बावनकशी

By admin | Published: April 5, 2017 12:01 AM2017-04-05T00:01:28+5:302017-04-05T00:01:28+5:30

किशोरीताई गेल्या, हे माझं अतीव व्यक्तिगत दु:ख. शोक. घरातली वडीलधारी व्यक्ती गमावली मी!

Bawankees | बावनकशी

बावनकशी

Next

किशोरीताई गेल्या, हे माझं अतीव व्यक्तिगत दु:ख. शोक. घरातली वडीलधारी व्यक्ती गमावली मी!
माझ्या बालपणापासून मी त्यांच्या जवळ होतो. माझे वडील वामनराव देशपांडे हे मोगूबाई कुर्डीकर यांचे शिष्य. किशोरीतार्इंनीही मोगूबार्इंकडे संगीताचे धडे गिरवले. किशोरीताई गानसरस्वती म्हणून ओळखल्या जात नव्हत्या, तेव्हापासून त्यांचं गाणं ऐकण्याची संधी मिळाली. त्यांच्या तारुण्यातला संघर्षाचा काळ, घराण्याच्या चौकटीतून आपली नवीन पायवाट निर्माण करून त्यावरून हट्टाने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न... या सगळ्यात जे जे किशोरीतार्इंच्या मागे उभे राहिले, त्यात माझे वडीलही होते. किशोरीतार्इंच्या या संघर्षाचा मी लहानपणापासूनचा साक्षीदार आहे. सत्तरच्या दशकात काही वर्षं फार बिकट होती. त्यांचा आवाज त्यांना सोडून गेल्यासारखी परिस्थिती ओढवली होती. त्यावेळची त्यांची जीवघेणी उलघाल मी पाहिली आहे. फार कठीण काळ होता तो. आणि त्या काळाचे व्रण नंतर आयुष्यभर राहिले असणार त्यांच्या मनावर.
किशोरीतार्इंच्या समकालीन गायकांमध्ये ख्याल गायन म्हणजे व्याकरणाने परिपूर्ण असं सुनिश्चित गायन झालं होतं. ख्यालाची एका विशिष्ट प्रकारे प्रस्तुती व्हायला लागली होती. त्याला किशोरीतार्इंनी आपल्या प्रयत्नांनी छेद दिला. मानवी सुख-दु:खांची कहाणी संगीतातून अभिव्यक्त झाली पाहिजे, असं त्या मानायच्या. याबाबत दुमत असू शकेल, पण त्यांची ही भूमिका कोणत्याही देशातील संगीत गायकाला टाळता येण्यासारखी नाही. हे त्यांचं खूप मोठं सांगीतिक योगदान आहे.
मैफलीत रंग भरणं ही मोठी कष्टसाध्य कला असते. प्रस्तुत करायच्या रागाच्या मांडणीसाठी वातावरण निर्माण करण्यापासून गायकाचा एक संघर्ष सुरू असतो. किशोरीताई मूडी आहेत, असा त्यांच्यावर नेहमी आरोप व्हायचा; कारण त्यांचा हा संघर्ष फार अटीतटीचा होता. असणार. गायला बसल्यावर राग प्रसन्न झाल्याशिवाय त्या सुरुवात करत नसत. घरून निघाल्यापासून मैफलीच्या ठिकाणी पोचेपर्यंत त्या अस्वस्थ असायच्या. आपण वेळेवर पोचू की नाही, तंबोरा मिळाला की नाही इथपासून छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी त्यांना फार त्रास देत. बेचैन करत. मैफलीआधीचा संघर्ष तो हा!
किशोरीताई या अशा अखंड पेटत्या भट्टीतून बावनकशी सोन्याची लगड शोधत. त्यांनी आपल्यासमोर रागनिर्मितीचं उत्पादन नव्हे, तर प्रक्रि या मांडली. म्हणून माझ्या दृष्टीने किशोरीतार्इंची एखादी न जमलेली मैफल ही झुबीन मेहताच्या जमून आलेल्या सिम्फनीपेक्षा श्रेष्ठ होती.
किशोरीतार्इंनी स्वत:चा एक फॉर्म्युला कधीच बनवला नाही. ते खूप सोपं असतं. कारण, अनेक लोकप्रिय गायक एखादा फॉर्म्युला बनवून नेहमी तोच तो गात राहतात. किशोरीतार्इंसारखी प्रतिभावंत गायिका त्या वाटेला फिरकणंही शक्य नव्हतं.
माझा त्यांच्याशी केवळ एकाच गोष्टीबाबत मतभेद होता. मी त्यांना म्हणायचो,
‘रागाचा एक भाव असतो. स्वरांना काहीतरी सांगायचं असतं हे बरोबर आहे. मात्र, तुम्हीच एकट्या अनुग्रहित आहात का, की स्वरांनी त्यांचं म्हणणं केवळ तुम्हाला सांगितलं आणि इतरांना सांगितलं नाही? तुम्ही तो भाव निश्चित करू नका. प्रत्येकाला स्वत:चा भाव असू द्या. कारण, बरेचदा रागामध्ये जो भाव निर्माण होतो, तो गायकाच्या मनोवृत्तीचा परिणाम असतो.. नाही का?’
त्या हसत.
कुमारजी नाही का एखादा राग कधी हसरा, नाचरा करून, तर कधी गंभीर, धीरोदात्त करून गायचे. किशोरीतार्इंनी संगीतात भावविचार रुजवला. बरेचदा सर्व काही शास्त्रशुद्ध, अचूक, सुरेल असतं, पण रागांचा असर निर्माण होत नाही. मानवी सुखदु:खाच्या ताण्याबाण्यांची कहाणी अभिव्यक्त करायला संगीत सक्षम नसेल तर त्याचा उपयोग काय? ते ताणेबाणे अखंड विणत गेलेली किशोरीतार्इंची संगीतसेवा ही अनोखी ठरली आणि ती चिरकाळ स्मरणात राहील.
- पं. सत्यशील देशपांडे
(पं़ कु मार गंधर्वांच्या शिष्य परंपरेतील
ख्यातनाम गायक)

Web Title: Bawankees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.