बारामतीची साखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:36 AM2017-08-31T01:36:00+5:302017-08-31T01:36:13+5:30
बारामतीची साखर हा अलीकडे चर्चेचा विषय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे मिष्किली करण्यात आणि भल्याभल्यांना शब्दात पकडण्यात पटाईत आहेत.
बारामतीची साखर हा अलीकडे चर्चेचा विषय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे मिष्किली करण्यात आणि भल्याभल्यांना शब्दात पकडण्यात पटाईत आहेत. राजकारणाचा दांडगा अनुभव आणि देशातील कृषी, संरक्षण अशी मंत्रिपदे शिवाय राज्याचे मुख्यमंत्रिपद संभाळलेले शरद पवार यांनी अलीकडेच हवामान खात्याला साखरेचं पोतं भेट देऊन चर्चेचा विषय केला आहे. त्यापूर्वी त्यांनी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर बारामतीची साखर वाटू अशी पैज लावली होती. योगायोगाने हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि पवार यांनी पुण्याच्या हवामान खात्याला माळेगावच्या कारखान्यातून एक साखरेचे पोते पाठवले. शेती आणि हवामान खाते याचा घनिष्ठ संबंध आहे. मेपासून मान्सूनची भाकिते ऐकताना माध्यमे हवामान खात्याच्या भाकितांना ठळक प्रसिध्दी देतात. वैशाख वणव्यातच आषाढ श्रावणामध्ये येणाºया पावसाची भाकिते ऐकून बळीराजा सुखावतो. या अंदाजावर शंभर टक्के कुणाचाच विश्वास नसतो तरीही भारतीय हवामान खात्याचे अंदाज हे जगाच्या तुलनेत सरस आहेत हे मान्य करावे लागते. वाºयाची दिशा, वाºयाचा वेग , तापमान यावरून हे अंदाज बांधले जातात. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या ही जगाला भेडसावत असून त्यामुळे हवामानात कधी बदल होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे अंदाज बांधणे शास्त्रज्ञांनाही कठीण जाऊ लागले आहे. हवामानाचे अंदाज यावर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेनेही अविश्वास दाखवत हवामान खात्याला लिंबू मिरची बांधून वैज्ञानिकांची दृष्ट काढली होती. हवामान खात्याचे अंदाज चुकण्यात ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे आणि ते वाढवण्यास आपणच कारणीभूत आहोत हे मात्र सोयीस्कर विसरतो. मे-जूनमध्ये हवामान खात्याच्या अंदाजाला महत्त्व देणारी माध्यमे आणि हवामानाच्या अंदाजावर अभ्यास करणारे वैज्ञानिक यांच्या परिश्रमाला मातीमोल केल्यासारखे आहे. कृषी आणि हवामान खात्याची सांगड असताना केंद्रात कृषी मंत्री असलेल्या शरद पवार यांना हवामान खात्याच्या अंदाजावर विनोद करणे ठीक आहे पण साखर वाटणे कसे काय सुचले हेच कळत नाही. हवामान खात्याचे अंदाज हे अंदाजच असतात. फार तर त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते किंवा ते तंतोतंत करण्यासाठी हवामान खात्याचे अधुनिकीकरण करण्यासाठी उपाय सुचवले जाऊ शकतात. त्यांनी त्याची सुरुवात कृषी मंत्री असताना केली असती तर त्याची फळे आज शेतकºयांना मिळाली असती.