सत्प्रवृत्तींचा आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 01:06 AM2019-01-04T01:06:28+5:302019-01-04T01:06:54+5:30

आपल्या अंगाखांद्यावर असंख्य सत्प्रवृत्तींना, संघटनांना, व्यक्तींना आणि विचारवाहकांना सहजपणे आश्रय देऊन त्यांच्या वाटचालीची काळजी करणारा व असंख्य निराधारांना आश्रय देणारा सार्वजनिक आयुष्यांचा एक समर्थ आधारवड न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे.

 Basis of Genres | सत्प्रवृत्तींचा आधारवड

सत्प्रवृत्तींचा आधारवड

Next

आपल्या अंगाखांद्यावर असंख्य सत्प्रवृत्तींना, संघटनांना, व्यक्तींना आणि विचारवाहकांना सहजपणे आश्रय देऊन त्यांच्या वाटचालीची काळजी करणारा व असंख्य निराधारांना आश्रय देणारा सार्वजनिक आयुष्यांचा एक समर्थ आधारवड न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. आचार्य दादा धर्माधिकारी या थोर विचारवंताचे लाभलेले पितृत्व, लहानपणी प्रत्यक्ष बापू आणि बा यांचा मिळालेला सहवास, वकिलीतले अमाप यश व न्यायमूर्ती म्हणून मिळालेली अपार कीर्ती या गोष्टी जशा त्यांच्या वाट्याला आल्या होत्या तसेच असंख्य मुलामुलींचे पालकत्व त्यांनी व त्यांच्या दिवंगत पत्नी ताराबाई यांनी सांभाळले होते. बाबा आमटे, नरहर कुरुंदकर, पु.ल. ही माणसे आपल्या परिवारातली मानणारे न्यायमूर्ती वर्षानुवर्षे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. बजाज या उद्योगसमूहाचे गांधीवादी सल्लागार होते. सेवाग्राम, परंधाम आणि गांधी, विनोबांच्या विचारांना वाहून घेतलेल्या अनेक संस्थांचे मूक पालक होते. एवढी पदे व सन्मान वाट्याला आल्यानंतरही त्यांच्या स्वभावात एक मृदू पितृत्व होते. त्यांच्या घरातील मुले, सुना व नातवंडांसह ते इतरही अनेकांच्या वाट्याला आले. धर्माधिकारी असूनही सेक्युलर विचार करणारे, जातधर्म यांच्या पलीकडचाच नव्हे तर त्याहूनही उंचीचा विचार करणारे, जनतेत ईश्वर पाहणारे न्यायमूर्ती व्यक्तिगत जीवनात कमालीचे शिस्तप्रिय, कलाप्रिय व सेवाधर्मी होते. गांधीवादी असूनही त्यांनी अहिंसेचे स्तोम माजविले नाही. देशात सुरू असलेला धार्मिक उन्माद व सामाजिक दुहीकरण याविरुद्ध सगळ्या गांधीवादी संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठविला पाहिजे, असे त्यांचे मत होते. या संघटनांमध्ये ते बळ राहिले नसल्याची खंतही ते नेहमी व्यक्त करीत. देशात आणीबाणी असताना ते तिच्याविरोधात उभे राहिले. त्यासाठी त्यांनी आपल्या तेव्हाच्या न्यायमूर्तीपदाचीही पर्वा केली नाही. ऐन आणीबाणीत जयप्रकाश नारायण नागपुरात आले. तेव्हा त्यांचा मुक्काम न्यायमूर्तींकडेच होता. त्यांचे असे करणे त्यांना त्यांच्या पदावरून घालवू शकेल असे तेव्हा अनेकांनी म्हटले. त्यावर ‘माझ्या घरी जयप्रकाश येऊ शकत नसतील तर माझ्या जगण्या-बोलण्याला अर्थ तरी कोणता उरेल’ असे ते तेव्हा म्हणाले. आणीबाणीवरून सर्वसेवा संघात, रा.कृ. पाटील व दादा धर्माधिकारी असे दोन गट पडले. त्या वेळी आणीबाणीला विरोध करणाऱ्यांत दादांच्या गटासोबत ते राहिले. आणीबाणीत भूमिगत असणाºया अनेकांना त्यांच्या घराचा आश्रय होता. न्यायमूर्ती असामान्य वक्ते होते. विषय व त्यातील प्रत्येक तपशील यावर त्यांची पकड होती. त्यामुळे नांदेडात झालेल्या घटनेवरील त्यांच्या तीनही भाषणांची पुस्तके नरहर कुरुंदकरांनी तत्काळ काढली व ती भाषणाच्याच स्वरूपात लोकांच्या हाती दिली. गांधी, विनोबा, सर्वोदय, स्वातंत्र्यलढा आणि आचार्य दादा यांच्यासारखेच त्यांनी आपल्या पत्नीवर ‘तारासुक्त’ हे अतिशय संवेदनशील पुस्तक लिहिले. त्या पुस्तकालाही एक विलक्षण दर्जा असून पत्नीविषयीचा विचार कसा केला जावा याचे अतिशय सूचक मार्गदर्शन त्यात आहे. ताराबाई कॅन्सरने अस्वस्थ असताना त्यांची भेट घेतली. तेव्हा एका क्षणी त्या म्हणाल्या, ‘अरे, परवा मी जवळपास गेलेच होते.’ त्यावर त्यांची गंमत करायची म्हणून म्हटले, ‘गेलाच होता तर आलात कशाला?’ असे विचारता त्याला उत्तर देताना त्या तत्काळ म्हणाल्या, ‘अरे तेथे तुझा हा काका कुठे दिसला नाही म्हणून...’ एक कुटुंबवत्सल समाजयोगी, अध्ययनशील कार्यकर्ता आणि विचारांना आचाराची जोड देणारा संयमी व विवेकी माणूस ही त्यांची खरी ओळख. तीच त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनात आज आहे. त्यातील अनेकांना एक अनाथपणही जाणवत आहे. त्यांच्यावर टीका करणारा वा त्यांच्यापासून दूर राहू इच्छिणारा माणूस अद्याप भेटायचा आहे. काही माणसे केवळ मूल्ये घेऊन जन्माला येतात. त्यांना अमंगळसे काही चिकटले नसते. सर्वांचे आपलेपण घेऊन या समाजाला जोडून ठेवणारी अशी माणसेही आता दुर्मीळ होत चालली आहेत. अशा काळात साºयांना आपलेसे वाटावे असे न्यायमूर्तींचे सर्वांप्रति स्रेहभाव जपणारे
व्यक्तिमत्त्व आपल्यातून जावे याएवढे दुर्दैव दुसरे नाही. त्यांच्या स्मृतींना अभिवादन.

Web Title:  Basis of Genres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर