दृष्टीकोन: अ‍ॅपच्या विळख्यात अडकण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 02:06 AM2019-07-27T02:06:36+5:302019-07-27T02:06:45+5:30

आपल्या फोटोचा वापर हा व्यावसायिक कारणासाठीही केला जाऊ शकतो. हे अ‍ॅप वापरण्यासाठी असलेल्या अटी या युजर्सच्या खासगी माहितींना धोका पोहोचवू शकतात

Be careful before getting stuck in an app | दृष्टीकोन: अ‍ॅपच्या विळख्यात अडकण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे गरजेचे

दृष्टीकोन: अ‍ॅपच्या विळख्यात अडकण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे गरजेचे

Next

डॉ. दीपक शिकारपूर

मोबाइल फोन आणि इंटरनेट ही तसे म्हटले तर फार प्रभावी साधने आहेत. त्यांच्यातील छुपे सामर्थ्य ओळखून त्याचा डोळसपणे उपयोग केला तर बरीच कामे सहजपणे होतात, खर्च आणि वेळ वाचतो तसेच वापरकर्त्याच्या ज्ञानातही भर पडते. सोशल मीडियावर मित्र-मैत्रिणींशी, नातेवाइकांशी संपर्क ठेवता येतो. या सर्वांच्या आयुष्यातील घडामोडी सहजपणे कळू शकतात. सोशल मीडियाचा वापर करून नवनवीन कौशल्ये शिकता येतात. आपल्या आवडीच्या विषयात अधिक गती मिळवता येते. हे सर्व सोशल मीडियाचे फायदे. हे फायदे करून घेत असतानाच आपण सोशल मीडियाच्या वापराद्वारे या एकंदरीत जाळ्यात अधिकाधिक गुंतत जातो, हे आपल्या लक्षातही येत नाही.

थोडा वेळ आपण इन्स्टाग्राम बघू या किंवा थोडा वेळ फेसबुकवर काही तरी वाचू या असं म्हणून कित्येक जण अनेक तास या दोन माध्यमांवर असतात. अनेक तरुण मुलंमुली, कॉलेजमध्ये जाणारी किंवा हायस्कूलला असणारी मुलंमुली या माध्यमावर दिवसातून सरासरी तीन तासांपेक्षा जास्त वेळ असतात, असे आढळले आहे. सोशल मीडिया मुळात सगळं काही चढवून, वाढवून किंवा ग्लॅमरस करून दाखवण्याची जागा आहे. किंवा वास्तव आहे ते प्रदर्शित करण्यापेक्षा तीच गोष्ट अधिक आकर्षक आणि नाट्यमय करून सांगितली जाते.
उपलब्ध माहितीनुसार ‘फेसबुक’चे जगभर दोन अब्ज युजर्स आहेत. एखाद्या मोठ्या देशाच्या लोकसंख्येइतका हा ‘फेसबुक’ युजर्सचा समूह तासन्तास इंटरनेटवर अ‍ॅक्टिव्ह असतो. भारतातील तरु णांमध्ये सध्या फेसअ‍ॅपची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर असंख्य गोष्टी या तत्काळ व्हायरल होत असतात. सर्वसामान्यांपासून सेलीब्रिटीपर्यंत सर्वांनाच या अ‍ॅपने वेड लावले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने सर्व जण स्वत:ला वृद्ध बनवत आहेत. आतापर्यंत करोडो लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून आपण म्हातारपणी कसे दिसतो हे बघण्याचा प्रयत्न केला आहे. म्हातारपणात आपण कसे दिसू हे पाहण्याच्या उत्सुकतेनं सध्या सोशल मीडियावर या अ‍ॅपचा वापर केला जात आहे. या अ‍ॅपची क्रेझ इतकी वाढलीय की सोशल मीडियावर ‘फेस अ‍ॅप चॅलेंज हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला आहे. हे अ‍ॅप मोफत असल्याने अनेक जण ते ‘वापरून तर बघू’ म्हणत पाहताना दिसत आहेत. गंमत म्हणून मित्रमंडळींना पाठवण्यासाठी त्या अ‍ॅपच्या आधारे आपले हे फोटो काढले जातात, काहींच्या बाबतीत आपले वृद्धापकाळातील छायाचित्र पाहून त्याचा नकारात्मक परिणामही होतो.
हे अ‍ॅप नवीन नाही. अनेक दिवसांपासून हे अ‍ॅप उपलब्ध आहे . पण सध्या ते खूपच लोकप्रिय होत आहे. आपले छायाचित्र एडिट करण्यासाठी हे अ‍ॅप न्यूरल नेटवर्कचा वापर करते. न्यूरल नेटवर्क कृत्रिम बुद्धिमत्तेचाच एक प्रकार आहे. त्यामुळे फक्त म्हातारे लूकच नाही तर, यंग लूक, जेंडर चेंजसारखे प्रकार करता येतात. तुमचा चेहरा काही वर्षांनी कसा दिसेल याचा अंदाज हे अ‍ॅप लावते. त्यानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या, सुकलेले डोळे, चेहºयावरील केस, काही ठिकाणी डाग आणि इतर बदल केले जातात आणि काही वर्षांनंतरचा युजरचा म्हातारपणाचा फोटो तयार होतो. मात्र म्हातारपणाचा लूक बघणे तुम्हाला महागात पडू शकते. ते अ‍ॅप वापरण्यासाठी तुमच्याकडे सुरुवातीला चित्र वापरण्याची परवानगी मागितली जाते. तुम्ही ही परवानगी दिल्यानंतर ते तुमचे फोटो सहजतेने कुठेही वापरू शकते.

आपल्या फोटोचा वापर हा व्यावसायिक कारणासाठीही केला जाऊ शकतो. हे अ‍ॅप वापरण्यासाठी असलेल्या अटी या युजर्सच्या खासगी माहितींना धोका पोहोचवू शकतात. केवळ एक फोटो नाही, तर तुमच्या फोनवर उपलब्ध असणारे सर्वच फोटो या अ‍ॅपवर साठवले जातात. त्याचा नेमका कसा आणि कधी वापर होईल ते सांगता येत नाही आणि ते छायाचित्रे काढणाऱ्यांपैकी कुणाच्या अजिबात नियंत्रणातही नाही.
हे झाले अ‍ॅपबद्दल. आता आपण फेसबुककडे वळू. रोज सुमारे पन्नास लाख चित्रपटांएवढी माहिती फेसबुक रोज गोळा करत आहे. यातील काही माहिती नक्कीच वैयक्तिक व संवेदनक्षम असते. युजरचा हा डेटा जाहिरातदारांना, रिसर्च कंपन्यांना नेहमी विकला जातो. वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा वारंवार चोरीला जात असल्याने फेसबुकच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. फोनमध्ये कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल करताना त्यातल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. अ‍ॅपचे नियम आणि अटी वापरकर्त्याची खासगी माहिती वापरण्याविषयी असतात. त्यामुळे सगळ्या परवानग्या न वाचता देऊ नका.

(लेखक संगणक साक्षरता प्रसारक आहेत)
 

Web Title: Be careful before getting stuck in an app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.