बापूंचा कांदा... जनतेचा वांधा !
By सचिन जवळकोटे | Published: May 10, 2018 12:18 AM2018-05-10T00:18:18+5:302018-05-10T00:18:18+5:30
‘परवडत नसेल तर कांदा खाताच कशाला? द्या की सोडून,’ असं सोलापूरच्या सुभाष बापूंनी जनतेला ठणकावून सांगताच ‘कांदा भजी’ गाडीवाल्यांची घाबरगुंडी उडालेली.‘बापू कायऽऽ नेहमीच काही-बाही बोलत राहतात... पण त्यापायी आपल्या पोटावर पाय पडायला नको,’ या भीतीपोटी या विक्रेत्यांनी ‘कांदा भजी’चं मार्केटिंग करण्याचं ठरविलं. सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेण्याचा घाटही घातला गेला.
‘परवडत नसेल तर कांदा खाताच कशाला? द्या की सोडून,’ असं सोलापूरच्या सुभाष बापूंनी जनतेला ठणकावून सांगताच ‘कांदा भजी’ गाडीवाल्यांची घाबरगुंडी उडालेली.‘बापू कायऽऽ नेहमीच काही-बाही बोलत राहतात... पण त्यापायी आपल्या पोटावर पाय पडायला नको,’ या भीतीपोटी या विक्रेत्यांनी ‘कांदा भजी’चं मार्केटिंग करण्याचं ठरविलं. सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेण्याचा घाटही घातला गेला.
त्यानुसार, गाडीवाला बंड्या सुरुवातीला ‘कृष्णकुंज’वर ‘राज’ना भेटला. ‘मी नाकानं कांदा सोलणाऱ्यांवर साधं कार्टूनसुद्धा काढत नसतो. मला नका सांगू तुमचं कांदा पुराण,’ असं फटकारत ‘राज’नी बंड्याला पिटाळलं.
नासक्या कांद्यासारखा चेहरा करत बिचारा बंड्या अजितदादांकडं गेला. तिथं अगोदरच डिस्मूड होऊन बसलेले धनंजय दादा दिसताच बंड्याला अधिकच गलबलून आलं. आता पद गेल्यामुळं ते निराश झाले होते की बीड-लातूरमध्ये रमेशरावांनी कलटी मारल्यानं काळजात ‘धस्स’ झालं होतं, याचा काही अंदाज लागला नाही. ‘कांदा भजी’चा विषय काढताच अजितदादा तडकले, ‘मला भजी-बिजी नाही आवडत. उजनी धरणातले फिश-बिश असतील तर सांगा.’
... दचकलेला बंड्या मग क-हाडच्या पृथ्वीबाबांकडं गेला. ते म्हणे कर्नाटकच्या दिशेनं देव पाण्यात ठेवून बसलेले. ‘भविष्यात विधानसभा की राज्यसभा’ हा त्यांचा निर्णय म्हणे बेंगळुरूच्या निकालावरच अवलंबून असलेला. ‘कांदा भजी’बद्दल विचारताच त्यांनी चक्क डबल प्लेटची आॅर्डर दिली, ‘एक प्लेट मला.. अन् एक आमच्या उंडाळ्याच्या लाडक्या विलास काकांना,’ असं बाबांनी सांगताच बंड्या पुटपुटला, ‘ही उपरती पाच वर्षांपूर्वीच झाली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती.’
असो. बंड्या नंतर थोरले काका बारामतीकर यांच्याकडे गेला, ‘कांदा भजी खाणार का?’ या प्रश्नावर काका पुटपुटले, ‘नको. जागा कुठं शिल्लक आहे?’ बंड्या दचकला. त्यानं जागेच्या संदर्भासाठी सुप्रिया तार्इंकडं बघितलं, ‘आत्ताच जेवण झाल्यामुळं पोटात जागा नाही, असं साहेब म्हणताहेत,’ तार्इंनी गडबडीनं खुलासा करताच बंड्या ‘लवासा’कडं बघत गालातल्या गालात हसत बाहेर पडला.
‘मातोश्री’वर ‘उद्धो’ भेटले. त्यांनी मात्र, ‘कांदा भजी’ खाण्यास होकार दर्शविला. ‘तुम्ही शिव-भजीचा दादरला स्टॉल लावा. मात्र, तिथं ढोकळा सोडून बाकी अॅटम ठेवा. गुजराती डिश मला बिलकूल नाही आवडत.’
बंड्यानं खुशीत ‘वर्षा’ बंगला गाठला. इथं कदाचित आपली मराठी भजी चालणार नाही. नेहमीप्रमाणं फाफड्याचीच फर्माईश होईल, अशी त्यानं खूणगाठ बांधली. मात्र, घडलं उलटंच.
‘डुंगरी नां भजीयां गमशे के?’ असं बंड्यानं गुजराती भाषेत विचारताच देवेंद्रपंतांनी ‘इल्लाऽऽ इल्ला... नमगे हुुग्गी बेकू,’ अशी चक्क कन्नडमध्ये आॅर्डर दिली. सोबतच्या विनोद-सुधीर जोडगोळीनंही ‘हौदूऽऽ हौदूऽऽ’ अशी कानडी पुस्ती जोडताच बंड्या पुरता उडाला. मानसिक धक्क्यानं बेशुद्ध पडला. कर्नाटकातील नरेंद्रभार्इंच्या कन्नड भाषणाची लाट इथंही येऊन पोहोचलीय, हे बंड्याला सांगण्यासाठी तो प्रथम शुद्धीवर येणं गरजेचं होतं. तेव्हा सुभाष बापूंनी सहका-यांना हाक मारली, ‘एऽऽ कुणीतरी कांदा आणा रे हुंगवायला.’