एकनाथ खडसे 'वेगळा निर्णय' घेतील?... भाजपा सोडल्यास कोणत्या पक्षात जातील?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 01:37 PM2020-05-15T13:37:21+5:302020-05-15T16:10:51+5:30

भाजप श्रेष्ठी याच पध्दतीने निर्णय घेतील, याची पूर्वकल्पना खडसे असू शकते. याचे कारण विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना शेवटच्या दिवसांपर्यंत प्रतिक्षेत ठेवले गेले

The battle of Khadse's decision | एकनाथ खडसे 'वेगळा निर्णय' घेतील?... भाजपा सोडल्यास कोणत्या पक्षात जातील?

एकनाथ खडसे 'वेगळा निर्णय' घेतील?... भाजपा सोडल्यास कोणत्या पक्षात जातील?

Next
ठळक मुद्देविधान परिषद निवडणुकीचा सगळा घटनाक्रम लक्षात घेतला तरी खडसे हे नियोजनबध्द पद्धतीने हालचाली करीत असल्याचे जाणवते.मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची नाराजी खडसे यांनी पहिल्या दिवसापासून जाहीरपणे व्यक्त केली.४० वर्षांपासून राजकारणात असलेल्या खडसे यांचे सर्वपक्षीयांशी स्रेहपूर्ण संबंध आहेत.

>> मिलिंद कुलकर्णी

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे आता निकराच्या लढाईसाठी सज्ज झाल्याचे त्यांच्या अलिकडच्या हालचालींवरुन स्पष्ट होत आहे.

विधान परिषद निवडणुकीचा सगळा घटनाक्रम लक्षात घेतला तरी खडसे हे नियोजनबध्द पद्धतीने हालचाली करीत असल्याचे जाणवते. राज्यसभा निवडणुकीच्यावेळी त्यांच्या नावाची इच्छुकांमध्ये चर्चा होती. त्यावेळी खडसे यांनी राज्यात काम करण्याची इच्छा आहे, असे सांगून राज्यसभेचा विषय संपविला होता. विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन इच्छा व्यक्त केली. पक्षाने नवे चेहरे देऊन खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, राम शिंदे या नेत्यांचे पुनर्वसन करण्याचे टाळले.

भाजप श्रेष्ठी याच पध्दतीने निर्णय घेतील, याची पूर्वकल्पना खडसे असू शकते. याचे कारण विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना शेवटच्या दिवसांपर्यंत प्रतिक्षेत ठेवले गेले आणि शेवटी कन्या रोहिणी यांना भाजपचे अधिकृत तिकीट देण्यात आले. यावेळीही असेच होईल, हे लक्षात आल्याने खडसे यांनी स्वत: हून इच्छा व्यक्त करणे, त्यानंतर ज्यांना उमेदवारी दिली गेली, त्यांची प्रतिज्ञापत्रे मार्चमध्येच तयार झाली असल्याचा मुद्दा लावून धरणे, गोपीचंद पडळकर यांनी मोदींवर केलेल्या टीकेला ठळकपणे महत्त्व देणे असे मुद्दे हाती घेऊन भाजपचे श्रेष्ठी, फडणवीस व पाटील यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न चालविला आहे.

मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची नाराजी खडसे यांनी पहिल्या दिवसापासून जाहीरपणे व्यक्त केली. दीड वर्षांत १२ खाते असलेले मंत्रीपद सोडावे लागल्यानंतर त्यांच्या टीकेला धार आली. परंतु, तरीही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि खडसे यांच्यानंतर जळगावचे पालकमंत्री झालेले चंद्रकांत पाटील यांनी कधीही खडसे यांच्या टीकेला थेट उत्तर देण्याचे टाळले. सबुरीचा सल्ला देत त्यांना न्याय मिळेल, असा आशावादी सूर लावला जात असे. परंतु, यावेळी प्रथमच चंद्रकांत पाटील यांनी थेट आणि आक्रमक शैलीत खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे. घराणेशाही, काँग्रेसची कथित पार्श्वभूमी हे मुद्दे उपस्थित केले. यातून पक्ष खडसेंविषयी निश्चित भूमिकेपर्यंत आला आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण पाटील हे गृहमंत्री अमित शहा यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. फडणवीस हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवडते तरुण सहकारी आहेत. विधान परिषद निवडणुकीतही फडणवीस यांचाच वरचष्मा राहिला, असेच म्हटले जाते. त्यामुळे खडसे व पाटील यांच्यामधील कलगीतुरा हा निर्णायक टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या अंतर्गत वादात उडी घेत, खडसे यांचे काँग्रेसमध्ये स्वागत आहे, अशी गुगली टाकली. त्यामुळे खडसे हे पुढील काळात काय भूमिका घेतात, याविषयी आडाखे बांधले जात आहे. ४० वर्षांपासून राजकारणात असलेल्या खडसे यांचे सर्वपक्षीयांशी स्रेहपूर्ण संबंध आहेत. त्याचप्रमाणे शरद पवारांपासून तर प्रतिभाताई पाटील, स्व.मधुकरराव चौधरी यांच्याशी वादाचे प्रसंग देखील आले. राजकीय व्यक्तीच्या जीवनात असे चढउतार येत असतात. मात्र आता पक्षाशी उभा दावा मांडल्यानंतर खडसे हे काय भूमिका घेतात, याचा विचार करताना त्यांना प्रवेश देणारा पक्ष हा त्यांची उपयोगिता, खान्देशात पक्ष संघटनेला होणारा फायदा याचीही गोळाबेरीज करेल. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना हे तीन पर्याय असून तिन्ही पक्ष राज्यात सत्तास्थानी आहेत. खान्देशातील पक्षीय बलाबल पाहिले तर शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी चार आमदार तर राष्ट्रवादीचा एकमेव आमदार आहे. खडसे यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या जळगाव जिल्ह्यात काँग्रेस व राष्टÑवादीचे एकेक आमदार आहेत तर सेनेचे सर्व चारही आमदार याच जिल्ह्यातून निवडून गेले आहेत. गुलाबराव पाटील यांच्यारुपाने सेनेचा कॅबिनेट मंत्री आहे. जिल्हा बँक व जिल्हा दूध संघाच्या निमित्ताने पाच वर्षांपूर्वी खडसे यांनी राष्टÑवादी, काँग्रेस व सेनेच्या नेत्यांची मोट बांधून या संस्था ताब्यात घेतल्या होत्या. त्यामुळे स्थानिक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. प्रश्न फक्त येईल, तो खडसे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला पक्षात प्रवेश देताना त्यांना योग्य तो मानसन्मान राखला जाण्याचा. राज्याची सत्ता प्रथमच तीन पक्षात विभागली गेली असल्याने खडसे यांचा प्रवेश आणि त्यांचा सन्मान हा महाविकास आघाडीमधील मतैक्याचा विषय होऊ शकतो. मात्र त्याला कालावधी लागेल.

Web Title: The battle of Khadse's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.