बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!

By विजय दर्डा | Published: September 30, 2024 07:24 AM2024-09-30T07:24:20+5:302024-09-30T07:25:36+5:30

ज्यांच्या मार्गावरून चालावे असे जगातल्या अनेकांना वाटते, त्या गांधीजींबद्दल भारतातल्या तरुणांनाच फारशी माहिती नसावी, हे दुर्दैव नव्हे तर दुसरे काय?

Bapu mahatma gandhi, how good it would be if you could meet again! | बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!

बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!

- डाॅ. विजय दर्डा,
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

तुम्ही गांधीजींना भेटलेले नसणार. मीही बापूंना भेटलो नाही. परंतु माझे बाबूजी, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या माध्यमातून बापूंना समजून घेण्याची संधी मला मिळाली. बापूंविषयी जाणून घ्यायचे असेल तर सेवाग्रामला जायला हवे. तिथे आजही बापू ‘राहतात’. जगभरात आज ज्या धारणांचा स्वीकार केला जातो त्या धारणांशी संबंधित सगळे प्रयोग बापूंनी सेवाग्रामच्या पुण्यभूमीतच केले होते. दोन-तीनशे वर्षांनंतर गांधीजींना लोक नक्कीच देवाच्या जागी मानतील. ‘हाडामासांचा असा कुणी माणूस कधीकाळी या भूमीवर चालत होता यावर येणाऱ्या पिढ्यांचा कदाचित विश्वास बसणार नाही’ असे आइन्स्टाइन यांनी म्हटले होतेच. गांधीजी होतेच तसे. 
जरा विचार करा, त्या काळातला खूप शिकला सवरलेला एक माणूस ज्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नाही अशा शक्तिशाली ब्रिटिश साम्राज्यासमोर बेधडक उभा राहतो, हे कुणा सामान्य माणसाला जमले असते का? स्वतःच्या उपवासाला अहिंसक शस्त्र म्हणून विकसित करणारा माणूस साधारण कसा असेल? सुटाबुटात वावरणारा माणूस स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेण्यासाठी एक दिवस ठरवतो की आता यापुढे संपूर्ण आयुष्यभर पंचा नेसायचा. हे कसे घडत असेल?  हा माणूसही त्यांच्यातलाच एक आहे असे देशवासीयांना वाटावे, हा त्यामागचा हेतू होता. गांधीजींच्या चरख्याने ब्रिटिश सरकारच्या आर्थिक कण्यावर आघात केला. गांधीजींच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचे  विश्लेषण करताना लक्षात येते की, गांधीजींसारखा नेता आता पुन्हा होणे नाही. परंतु माझी इच्छा मात्र अशी आहे की आपल्याला पुन्हा एक गांधी मिळावा.

काही नेते आणि आजच्या पिढीतले काही लोक गांधीजींवर हटकून टीका करतात. असंबद्ध बोलतात. त्यांना गांधी कळलेलेच नाहीत. त्यांना माझा एक साधा प्रश्न आहे - जर सामान्य माणूस स्वातंत्र्य आंदोलनात उतरला नसता तर इंग्रज हा देश सोडून गेले असते का? सामान्य माणूस आंदोलनात पुढे सरसावल्यानेच इंग्रजांना हार मानावी लागली. ही चेतना गांधीजींनी निर्माण केली होती. इंग्रजांना असहकाराची भावना त्यांनी संपूर्ण देशात जागी केली. स्वातंत्र्याची अशी लालसा उत्पन्न केली की छोटी छोटी मुलेही स्वातंत्र्य आंदोलनात उतरली. 

माझे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जवाहरलाल दर्डा यांच्याकडून मी त्या काळातले अनेक किस्से ऐकले आहेत. त्यातल्या एका प्रसंगाने मला अत्यंत प्रभावित केले.  गांधींना तत्कालीन सम्राट जॉर्ज पंचम यांच्या भेटीसाठी इंग्लंडला जायचे होते. पंचा लावलेल्या गांधीजींच्या पोशाखामुळे इंग्रज अधिकारी बिचकत होते. परंतु गांधीजी आपल्याच साध्या वेशात सम्राटाला भेटायला गेले. त्या भेटीहून परत आल्यावर कोण्या पत्रकाराने त्यांना विचारले, असा पंचा नेसून सम्राटाच्या भेटीला जाणे उचित होते का?- त्यावर गांधीजी उत्तरले, ‘आमच्या वाट्याचे कपडेही राजानेच परिधान केले होते.’ 

- विचार करा, हा किती मोठा आघात होता?
गांधीजींची राहणी, विचार आणि वर्तन असे होते की देशाने त्यांना प्रेमाने महात्मा म्हणणे सुरू केले. लोक म्हणाले, ‘बापू तर राजनेता होण्याचा प्रयत्न करणारे संतच आहेत !’...तेव्हा गांधीजींनी आक्षेप घेऊन म्हटले की, ‘तसे नाही, ‘मी संत होण्याचा प्रयत्न करणारा राजनेता आहे’ अशी वाक्यरचना मी पसंत करीन.’ ज्या सत्य, अहिंसेच्या मार्गावरून ते निघाले होते, तो मार्ग काही आपण शोधून काढलेला नाही, तो कितीतरी जुना मार्ग आहे, असेही बापू म्हणत असत. हिंसा कुठल्याच प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही हे त्यांना ठाऊक होते. यामुळेच जगभरातील लोक गांधी विचारांनी प्रभावित झाले. अमेरिकेत नागरिकांच्या अधिकारांसाठी संघर्ष करणारे मार्टिन ल्यूथर किंग यांनीही गांधींचा मार्ग स्वीकारला. जगभरातील डझनावारी देश बापूंनी दाखविलेल्या मार्गाने जाऊन स्वतंत्र झाले.

महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काम केले नाही, तर स्वातंत्र्यानंतर देशाची प्रगती कशी होईल याचा मार्गही त्यांनी मोकळा केला, हे नव्या पिढीला माहीत असले पाहिजे. गावं विकसित झाली नाही तर देशाचा खरा विकास होणार नाही असे ते म्हणत. ग्रामविकासाची संकल्पना त्यांनीच मांडली. स्वच्छतेची गरज सामान्यांपर्यंत पोहोचविली. महिलांनी शिक्षणाच्या रस्त्याने पुढे जाऊन आत्मनिर्भर व्हावे हा रस्ता त्यांनीच दाखविला. त्यांच्या जीवनात प्रेरणादायी असे इतके धागे आहेत की त्यातून मिळणारी प्रेरणा आजच्या तरुणांच्या जीवनाचा आधार बनू शकते. परंतु, आजच्या तरुणांना गांधीजींच्या बाबतीत फारसे काही माहिती नाही, असे का? हा मोठा प्रश्न आहे. अशा महान व्यक्तीच्या बाबतीत व्यवस्थित आणि विवेचनात्मक पद्धतीने तरुण पिढीला माहिती देण्याची जबाबदारी व्यवस्थेची नाही का? जगातील ८० पेक्षा जास्त देशांत स्मारके, पुतळे असलेले गांधीजी हे एकमेव भारतीय आहेत. विदेशी विद्यापीठात गांधींच्याविषयी शिकविले जाते. परंतु, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सेवाग्राम उपेक्षित आहे आणि खुद्द भारतातल्या शिक्षणातून बापू गायब आहेत. जाती, धर्म, वंश आणि वर्णाच्या आधारे विष पसरविले जात आहे. असे करणाऱ्यांनी बापूंचा अभ्यास करावा. त्यांनी माहीत करून घ्यावे, समजून घ्यावे; मग त्यांना कळेल की ते समाजात कसे विष पसरवत आहेत. 

आज प्रत्येकाची हीच इच्छा आहे की, सरकारने एक आंतरराष्ट्रीय ‘प्रेरणास्थळ’ म्हणून सेवाग्रामचा विकास करावा; आणि गांधी चित्रपटाचा शिक्षणात समावेश करावा. या देशापुढील प्रश्नांचे खरे उत्तर बापूंनी दाखविलेल्या मार्गांवरच मिळणार, हे निश्चित आहे !

Web Title: Bapu mahatma gandhi, how good it would be if you could meet again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.