चळवळीचा आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:43 AM2018-03-28T02:43:33+5:302018-03-28T02:43:33+5:30

स्वातंत्र्यानंतर सर्वच क्षेत्रात बदलाचे वारे सुरू झाले होते. त्यातून साहित्य क्षेत्र सुटणे शक्य नव्हते. किंबहुना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय

Base of movement | चळवळीचा आधारवड

चळवळीचा आधारवड

Next

स्वातंत्र्यानंतर सर्वच क्षेत्रात बदलाचे वारे सुरू झाले होते. त्यातून साहित्य क्षेत्र सुटणे शक्य नव्हते. किंबहुना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, अशा बहुआयामी बदलांची चाहूल साहित्यातूनच परावर्तित होताना दिसत होती. यातून ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य या दोन प्र्रवाहांनी मराठी साहित्याला वेगळी दिशा दिली. हा वैचारिक मंथनाचा स्फोटक काळ होता. डॉ. जनार्दन वाघमारे यांनी तर याचे वर्णन मराठी साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राचे 'वॉटर शेड' असे केले आहे. या विद्रोही विचारांचा सम्यक विचार करून त्याला योग्य दिशेने प्रवाहित करण्याचे काम डॉ. गंगाधर पानतावणे यांनी गेले अर्धशतक निष्ठा आणि बांधिलकीने केले. ते करताना या प्रवाहात त्यांनी दलित साहित्यिकांच्या तीन पिढ्या सामावून घेतल्या. भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानावर आधारित साहित्य चळवळ उभी करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. कारण ही विद्रोही चळवळ मार्क्सवादाच्या मार्गाने जाण्यापेक्षा बुद्ध आणि आंबेडकरांच्या विचारांच्या मार्गाने वळविण्याचे श्रेय पानतावणे यांना द्यावे लागेल. दलित साहित्य हे शोषण, दमनाच्या विरोधात बंड करून उठले होते. त्यावेळी त्याला एका समतोल विचारांच्या चौकटीमध्ये बांधणे आवश्यक होते. मार्क्सवाद की आंबेडकरवाद, हा वैचारिक वादही त्यावेळी उपस्थित झाला तेव्हा गरीब-श्रीमंत हा संघर्ष दुसऱ्या टप्प्यातील असून, वर्णसंघर्ष आणि वर्गसंघर्ष, असे हे आपल्याकडील संघर्षाचे स्वरूप असून, तो सोडविण्यासाठी मार्क्सवादाकडे कोणताही मार्ग नाही; पण आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानात त्याच्या सोडवणुकीचा मार्ग स्पष्ट आहे, असे त्यांनी त्यावेळी ठामपणे मांडले आणि या नव्या जाणिवेला आंबेडकरी तत्त्वज्ञानाच्या मार्गाने वळविले. हे करताना ‘अस्मितादर्श’ या वाङ्मयीन मासिकाचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. ते केवळ मासिक नाही, तर चळवळ आहे. गेल्या तीन पिढ्यातील दलित साहित्याची चळवळ 'अस्मितादर्श'ने समर्थपणे वाहून नेली. ‘अस्मितादर्श’ने साहित्यिकांच्या तीन पिढ्या घडवल्या; परंतु दलित आणि दलितेतर, असा भेद केला नाही. साहित्यातील दलितत्व जन्माने ठरवायचे, की सृजनातून, हा पेचही सरांनीच सोडविला. त्यामागे प्रदीर्घ चिंतनाचे अधिष्ठान होते. एखादी व्यक्ती जन्माने दलित नसेल; परंतु विचारांचा पाया पक्का ठेवून शोषितांच्या बाजूच्या निष्ठेचा आविष्कार त्याने केला असेल तर त्याला दलित जाणिवेचाच आविष्कार मानला पाहिजे, ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली. फ.मुं. शिंदे, भ.मा. परसवाळे ही मंडळी दलित नाही; पण त्यांचे साहित्य हे दलितांच्या जाणिवेचे सृजन आहे, असे त्यांचे म्हणणे होते. या नव्या दलितेतर साहित्यिक पिढीला दिशा देताना त्या काळातील प्रस्थापित साहित्यिकांनासुद्धा दलित वाङ्मयाविषयी ठोस भूमिका मांडायला लावली.
‘अस्मितादर्श’च्या प्रसिद्ध झालेल्या पहिल्या अंकात दया पवार, योगिराज वाघमारे, प्र.ई. सोनकांबळे, यशवंत मनोहर, सुखराम हिवराळे हे नवोदित, तर दि.के. बेडेकर, प्रभाकर पाध्ये, शंकरराव खरात, बाबूराव बागुल, केशव मेश्राम, आनंद यादव, राजा मुकुंद, लक्ष्मीकांत तांबोळी, या प्रथितयश साहित्यिकांचा समावेश होता. ही चळवळ याच वाटेने पुढे चालल्याने ते नव्या लेखकांचे हक्काचे घर बनले. चर्चा, वाद यातून नवे काही घडत होते, लोक जोडले जात होते. संस्कार आणि प्रोत्साहनातून लेखक मंडळी ‘अस्मितादर्श’शी जोडली गेली. यात दि.के. बेडेकर, नरहर कुरुंदकर, शरश्चंद्र मुक्तिबोध, पु.ल. देशपांडे, गं.बा. सरदार, निर्मलकुमार फडकुले, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. जनार्दन वाघमारे, प्रा. बाळकृष्ण कवठेकर या साहित्यिकांचा समावेश करता येईल. हे सर्व करताना 'विद्रोह, विज्ञान आणि विश्वात्मकता' ही दलित साहित्याची त्रिसूत्री त्यांनी मांडली आणि आज ही साहित्य चळवळ याच सूत्रांच्या आधारावर चालू आहे. या सूत्रांच्या माध्यमातून त्यांनी दलित साहित्याला वैचारिक आणि वैश्विक अधिष्ठान दिले. त्यांचे हे कार्य न विसरण्यासारखे आहे. या वाङ्मयीन चळवळीच्या वाटचालीत 'अस्मितादर्श'चे योगदानही तेवढेच. हे नियतकालिक त्यांनी अतिशय निष्ठेने चालविले, जोपासले आणि वाढवले. ते वाङ्मयीन नियतकालिक न राहता चळवळ झाले. त्याच्या माध्यमातून साहित्य, समाज आणि संस्कृती याची चळवळ उभी राहिली. या चळवळीने मराठी साहित्यिकांच्या तीन पिढ्यांचे वैचारिक सिंचन केले. दरवर्षी होणारे 'अस्मितादर्श साहित्य संमेलन' हा मराठी साहित्य विश्वात एक मानदंड तयार झाला. वेगळा विचार घेऊन आपल्या जाणिवांच्या कक्षा रुंदावणारा एक समूहच याचा भाग बनला. गेल्या ५० वर्षांत दलित चळवळ आणि 'अस्मितादर्श' या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरल्या. हे नाणे एवढे खणखणीत, की जाणिवांच्या वैश्विक बाजारात त्याचे मूल्य दिवसागणिक वाढतच आहे. ‘अस्मितादर्श’च्या योगदानाचा विचार केला, तर जशी ती कार्यशाळा आहे तशी प्रशिक्षण देणारी कार्यशाळा ठरली आहे. अशा परिघात काम करणाºया पानतावणे सरांची भूमिका काहीही असली तरी ते विद्यार्थिप्रिय प्राध्यापक अशी प्रतिमा होती. साहित्याच्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या वाङ्मयीन विचार, प्रवाहांचा अभ्यास केला पाहिजे, भाषेची बंधने झुगारत सर्व भाषांतील साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे, असा आग्रह असे. अशा चौफेर वाचनातूनच प्रत्येकाची वैचारिक बैठक तयार होत असते, ही त्यामागची त्यांची भूमिका होती. विद्रोही साहित्याची कड घेणाºया विद्यार्थ्यांनाही ते अगोदर प्राचीन, अर्वाचीन सर्व प्रकारचे साहित्य अभ्यासा, असा सल्ला देत. मी सांगतो म्हणून तुम्ही तुमच्या साहित्यिक जाणिवा माझ्याच विचारांशी जोडव्यात, असा अजिबात त्यांचा आग्रह नसे. हा खरे तर त्यांचा मोठेपणा म्हणता येईल. त्यांच्या साहित्यातही वैचारिक प्रगल्भता दिसते. कारण त्यांच्या ग्रंथांमध्ये प्रचाराचा थाट नाही, की शब्दबंबाळपणा नाही. रंजकतेला थारा नाही. जीवनाच्या वास्तवाचा शोध घेण्याच्या प्रयत्न त्यातून दिसतो. केवळ ‘अस्मितादर्श’ प्रकाशित करून त्यांनी समाधान मानले नाही. ही वैचारिक चळवळ पुढे न्यायची असेल, तर लेखक-वाचकांना एका ठिकाणी आणणे आवश्यक आहे हे ओळखून त्यांनी असे मेळावे राज्यभर आयोजित केले. हे मेळावे पुढे साहित्य संमेलन बनले. ५० वर्षांत परिसंवाद, काव्यवाचन, चर्चासत्र, अशा विविध प्रकारातून वैचारिक घुसळणच केली. यातून नवीन पिढी घडली. चळवळ्यांच्या तीन पिढ्यांचे ते खºया अर्थाने आधारवड होते. एवढे प्रचंड कार्य करताना त्यांनी तत्त्वाला मुरड घातली नाही की सत्तास्थानाची अभिलाषा ठेवली नाही. सत्तेच्या भूलभुलय्यापासून त्यांनी स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले. हा निग्रही अलिप्तपणा फार कमी लोकांना साध्य होतो. लोकांना लिहिते करताना, एक वाङ्मयीन चळवळ चालवताना कर्त्या माणसाचे आपल्या लिखाणाकडे दुर्लक्ष होते हे सार्वत्रिक आहे; पण पानतावणे सर याला अपवाद ठरले. जेवढ्या निष्ठेने त्यांनी वाङ्मयीन चळवळ चालविली तेवढ्याच निग्रहाने लिखाणही केले. दलितांच्या कथा, कविता, नाटक यासंदर्भात 'मूल्यवेध' या ग्रंथातून मूलगामी विचार मांडले. 'विद्रोहाचे पाणी पेटले', 'दलितांचे प्रबोधन', मूकनायक', 'वादळाचे वंशज', 'प्रबोधनाच्या दिशा', 'पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'हलगी', 'चैत्य', 'लेणी', 'अर्थ-अन्वयार्थ' ही त्यांची महत्त्वाची साहित्य संपदा. त्यांच्या संशोधनाचा विषय हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता. राजकीय आणि सामाजिक नेता अशा अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रूढ प्रतिमा असताना त्यांची पत्रकार, संपादक अशी वेगळी असलेली ओळख करून देणे यासाठी त्यांनी केवळ अभ्यासच केला नाही, तर ‘पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या संशोधनपर ग्रंथात पानतावणेंचे योगदान फार मोठे आहे. बाबासाहेबांचे 'मूकनायक' हे वर्तमानपत्र व संपादक म्हणून त्यांची कामगिरी यांच्या चिकित्सक अभ्यासाचा हा ग्रंथ महत्त्वाचा समजला जातो. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. पत्रकार हे अंग असले तरी अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची उंची मोठी होती, तशी पत्रकार म्हणूनही होती. हे त्यांनी सांगितले. ते कायम लिहिते राहिले. सरकारने त्यांच्या या वाङ्मयीन योगदानाची दखल घेऊन 'पद्मश्री' बहुमान जाहीर केला होता; पण त्यापूर्वीच ते आजारी पडले. दरम्यान, त्यांनी आयुष्यभर वसा घेऊन चालवलेल्या 'अस्मितादर्श'चा सुवर्णमहोत्सवी सोहळाही आयोजित केला होता. सगळी तयारी झाली होती; पण तोही कार्यक्रम होऊ शकला नाही. ते गेले ते चळवळ पोरकी करून. तीन पिढ्यांचा आधारवड आता आसरा देणार नाही ही भावनाच पिळवटून टाकणारी आहे.

Web Title: Base of movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.