सतरा मजलीतील संग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 03:29 PM2018-07-20T15:29:17+5:302018-07-20T15:29:40+5:30

जळगाव महापालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीवर कुणाचा झेंडा रोवला जाणार आहे, याचा निर्णय जळगावकर १ आॅगस्ट रोजी घेणार आहेत.

Battle of Satara Majlis | सतरा मजलीतील संग्राम

सतरा मजलीतील संग्राम

Next

जळगाव महापालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीवर कुणाचा झेंडा रोवला जाणार आहे, याचा निर्णय जळगावकर १ आॅगस्ट रोजी घेणार आहेत. ३३ वर्षे जळगाववर अनभिषिक्त राज्य करणारे सुरेशदादा जैन आणि जिल्हा परिषद, जामनेर पालिका निवडणुकीतील घवघवीत यशाचे शिल्पकार असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात खरा सामना होत आहे. २००१ मधील लोकनियुक्तनगराध्यक्ष निवडणुकीत सुरेशदादा जैन यांच्या उमेदवाराचा झालेला पराभव वगळता सलग ३१ वर्षे पालिकेवर त्यांची सत्ता आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत सुरेशदादा जैन हे घरकूल प्रकरणामुळे जळगावबाहेर असतानाही जळगावकरांनी त्यांच्या खान्देश विकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून दिले होते. बहुमत थोडक्यात हुकले असले तरी राष्टÑवादी काँग्रेस आणि मनसेच्या पाठिंब्याने पाच वर्षे जैन यांची सत्ता राहिली. मात्र २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जैन यांचा पराभव झाला होता. १९८० पासून जळगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जैन यांचा हा पहिलाच पराभव होता. जामीनावर सुटका झाल्यानंतर दीड वर्षांपासून जैन हे पुन्हा एकदा जळगावच्या राजकीय व सामाजिक कार्यात सक्रीय झाले. २००१ मध्ये भाजपाचे नगराध्यक्ष तर पालिका सभागृहात जैन यांच्या आघाडीचे बहुमत असे चित्र होते. भाजपाच्या १७ महिन्यांच्या कार्यकाळात महापालिकेचे आर्थिक गणित बिघडल्याचा जैन गटाचा आरोप आहे. घरकुलांसाठी घेतलेले हुडको आणि जिल्हा बँकेचे कर्ज थकित आहे. २०१२ पासून महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचे भाडे थकित आहे. आर्थिक कोंडीमुळे महापालिकेच्या विकास कार्याला मर्यादा आल्या आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य मिळविण्यासाठी सुरेशदादा जैन यांनी प्रयत्न केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यासाठी सहकार्य केले. या परिस्थितीत जैन यांनी भाजपापुढे युतीचा प्रस्ताव दिला होता. मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे यांचा युतीला उघडपणे विरोध होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही युतीच्या पारड्यात वजन न टाकल्याने महाजन हे एकाकी पडल्याचे चित्र आहे. अखेर जागावाटपावरुन युती बारगळली. ‘शतप्रतिशत’चा नारा देत भाजपाने राष्टÑवादी, मनसे आणि खाविआचे मातब्बर नगरसेवक ओढले. भाजपामध्ये प्रवेशासाठी ३० लाखांची आॅफर; अन्यथा हद्दपारीची कारवाई करण्याची धमकी राष्टÑवादीच्या नगरसेविकेला मिळाल्याचा आरोप राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी थेट विधानसभेत केल्याने भाजपा सत्तेसाठी कोणत्या थराला जाऊ शकते, याचा संदेश राज्यभर गेला. साम, दाम, दंड, भेदाची चर्चा पालघरपाठोपाठ जळगावात सुरु झाली.

Web Title: Battle of Satara Majlis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.