॉर्इंटवरच ‘विजयकुमारां’च्या नावाचा विचार झाला तर त्यांना दोन सक्षम पर्यायही पार्टीला मिळालेले. 
तशात पुन्हा ‘सुभाषबापूं’नी अलीकडच्या काळात आपली ‘पॉलिटिकल स्ट्रॅटेजी’ थोडीशी बदललेली. भलेही ते ‘गडकरी वाड्या’वरचे म्हणून ओळखले जात असले तरी आजकाल ‘देवेंद्रपंतां’सोबत अधिकाधिक जवळीक साधू लागलेले. शुक्रवारी जेव्हा स्वतंत्र सत्तास्थापनेसंदर्भात ‘पंत’ आपली भूमिका मीडियासमोर मांडत होते, तेव्हा त्यांच्यासोबत बसलेले ‘सुभाषबापू’ सा-या जगाला दिसलेले. सध्या पार्टीच्या कोअर कमिटीत असलेल्या ‘बापूं’वर ‘पंतां’चा विश्वास वाढत चालल्याचीच ही लक्षणं.

त्यामुळं यंदा कोणत्याही परिस्थितीत ‘बापूं’नाच ‘सोलापूरचं पालकत्व’ मिळणार, असा दावा ‘लोकमंगल’ बँकेच्या पिग्मी एजंटापासून ते ‘लोकमंगल’ कारखान्याच्या डायरेक्टरपर्यंत सारेच म्हणे करू लागलेत; पण थांबाऽऽ थांबाऽऽ हे कधी होणार ?...जर ‘कमळा’ला बहुमत मिळालं तरच. तोपर्यंत लगाव बत्ती.

...तर मग नक्कीच ‘शहाजीबापूं’चं नाव पुढं...

समजा ‘कमळ’वाल्यांचं सरकार आलंच नाही. थोरले काका ‘बारामतीकरां’च्या करामतीतून ‘धनुष्यबाण’वाल्यांचा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला तर जिल्ह्यातील एकमेव ‘बाण’वाल्या आमदाराची चांदीच चांदी. ‘सांगोल्याचे शहाजीबापू’ होऊ शकतात ‘लाल बत्ती’चे मानकरी. कदाचित त्यांनाच मिळू शकते ‘पालकत्वाची खुर्ची’...कारण ‘अकलूजच्या दादां’पासून ते ‘पंढरपूरच्या पंतां’पर्यंत सर्वांना नडण्याचं धाडस दाखवू शकतात केवळ तेच. फक्त पूर्वीच्या सवयीप्रमाणं कुणाला मॅनेज होऊ नये म्हणजे मिळविली.

‘बापू’ म्हणजे रांगडा गडी. बोलताना वाणी सुटली की, भल्याभल्यांची पंचाईत करून टाकणार. कदाचित याच स्वभावामुळं कैक वर्षे आमदारकीविना ‘अनवाणी’ फिरण्याची पाळी आलेली; मात्र यंदा ‘बाणा’चे एकमेव आमदार म्हणून ते निवडून आलेत.
खरंतर, ‘जिल्ह्याचं पालकत्व’ परंड्याच्या ‘तानाजीरावां’कडे दिली जाण्याची शक्यता दाट. मात्र त्यांना ‘सोलापूर’पेक्षाही ‘उस्मानाबाद’च्या राजकारणावर अधिक कमांड घ्यायची असल्यानं त्यांचा ओढा तिकडंच. तशात पुन्हा त्यांनी सोलापूूर जिल्ह्यात वेचून-वेचून निवडलेला एकही हिरा चमकला नाहीच. त्यांचा ‘सुपरहीट फॉर्म्युला’ पाचही ठिकाणी पुरता ‘फ्लॉप’ झाला. त्यामुळंच ‘शहाजीबापूं’चं नाव वरच्या पातळीवर येऊ लागलंय चर्चेत...पण या सा-या जर-तरच्या गोष्टी...कारण ‘कमळा’ऐवजी ‘बाणा’चं सरकार आलं तरच असं शकतं घडू. तोपर्यंत लगाव बत्ती....

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Baptism! The guardianship of the district.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.