कावळे असोत वा मधमाश्या, AI शोधतेय त्यांच्या ‘भाषे’चा अर्थ!
By Shrimant Mane | Published: October 14, 2023 07:11 AM2023-10-14T07:11:15+5:302023-10-14T07:13:19+5:30
कावळा हुशार असतो, हे आपल्याला माहीत आहे; पण खरे तर तो आपल्या समजुतीपेक्षा जास्तच हुश्शार आहे. कावळ्याची एक जमात तर हत्यारेही तयार करते!
श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर
पितृपक्षात पितरांचे किंवा श्राद्धावेळी मृत व्यक्तीचे प्रतीक म्हणून कावळाच का? तर कावळा हा प्राणी-पक्ष्यांमध्ये सर्वाधिक बुद्धिमान आहे. हत्तीसारखाच. लोककथेत सांगितले तसे, चोच आत जात नाही अशा निमुळत्या तोंडाच्या भांड्यातले पाणी त्यात दगडं टाकून वर आणतो म्हणूनच कावळा बुद्धिमान नव्हे. तो त्यापेक्षाही हुश्शार आहे.
प्रशांत महासागराच्या दक्षिण टोकावरच्या बेटांचा न्यू कॅलेडोनिया नावाचा समूह ही फ्रान्सची एक रमणीय वसाहत आहे. तिथे आढळणारा जंगली कावळा झाडाच्या फांदीपासून हत्यार बनवतो. परफेक्शनिस्ट आहे. मनासारखे हत्यार बनत नाही तोवर पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. बेचक्यात अडकलेले खाद्य मिळविण्यासाठी त्या हत्याराचा वापर करतो आणि काम झाले की ते व्यवस्थित ठेवूनही देतो. माणसांशिवाय अशी वस्तू बनविणारा तो एकमेव सजीव असावा.
ऑकलंड व हार्वर्ड विद्यापीठांनी त्यावर संशोधन केले तेव्हा आढळले की, हा न्यू कॅलेडोनियन कावळा हत्यार बनविण्याच्या कौशल्याचा इतका आनंद घेतो की त्यामुळे त्याचा मेंदू अधिक तल्लख होतो. त्याच्यासाठी ठेवलेल्या भेटवस्तूला तो अधिक तत्काळ प्रतिसाद देऊ लागतो. असे अनेक कावळे असतील. हवाई बेटांवरील अलाला नावाचा कावळा वीसेक वर्षांपूर्वी नामशेष झाला. तसे काही प्राण्यांच्या प्रजाती नष्टही झाल्या. आता ज्या उरल्या आहेत त्यांची भाषा समजून घेण्यासाठी, त्यांच्या कृतीचे अर्थ लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय तंत्रज्ञान वापरण्याविषयी मोठे संशोधन सुरू आहे. त्याचे प्राथमिक निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत.
भाषेबद्दल माणसांच्या अधिक जवळ असलेले चिंपांझी, डॉल्फीन, कुत्रा अशा प्राण्यांवर तर आधीपासूनच संशोधन सुरू आहे. माणसांची चिन्हांची भाषा किंवा खाणाखुणा समजणारी कोको नावाची मादी गोरिला १९७० मध्ये जगभर गाजली होती. कार्लटन विद्यापीठाचे शेन गेरो यांनी डोमिनिका समुद्रात देवमाशांच्या कळपांचा अगदी दोन वंशांचा अभ्यास केला. अगदी अलीकडे कळपापासून दूर गेलेला एक नर व्हेल परत आला तेव्हा त्याच्या स्वागताप्रीत्यर्थ कुटुंबातल्या इतरांनी केलेले आवाज त्यांनी टिपून घेतले. पण, या साऱ्यांपेक्षा बर्लिनमधील फ्राये विद्यापीठाचे टिम लँडग्राफ यांचे मधमाश्यांवरचे संशोधन भन्नाट व विस्मयकारक आहे. आता त्या संशोधनाला एआयची जोड मिळाली आहे. मधमाश्या एकमेकींशी आवाजाद्वारे तसेच शारीरिक हालचालींद्वारे संवाद साधतात. तो एकाचवेळी वैयक्तिक व सामूहिकही असतो. चला, निघा, थांबा, सावध, कामाला लागा, अशा सगळ्यांशी संबंधित त्यांची देहबोली ही भाषाच आहे. अनेक वर्षे संशोधनानंतर लँडग्राफ यांनी डीप लर्निंग व अल्गोरिदमचा वापर करून आता तसे हुबेहूब आवाज काढणारा, तसाच उडणारा रोबोबी नावाचा रोबोट तयार केला आहे. तो आता लाखो मधमाश्यांना आदेशही देऊ शकेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी प्रचंड प्रमाणात डेटा लागतो. जगभरातले प्राणी, पक्षी व वनस्पती निरीक्षक, अभ्यासक त्याचे संकलन करीत आहेत. Treat Everything As A Language या तत्त्वाने काम सुरू आहे. स्वस्त सेन्सर्स, अद्ययावत हायड्रोफोन्स, बायोलाॅगर्स, ड्रोन्स दिमतीला आहेतच.
कासव किंवा व्हेल माशाच्या पाठीवर ते बसवून माणसाला पोहाेचणे शक्य नाही अशा खोल समुद्रातील जीवसृष्टी टिपणे सोपे झाले आहे. प्रचंड प्रमाणात डेटा उपलब्ध होत आहे. माणूस व प्राण्यांच्या वर्तणुकीमधील गुंतागुंत जी ॲन्थ्रोफोमॉर्फिझम म्हणून ओळखली जाते ती बाजूला ठेवून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी जग सरसावले आहे. जीवसृष्टीच्या संवर्धनाला त्यातून बळ मिळेल. प्राणी-पक्ष्यांची भाषा समजणारी निळावंती मागच्या अनेक पिढ्यांनी पुस्तकात वाचली. आता ती एआयच्या रूपाने पुन्हा भेटीला येईल. अर्थ स्पेसीज प्रोजेक्ट राबविणारे अझा रस्कीन म्हणतात, ब्रह्मांडात पृथ्वीच सारे काही नाही, हे भान ज्यामुळे आले त्या टेलिस्कोपच्या शोधासारखा हा क्षण आहे. कदाचित माणसांपेक्षा अधिक प्रगत भाषा कुठला तरी प्राणी किंवा पक्षी बोलत असेल आणि त्यांच्याशी संवादही साधता येईल.
shrimant.mane@lokmat.com