गुडेवारांच्या बदलीचे कारस्थान
By admin | Published: October 6, 2015 04:06 AM2015-10-06T04:06:27+5:302015-10-06T04:06:27+5:30
अमरावती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीचा घाट काही स्थानिक भाजपा नेत्यांनी घातला आहे. गुडेवार अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच अमरावतीत आले.
अमरावती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीचा घाट काही स्थानिक भाजपा नेत्यांनी घातला आहे. गुडेवार अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच अमरावतीत आले. प्रामाणिक व सचोटीचे अधिकारी आणि भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ म्हणून ते ओळखले जातात. पालिका कारभारात त्यांनी अल्पावधीत शिस्त आणली आहे. भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे निलंबन, बड्या धेंडांची अतिक्रमणे उद्ध्वस्त, महापालिकेच्या महसुलात वाढ ही गुडेवारांच्या दक्ष प्रशासनाची काही उदाहरणे आहेत. महापालिकेत काही नगरसेवकांची बिल्डर आणि ठेकेदारांसोबत कित्येक वर्षांपासून अभद्र युती आहे. या नगरसेवकांना लोक निवडून देतात, मात्र ते ठेकेदार-बिल्डरांचीच चाकरी करतात. त्यांना स्थानिक पक्षीय नेत्यांचा वरदहस्तही आहे. त्यांचे हे सगळे धंदे गुडेवारांमुळे बंद झाले आहेत. हा अधिकारी अमरावतीचा कायापालट करेल, असे नागरिकांना वाटू लागले आहे. पण भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांना गुडेवार नको आहेत. याबाबत एका भाजपा नेत्याने नगरसेवकांची अलीकडेच बैठकही घेतली. गुडेवारांच्या नियुक्तीचे सुरुवातीला स्वागत करणाऱ्या या नेत्याला आता अचानक गुडेवार नकोसे का झाले आहेत? अमरावतीत येणाऱ्या इतर अधिकाऱ्यांप्रमाणे यांनाही आपण नंतर सहज ‘मॅनेज’ करू, या भ्रमात हे महाशय होते. आपल्या समर्थक नगरसेवकांचे आर्थिक स्रोत बंद झाले असल्याने ते आता अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे.
प्रशासनात अनेक प्रामाणिक अधिकारी असतात, परंतु कुणाशी फारसे शत्रुत्व घ्यायचे नाही आणि स्वत:चे नुकसानही करायचे नाही, असा मध्यम आणि सुरक्षित मार्ग पत्करणाऱ्यांची संख्या यात बरीच मोठी असते. हे अधिकारी काहींच्या गैरसोयीचे मात्र बहुतेकांच्या सोयीचे असतात. ‘स्वत: मागायचे नाही परंतु कुणी दिले तर ठेवून घ्यायचे’, ही त्यांची ‘आदर्श संहिता’ असते. सत्ताधारी नेत्यांची, दबंग समाजसेवकांची, उपद्रवी पत्रकारांची छोटी-मोठी कामे ते करीत असतात आणि त्या बदल्यात आपल्या प्रतिमा संवर्धनाचा अलिखित करारनामा त्यांच्याशी करतात. असे अधिकारी जनमानसात ‘देव माणूस’ म्हणूनही लोकप्रिय ठरतात. गुडेवारांचे तसे नाही. त्यांचा प्रामाणिकपणा सर्वांसाठीच गैरसोयीचा ठरतो आहे. त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेचे सुरुवातीला सर्वत्र स्वागत होत होते. परंतु त्यांची अतिक्रमण हटाव मोहीम आपल्या घर, दुकानानजीक येताच ते खलनायक वाटू लागले. गुडेवार या गोष्टींची पर्वा करीत नाहीत. अकोल्यात असताना एका गुंडाने त्यांच्या घरावर हल्ला केला, परभणीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्ब फेकून त्यांना व कुटुंबीयांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. गुडेवार अशा घटनांनी कधी विचलित झाले नाहीत. खासगी कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून लोकांच्या कल्याणासाठी ते शासकीय सेवेत आले आहेत. आयआयटी, मुंबईचे ते विद्यार्थी आहेत. अमेरिकेतील जगविख्यात प्रिन्सेस्टन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी त्यांची निवडही झाली होती. परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्यांना तिथे जाता आले नाही. नगरपालिकेतील लिपिकाचा हा मुलगा कर्ज घेऊन, संघर्ष करीत शिकला. त्यामुळे गुडेवारांना सामान्य माणसांच्या हालअपेष्टांची जाणीव आहे. निवडणुकीच्या काळात रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली म्हणून निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाचा ठपका ठेवीत त्यांना निलंबित केले होते. परंतु ही चूक लक्षात येताच लगेच गुडेवारांना पुन्हा कामावर घेण्यात आले. या प्रकरणानंतर महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून निवडणुकीच्या काळातही रोजगार हमी योजनेची कामे सुरू करता येतील, असे आदेश दिले.
अमरावतीच्या विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काही कल्पना आहेत. त्या पूर्ण करण्यासाठीच त्यांनी गुडेवारांना अमरावतीत पाठवले. परंतु त्यांच्याच पक्षाचे नेते आणि नगरसेवक गुडेवारांना त्रास देत आहेत. त्यांना फसवण्याचे, बदनाम करण्याचे प्रयत्न सुरूआहेत. खरे तर भाजपा नगरसेवकांनी कर्तव्यदक्ष आयुक्तांच्या मदतीने अमरावतीत विकासकामांचे ‘तुषार’ उडवायला हवेत आणि पक्षाची प्रतिमा व ‘भारतीयत्व’ जपायला हवे. पण तसे न करता बिल्डर, ठेकेदारांकडून शेण खाण्याचेच उद्योग ही मंडळी करीत असेल तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्यांना वेसण घालण्याची गरज आहे.
- गजानन जानभोर