सावधान..! तुमच्या करचुकवेगिरीवरही ‘एआय’ची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 08:19 AM2024-09-03T08:19:56+5:302024-09-03T08:20:26+5:30

Income Tax: आजवर आयकर परतावे (इन्कम टॅक्स रिटर्न्स) मानवी हस्तक्षेपाने वापरलेल्या तंत्रावर आधारित होते. आता त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे.

Be careful..! AI's eye on your tax evasion! | सावधान..! तुमच्या करचुकवेगिरीवरही ‘एआय’ची नजर!

सावधान..! तुमच्या करचुकवेगिरीवरही ‘एआय’ची नजर!

- डॉ. दीपक शिकारपूर
(उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक)

आजचं युग पूर्णपणे डिजिटल झालंय. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, बिग डेटा ॲनालिसिस, रोबोटिक्स ह्या आणि ह्यांसारख्या घटकांमुळे संबंधित संगणकीय प्रणाली आणि यंत्रणा अधिकाधिक ऑटोनॉमस म्हणजे स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या आणि स्वयंभू बनत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विविध क्षेत्रांमध्ये झपाट्याने परिवर्तन करत आहे आणि आयकर क्षेत्र त्याला   अपवाद नाही. 

भारतात आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, अनुपालन आणि कर प्रशासन सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. आजवर आयकर परतावे (इन्कम टॅक्स रिटर्न्स) मानवी हस्तक्षेपाने वापरलेल्या तंत्रावर आधारित होते. आता ते अजून आधुनिक होणार आहे. कर आकारणीसाठी एक  अडचण म्हणजे  अनेक ठिकाणी होणारे व्यवहार आणि त्यामुळे होणारी  करचुकवेगिरी. पूर्वी करदाते अनेक ठिकाणी खाती उघडून व्यवहार करत व त्यातले काही व्यवहार प्राप्तिकर विवरणात जाणीवपूर्वक वगळत. नवीन इन्कम टॅक्स सॉफ्टवेअर प्रोग्राम प्रथम तुमच्या पॅन कार्डशी लिंक केलेला डेटा गोळा करेल, त्यानंतर ते तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या डेटाचे आपोआप मॅपिंग करेल. यानंतर हे सॉफ्टवेअर आयकर रिटर्नमध्ये घोषित केलेल्या बँक खात्यांशी तुमच्या आधार आणि पॅनशी जोडलेले व्यवहार आपोआप टॅली करेल. पुढे ते मुदत ठेवींचे सर्व तपशील, खात्यात  क्रेडिट झालेले व्याज, शेअर लाभांश, शेअर व्यवहार, म्युच्युअल फंड, शेअर्सचे दीर्घ आणि अल्प मुदतीच्या नफ्यांचे सर्व तपशील गोळा करेल. 

आता ते तुमच्या नावावरील अघोषित बँक खाती आणि तुम्ही दुसरे आणि तिसरे खातेदार असलेल्या संयुक्त बँक खात्यांमधील व्यवहार तपासून माहिती जुळवून घेण्याचे कार्य  सुरू करेल. ह्याचबरोबर हा प्रोग्रॅम सहकारी बँका, स्थानिक पतसंस्था, पोस्टल मुदत ठेवी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना इत्यादींकडील पोस्टल खाती आणि बँक खातीदेखील शोधेल, जिथे तुमची गुंतवणूक कुटुंबासह दुसऱ्या नावाने केली जाते किंवा जे आयकर भरत नाहीत (कदाचित त्यांचे उत्पन्न करपात्र नाही) अशा व्यक्तींसोबत संयुक्तरीत्या केलेली असते. हे सारे आयकर कर्मचाऱ्यांनी स्वतः करायचे ठरवले तर ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट व वेळखाऊ होती. 

ह्यापुढील टप्पा स्थावर मालमत्तेचे व्यवहार. चालू आणि मागील तीन वर्षांतील कोणत्याही जमीन आणि स्थावर मालमत्तेच्या व्यवहारांसाठी आता सरकारी नोंदणी कार्यालयात वापरलेले  पॅनकार्ड तपासले जाईल. पुढील पायरी म्हणजे तुमच्या डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स इत्यादींमध्ये केलेले व्यवहार आणि वाहन खरेदी-विक्री व्यवहार. जर आपण परदेशी प्रवास केला असेल तर पासपोर्टशी संलग्न केलेले खर्च व त्याचा उत्पन्नस्रोत. संकलित केलेली संपूर्ण माहिती तुम्ही घोषित केलेल्या आणि तुमच्या प्राप्तिकर रिटर्नमध्ये दाखल केलेल्या व्यवहारासह तसेच स्रोतावर केलेली  करकपात (टीडीएस)शी टॅली केली जाईल. हे संपूर्ण  विश्लेषण घोषित आणि अघोषित उत्पन्नावर आधारित वास्तविक आयकराची गणना करेल. ह्याची तुलना तुम्ही भरलेल्या आयकराशी केली जाईल व त्याबरहुकूम  परतावा आहे की अजून जादा कर भरणे लागू आहे ह्याची मोजदाद केली जाईल. ह्यामुळे  उत्पन्नाचे प्रवाह व  प्रत्यक्ष कराचे विश्लेषण करण्यात मदत होईल आणि धोरणकर्त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि प्रभावी कर धोरणांची अंमलबजावणी करण्यास सक्षम करेल. एकूणच, आयकर रिटर्नमध्ये एआयचा प्रभावी  वापर  अधिक कार्यक्षम, अचूक आणि करदात्यासाठी अनुकूल करप्रणाली प्रक्रिया राबवण्याच्या शक्यता निर्माण करतो.  ह्यामुळे करसंकलन वाढेल असा प्राथमिक अंदाज आहे.
    deepak@deepakshikarpur.com 

 

Web Title: Be careful..! AI's eye on your tax evasion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.