बापू, ‘अंग चोरणे’ कधी सोडणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 07:03 AM2017-07-21T07:03:04+5:302017-07-21T07:03:04+5:30

राज्यातील एक वजनदार मंत्री म्हणून क्रांतिकारी निर्णयाचे धनी ठरलेले सुभाषबापू देशमुख जिल्ह्याच्या राजकारणात मात्र ‘अंग चोरून’ काम करताहेत. ते ‘खुलके बॅटिंग’ कधी करणार...?

Bapu, when will the 'organ steal' leave? | बापू, ‘अंग चोरणे’ कधी सोडणार ?

बापू, ‘अंग चोरणे’ कधी सोडणार ?

Next

- राजा माने

राज्यातील एक वजनदार मंत्री म्हणून क्रांतिकारी निर्णयाचे धनी ठरलेले सुभाषबापू देशमुख जिल्ह्याच्या राजकारणात मात्र ‘अंग चोरून’ काम करताहेत. ते ‘खुलके बॅटिंग’ कधी करणार...?

कोणत्याही क्षेत्रात झोकून देऊन काम करणे आणि अंग चोरून काम करणे हे दोन्ही प्रकार चर्चेचे तर कधी कधी कौतुकाचे ठरत असतात. राजकारणातही ‘अंग चोरून’ काम करणे हा अनेकांच्या राजकीय चातुर्याचा भाग असतो. हे चातुर्य अनेकांना यशही मिळवून देते. काही जणांच्या बाबतीत मात्र सामर्थ्य, क्षमता आणि गुणवत्ता असूनही हा प्रकार राजकारणातील ‘गतिरोधक’ ठरतो. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक जिल्ह्यांचे राजकारण अशाच गतिरोधकांच्या गर्तेत अडकल्याचे दिसून येते. क्रिकेटमध्ये ‘फिल्ड का मुआयना’ करून फटकेबाजी करणाऱ्याचे कौतुक होते. पण फक्त ‘मुआयना’ करण्यातच वेळ गेला तर क्रिकेटशौकिनांच्या रोषाचे धनी तर ठरावे लागतेच लागते, शिवाय आपला संघही पराभवाच्या छायेत लोटण्याचे पाप त्या खेळाडूच्या माथी येते. असाच काहीसा प्रकार सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात चालल्याचा अनुभव सध्या येतोय.
दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या भाजपची सत्ता आहे. तरीही सोलापूर जिल्हा भाजपमय झाला किंवा भाजपचे संघटन गावपातळीवर पोहोचले असे म्हणणे धाडसाचे ठरावे अशीच परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यारोहण झाल्या दिवसापासून राज्यमंत्री असलेले विजयकुमार देशमुख हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना जिल्हा प्रेमाने ‘मालक’ म्हणतो. त्यांचा गोड सुस्वभाव आणि कार्यपद्धतीचा सोलापूरकरांना चांगला परिचय असल्याने पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडून फारशा अपेक्षा ठेवण्याचे धाडसही कुणी केले नाही. त्यानंतर एक वर्षापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सुभाषबापू देशमुख थेट कॅबिनेट मंत्री म्हणून सहभागी झाले. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगसारखी मजबूत खाती त्यांना मिळाली. त्या खात्यांवर त्यांनी आपली मजबूत मांडही बसविली. राज्यातल्या वजनदार मंत्र्यांपैकी एक, असा त्यांचा कौतुकाने उल्लेखही होऊ लागला. तळमळ, धडाडी आणि नवे घडविण्याची महत्त्वाकांक्षा या सद्गुणांच्या बळावर त्यांनी आपल्याकडे असलेल्या खात्यांवर आपल्या कर्तृत्वाची मोहोरही उठविली. ज्याचा सात-बारा तो सोसायटीचा सदस्य यासारख्या क्रांतिकारी निर्णयाबरोबरच बाजार समिती, जिल्हा बँका यांच्या कारभार व निवडणूक प्रक्रियेत पारदर्शीपणा आणण्याचे खंबीर धोरणही त्यांनी अंगीकारले. उपसा सिंचन योजना असो वा सहकारी रुग्णालय असो त्यांच्याबाबतीत नवा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी राज्यापुढे ठेवला. आठवडी बाजाराची संस्कृती सुदृढ करताना राज्यातील बाजार समित्या डिजिटल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पीक तारण कर्ज योजनेपासून ते मुक्त कृषी व्यापारांपर्यंतची त्यांची भूमिका शाबासकीस पात्र ठरली. या पार्श्वभूमीवर मंत्री म्हणून बेफाम बॅटिंग करणारे सुभाषबापू देशमुख हे ‘अंग चोरून’ काम कसे करतात? असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो.
मंत्री म्हणून राज्याच्या राजकारणात चौफेर टोलेबाजी करणारे सुभाषबापू सोलापूर जिल्ह्यात मात्र अंग चोरूनच काम करताहेत, असे म्हणायला खूप मोठा वाव आहे. सोलापूर महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. सोलापूर जिल्हा परिषद ‘तोंडी’ भाजपच्या ताब्यात आहे. जिल्ह्याला एक खासदार, दोन मंत्री आणि विधान परिषदेतील एक सहयोगी आमदार लाभलेला आहे. तरीही शहर आणि जिल्हा भाजपमय झाला आहे का? या प्रश्नाचे उत्तर सोलापूर जिल्ह्याला आणि संघ परिवारालाही सापडत नाही. महापालिकेत सत्ता असूनही कोणाचाच मेळ कोणाला नाही. तो मेळ घालण्याचा प्रयत्न देशमुख ‘मालक’ही करीत नाहीत आणि सुभाषबापूही करीत नाहीत. उलट दोन्ही देशमुखांच्या पक्षातल्या ‘गढ्या’ अधिक मजबूत होताना दिसताहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत सर्वांनी संपूर्ण शक्ती लावल्याचे चित्र निर्माण झाले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे हे मात्र आजही अपक्ष आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्तही दोन्ही देशमुख काढू शकलेले नाहीत. म्हणूनच आता सुभाषबापूंसारख्या नेत्यांना ‘बापू, अंग चोरून काम करणे कधी सोडणार?’ असा सवाल करीत आता जिल्ह्याच्या राजकारणात ‘खुलके बॅटिंग’ करा, असेच म्हणावे लागेल.

 

Web Title: Bapu, when will the 'organ steal' leave?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.