बारामतीकरांचा कमळाला पाठिंबा
By सचिन जवळकोटे | Published: May 31, 2018 05:33 AM2018-05-31T05:33:15+5:302018-05-31T05:33:15+5:30
मोबाईलमध्ये म्हणे आॅडिओ-व्हिडीओ क्लिप्स् जोडण्याचे अन् तोडण्याचे कैक अॅप पडून होते.
देवेंद्रपंतांचं वाक्य ‘तोड-मोड के जोड’ करून जगाला ज्या पद्धतीनं ऐकविलं गेलं, ते ऐकून गल्लीतला बंड्या पुरता झपाटून गेला. कारण त्याच्याही मोबाईलमध्ये म्हणे आॅडिओ-व्हिडीओ क्लिप्स् जोडण्याचे अन् तोडण्याचे कैक अॅप पडून होते. त्यानं याचा वापर करून बऱ्याच नेत्यांच्या भाषणांच्या अजब-गजब क्लिप्स् बनविल्या. जेणेकरून ‘यू-ट्यूब’वर हजारो हिटस् मिळावेत.
प्रत्येक नेत्याचं त्यानं एकच मधलं वाक्य लोकांना ऐकविलं. खळबळ माजवून देणाºया या वाक्याच्या मागचं अन् पुढचं वाक्य पद्धतशीरपणे गायब केलं. मात्र, म्या पामरानं ते बरोबर हुडकून काढलं. या मधल्या वाक्यामुळं जी काही गंमत झाली, ती कथन करण्यापलीकडची होती.
थोरले काका बारामतीकरांचं हे वाक्य भलतंच गहजब माजवून गेलं. काका म्हणाले की, ‘आमचा पाठिंबा कमळवाल्यांनाच.’
परंतु मूळ वाक्य असं होतं, ‘धनुष्यवाल्यांनी जर सरकार पाडलं तर... आमचा पाठिंबा कमळवाल्यांनाच, असं मी बिलकूल म्हणणार नाही, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकतं.’
यानंतर बंड्यानं कदमांच्या रामदासांची लय भारी क्लिप फिरविली.
रामदासभाऊ म्हणाले म्हणे, ‘प्रदूषण तर माझ्या जीभेलाच झालंय. आता नियंत्रण आणायलाच हवं.’
त्यांचं ओरिजनल वाक्य असं असावं, ‘सकाळी उठल्या उठल्या मी आरशात बघितलं, तेव्हा दिसलं की... प्रदूषण तर माझ्या जीभेलाच झालंय. नियंत्रण आणायलाच हवं. अखेर मी उद्धोंच्या ओंजळीनं पाणी पिऊन त्यांच्या खाल्ल्या मिठाच्या गुळण्या केल्या.’
यानंर बाजारात क्लिप आली ‘कृष्णकुंज’वरच्या राज यांची. ते म्हणत होते, ‘किमान माझ्या कार्टूनला तरी मत द्या.’
आता खरं वाक्य काय असेल, कल्पना करा बघू... ‘तुम्ही सारे जसं माझ्या भाषणाला टाळ्या वाजविता, तसंच किमान माझ्या कार्टूनला तरी मत द्या.. पण मत म्हणजे प्रतिक्रिया होऽऽ कारण ‘त्या’ मतांची अपेक्षा तर मी केव्हाच सोडून दिलीय.’
यानंतर आवाज ऐकू आला विनोदभाऊंचा, ‘बहुधा यंदा आमचा ‘निकाल’ लागणार.’
...मात्र मूळ वाक्य पुढीलप्रमाणं, ‘गेल्या वर्षी विद्यापीठाची परीक्षा प्रक्रिया खोळंबली होती. बहुधा यंदा आमचा ‘निकाल’ लागणार... कारण आता स्वत:चं मार्केटिंग कमी करून आम्ही खºया अर्थानं कामाला लागलोय.’
यानंतर ‘उद्धों’चीही आॅडिओ क्लिप बंड्यानं तयार केली, ‘मला महाराष्ट्राचा कुमारस्वामी व्हायला आवडेल.’
... परंतु ते प्रत्यक्षात असं म्हणाले होते, ‘पृथ्वीबाबा कºहाडकर अन् अशोकभाऊ नांदेडकर यांना कदाचित वाटत असेल की... मला महाराष्ट्राचा कुमारस्वामी व्हायला आवडेल. मात्र माझा सिद्धरामय्या होणार की येडियुरप्पा, याची पैज माझेच सहकारी लावू लागलेत.’
बंड्यांच्या या साºया क्लिप्स् भलत्याच गाजल्या. अनेकांनी केवळ गंमत म्हणून या कानानं ऐकून दुसºया कानानं सोडून दिल्या. आपणही इथं वाचून सोडून द्याव्यात. मात्र, यदाकदाचित भविष्यात नेत्यांची ही मधली वाक्यं प्रत्यक्षात उतरली तर मात्र, तो योगायोग समजू नये.
- सचिन जवळकोटे