बापूंचा टापू !
By सचिन जवळकोटे | Published: November 11, 2018 01:17 AM2018-11-11T01:17:17+5:302018-11-11T01:18:49+5:30
लगाव बत्ती
सचिन जवळकोटे
सहकारातल्या ‘एकमेका सहाय्य करू’ या शब्दाचा अर्थ सुभाषबापूंनी अचूकपणे ओळखलाय; मात्र ‘अवघे धरू सुपंथ’ऐवजी ‘अवघा उभा करू आपुला पंथ’ ही त्यांची नवी स्टाईल अनेकांना खुपू लागलीय. म्हणूनच की काय, ‘बापूंचा वारू’ सीना नदीच्या खो-यातच अडकविण्याचा चंग साºयाच विरोधकांनी बांधलाय...परंतु ‘बापूंचा टापू’ आता भीमा-कृष्णा नदीच्या खो-यापर्यंत किती अन् कसा पसरलाय हे समजेपर्यंत कदाचित लोकसभेचा निकालही लागला असेल.
बापूंना राजकारणात येऊन जवळपास २० वर्षे झाली. ‘मी एक साधा प्रोफेशनल उद्योजक आहे’ असं हळूच सांगत-सांगत त्यांनी सोलापूरचं राजकारण कधी कॅप्चर केलं, हे कुणालाच कळलं नाही; मात्र त्यांनी शनिवारी आयुष्यात प्रथमच जाकीट वापरलं. राज्याचं नेतृत्व करणाºयांची जाकीट परंपरा कदाचित बापूंनाही आवडू लागलीय वाटतं. असं असेल तर मात्र बापू...जरा जपून! जाकिटाच्या वाट्यात काटे लय हायती.
पूर्वीच्या काळी ‘हात’वाल्यांचे अनेक गट असायचे. दादा गट...पवार गट...चव्हाण गट. बरेच काही यंवऽऽ अन् त्यंवऽऽ गट. मुंबईत बसून या गटांची सूत्रं हलविली जायची. जिल्ह्यातली राजकीय यंत्रणा त्याप्रमाणं कामाला लागायची. आता पूर्वीचीच परिस्थिती पुन्हा एकदा डोळ्यासमोर तरळून जावी, अशी घटना नुकतीच घडली. मुंबईहून ‘पंतांचा कॉल’ येताच दिवाळीच्या पूर्वसंध्येला माढ्याच्या रणांगणावर जोरदार धमाका उडाला. ‘कमळ’वाल्यांची नवी रणनीती आम्ही पामरानं जगासमोर आणली. ‘उजनी’तल्या ‘पॉलिटिकल बोटिंग’चा रसभरीत वृत्तांत प्रत्येकानं आवडीनं वाचला. सहा तालुक्यांमधल्या सहा नेत्यांची गुप्त बैठक एका क्षणात जगजाहीर झाली.
खरंतर, या सा-या नाट्यामागं दडला होता म्हणे एक छोटासा कॉल. बार्शीतल्या देवगाव गोळीबार प्रकरणातून ‘रौतांचं रिव्हॉल्व्हर’ सहीसलामत सुटताच मुंबईतून थेट देवेंद्रपंतांचा कॉल आलेला, ‘राजाभाऊऽऽ अभिनंदन. आता जोरात कामाला लागा’ असं तिकडून सांगितलं गेल्यानंतर अजून एक छोटासा पण तेवढाच महत्त्वाचा संदेशही कानापर्यंत पोहोचला, ‘तेवढं माढ्याचंही बघा. जरा लक्ष ठेवा!’
... मग काय. राजाभाऊंचा कॉल संजयमामांना तत्काळ मिटींगचा मेसेज बाकीच्या सर्वांना सोलापूरच्या सुभाषबापूंनी माढ्याचा दौरा केल्यानंतर पंतांचा वरून निरोप येणं, हा कदाचित योगायोग असू शकतो काय? याचा गुंता वाचकांनी सोडवावा...परंतु राजाभाऊ, संजयमामा, जयाभाव, रणजितदादा, शहाजीबापू अन् उत्तमराव एकत्र आले हा ‘प्री प्लॅन्ड् योग’ होता. माढ्यात कोकाटेंना अन् बार्शीत मिरगणेंना रिचार्ज करणारे सुभाषबापू या सहाजणांपैकी कुणालाच नको होते. कदाचित बापू माढ्यात उभारले तर विटेपेक्षा दगड जड झाला असता. विजयदादा परवडले; परंतु सुभाषबापू नको, अशी अवस्था जिल्ह्यात या सा-यांची झाली असती...अन् हा धोका ओळखूनच राजाभाऊंनी संजयमामांच्या उमेदवारीची सुपारी घेतलेली. कोणत्याही परिस्थितीत मामांना लोकसभेला घोड्यावर बसवायचंच हा कमळाच्या साक्षीनं चंग बांधलेला.
...पण हाय. मामा म्हणजे तेल लावलेले कसलेले पैलवान. आजपर्यंत भल्या-भल्यांच्या हाताला लागले नाहीत. त्यांच्या एका हातात घड्याळ असतं, तर दुसºया खिशात धनुष्यबाणासंगे कमळही असतं. अनेक नव्या-जुन्या चिन्हांचे अँटीक पीस त्यांच्या बंगल्यात म्हणे भिंतीवर टांगलेले, डिक्टो बबनदादांची कॉपी. कदाचित त्याहीपुढची एडिशन. म्हणूनच की काय, कधी-कधी म्हणे दादांनाही मामांची धोरणं लवकर समजत नाहीत. असो...मामांना ‘उजनी’ जलाशयावरचा आमदार व्हायचंय की माण नदीकाठचा खासदार व्हायचंय हे काळच ठरवेल; मात्र त्यांना दिल्लीला पाठवू पाहणाºया राजाभाऊंनी आपल्या बार्शीतल्या पाणीटंचाईचाही प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ही जनतेची अपेक्षा.
तू मारल्यासारखं कर, मी कुरवाळल्यासारखं...
सुभाषबापूंच्या विरोधात प्रत्येक तालुक्यातली मंडळी एकत्र आली, ही बापूंसाठी धोक्याची घंटा की उलट त्यांच्या राजकीय घोडदौडीचं प्रतीक याचीच चर्चा सध्या गावोगावच्या पारावर सुरू...बापू तसे खूप धोरणी. सोलापूर सिटी पॅक करून ते आता जिल्हा बांधणीला निघालेले. बहुतांश साखर कारखानदारांच्या डोक्यावर सध्या त्यांनी हातचा राखून ठेवलेला, साखर आयुक्तांनी जप्तीची धमकी द्यायची अन् बापूंनी नंतर त्या संकटातून कारखान्यांना मुक्त करायचं त्वाऽऽ क्या बात है? तू मारल्यासारखं कर, मी कुरवाळल्यासारखं...
जिल्हा तर सोडाच, अवघ्या महाराष्टातच त्यांच्या सहकाराची मशाल फिरू लागलीय. ‘हात’वाला असो वा ‘घड्याळ’वाला...अनेकांना त्यांनी आतून आपल्यासोबत जोडून घेतलंय. कदाचित याचीच कुणकुण ‘वर्षा’पर्यंत पोहोचल्यामुळं की काय, त्यांचा वारू भीमा-सीना खोºयातच अडविण्याची चाल आखली जाऊ लागलीय. ‘बापूंचा टापू’ दक्षिणपुरतंच मर्यादित ठेवण्याची खेळी रंगू लागलीय. पाहूया भविष्यात काय होतंय ते...तोपर्यंत दर आठवड्याला आपण आपलं काम करत राहू. लगाव बत्ती...
कदमांचं धनुष्यबाण
जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारसंघात ब-याच राजकीय उलथापालथी होऊ लागल्यात, होऊ घातल्यात...परंतु मोहोळच्या इलाक्यात ऐन ‘आॅक्टोबर हीट’मध्येही थंडावाच जाणवलेला...कारण जोपर्यंत कदमांचे पाय इथल्या भूमीला लागत नाहीत, तोपर्यंत म्हणे ख-या अर्थानं इथं धुरळा उडणार नाही...पण आतली गंमत सांगू का? मुंबईत ‘आत’मध्ये बसूनच रमेशदादांनी म्हणे राजकीय बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतलाय. भलेही त्यांची निष्ठा धाकटे दादा बारामतीकरांसोबत असली तरी घड्याळाच्या विश्वासघातकी काट्यांवर त्यांचा प्रचंड राग. म्हणूनच की काय, भविष्यात हातात धनुष्यबाण घेऊन विरोधकांचे शरसंधान करण्याचे मनसुबे आखले जाऊ लागलेत.
दादांच्या घरातल्या मंडळींना महामंडळाच्या गुन्ह्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी वाघोलीच्या लक्ष्मणरावांकडं शब्द टाकलेला. शत्रूच्या संकटात शत्रूच कामाला आलेला...मुंबईच्या रुग्णालयात स्वत: अॅडमिट होऊन तिथं लक्ष्मणरावांना भेटीची संधी साधलेली. घरच्यांना घेऊन लक्ष्मणरावांनी ‘वर्षा’काठी भेटही घेतलेली. त्यातून काय निष्पन्न झालं, याचा अद्याप कुणालाच शोध लागला नसला तरी अजून एक लक्ष्मणाची या प्रकरणात एन्ट्री झालीय. या लक्ष्मणाच्या हातातील धनुष्यबाणाचा वापर करून लवकरात लवकर वनवासातून सुटका करून घेणं एवढं एकच लक्ष्य म्हणे सध्या दादांच्या डोळ्यासमोर. म्हणूनच की काय, दोघांमधली जवळीक प्रचंड वाढत चाललीय. मुंबईत तारखेला भेटीगाठी होऊ लागल्यात. आता तुम्ही म्हणाल...हे दुसरे ‘लक्ष्मण’ कोण? आता गळ्यात भगवं उपरणं घालून फिरणारी मंडळी आपल्या ‘लक्ष्मीकांत’ला लाडानं ‘लक्ष्मण’ म्हणतात, हे विसरलात की काय तुम्ही ?
टीप : कदमांच्या घोटाळ्याबाबत आम्ही मोहोळच्या वाड्या-वस्त्यांवर राजन मालकांना भेटण्याचा प्रयत्न केला; मात्र ते कानात हेडफोन घालून दिवाळीची पहाटगाणी ऐकण्यात तल्लीन झालेले. त्यातलं ‘नक्षत्राचं देणं’ हे गाणं तर म्हणे त्यांना खूप हेलावून टाकणारे ठरलं. लगाव बत्ती...
(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)