‘तो’ असो वा ‘ती, निवड सर्वोत्तमाची! लिंगभेद पुसायचा विचार करणं सोपं नव्हे पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 07:57 AM2020-08-28T07:57:11+5:302020-08-28T07:58:39+5:30

जिथे शारीरीक सौंदर्य आणि अभिनयाची गुणवत्ता याचा जोडीने कस लागतो. अशा क्षेत्रातून स्त्री-पुरुष हा लिंगभेद पुसायचा विचार करणं सोपं नव्हे पण बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या आयोजकांनी त्याची सुरुवात तरी फार विचारपूर्वक केली आहे.

Be it ‘he’ or ‘she, the choice is the best! It is not easy to think of erasing gender, but ... | ‘तो’ असो वा ‘ती, निवड सर्वोत्तमाची! लिंगभेद पुसायचा विचार करणं सोपं नव्हे पण...

‘तो’ असो वा ‘ती, निवड सर्वोत्तमाची! लिंगभेद पुसायचा विचार करणं सोपं नव्हे पण...

googlenewsNext

सोनाली कुलकर्णी, ख्यातनाम अभिनेत्री

अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेला दायरा हा माझ्या कारकिर्दीतला एक महत्त्वाचा चित्रपट आहे. त्यात काम केलं, तेव्हा मी २१ वर्षाची होते. लहानशी आणि सिनेमात मुख्य भूमिकेत होते. निर्मल पांडे. उंच-धिप्पाड, मर्दानी शरीरयष्टीचे! या चित्रपटाची कथा वेगळी होती, माझ्या व्यक्तिरेखेला सतत पुरुषांकडून होणाऱ्या लैंगिक त्रासाची शिकार व्हावं लागतं. या चित्रपटात तृतीयपंथीयाची भूमिका करणारे निर्मल पांडे कथेच्या ओघात मला सांगतात, बाई म्हणून सतत असा त्रास सोसण्यापेक्षा तू पुरुषांप्रमाणे कपडे घालून वावर म्हणजे सुरक्षित राहशील. आणि माझ्या व्यक्तिरेखेचा हुलीयाचं बदलून जातो.

संपूर्ण सिनेमात निर्मल पांडे तृतीयपंथी म्हणून महिलेच्या वेशभूषेत साडी नेसून वावरत असतात तर मी स्त्री असून पुरुषांचे कपडे घालून असते. दायरा या चित्रपटाची अनेक स्तरावर प्रशंसा झाली. फ्रान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दायराला अनेक पुरस्कार तर मिळालेच पण आम्हाला अभिनयाचे पुरस्कारही मिळाले. तेव्हा बसलेला एक आश्चर्याचा धक्का मला अजून आठवतो. निर्मल पांडे यांना बेस्ट अँक्ट्रेस असा महिला गटातला, तर मला बेस्ट अँक्टर म्हणून पुरुष गटात पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाच्या कथाविषयाला एका वेगळ्याच स्तरावर न्याय देणारी ही निवड अत्यंत अनपेक्षित होती आणि म्हणून सुखावणारीही. दायरासाठी बेस्ट अँक्टर म्हणून पुरस्कार घेताना मनात कुठंतरी ही सरमिसळही झाली होती की, अभिनयाच्या पातळीवर लिंगभेदाचा विचार खरचं केला जावा का?

...तो न केला जाण्याचा एक विलक्षण अनुभव मी घेतला होता. तो आज आठवण्याचं कारण म्हणजे बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या आयोजकांनी नुकताच जाहीर केलेला एक महत्त्वाचा निर्णय. २०२१ पासून मुख्य भूमिका स्त्री-पुरुष आणि सहायक भूमिका स्त्री-पुरुष अशी वर्गवारी न करता सर्वोकृष्ट अभिनेत्याला, मग तो स्त्री असो पुरुष बेस्ट लीडिंग परफॉर्मन्स आणि सपोर्टिंग बेस्ट लीडिंग परफॉर्मन्स असे दोन पुरस्कार दिले जाणार आहेत. जगभरात चित्रपट आणि एकूणच विस्तारत्या मनोरंजन जगतासाठी ही एक नवी आणि स्वागत करावं अशी सुरुवात आहे असं मला वाटतं. जिथे शारीरीक सौंदर्य आणि अभिनयाची गुणवत्ता याचा जोडीने कस लागतो. अशा क्षेत्रातून स्त्री-पुरुष हा लिंगभेद पुसायचा विचार करणं सोपं नव्हे पण बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या आयोजकांनी त्याची सुरुवात तरी फार विचारपूर्वक केली आहे.

सिनेसृष्टीत अभिनेता-अभिनेत्री, गायक-गायिका हे लिंगभेदावार आधारित पुरस्कार वगळले तर बाकी सर्वच विभागात सर्वोत्तम निवडूनच पुरस्कार दिले जातात. दिग्दर्शन, कथा-संवाद, संगीत, संकलन, सिनेमोटोग्राफी साऊंड डिझायनिंग यासह अन्यही पुरस्कारासाठी त्या त्या क्षेत्रातील सर्वोत्तम व्यक्तीची निवड करतात. जर या विभागतल्या कर्तृत्वाचं मापन स्त्री आणि पुरुष असा भेद मानत नाही, तर ते अभिनयाच्या क्षेत्रातच का असावं? अर्थात यात अभिनेत्याचं थोडं नुकसान मात्र आहे. दोन पुरुष आणि दोन स्त्रियांना त्या त्या वर्षी(मुख्य आणि सहायक भूमिका) पुरस्कार मिळत. स्त्री पुरुष हा भेद पुसून टाकायचा ठरवल्यावर आता दोघांनाच पुरस्कार मिळेल. मग ते दोघे पुरुष असू शकतील, दोघी स्त्रिया किंवा स्त्री पुरुष! त्या त्या वर्षीच्या स्पर्धक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या सर्वोत्तम कलाकाराची या पुरस्कारासाठी निवड होईल.

बर्लिनहून आलेली बातमी वाचली आणि मला माझे पुण्यातले पुरुषोत्म करंडक नाट्यस्पर्धेचे दिवस आठवले. पुरुषोत्तम करंडक ही अत्यंत मानाची महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा, त्या स्पर्धेत अभिनयासाठी पाच उत्तेजनार्थ बक्षिसं, त्यानंतर स्त्री आणि पुरुष गटात दोन वेगळे पुरस्कार आणि त्याचाही कळस म्हणजे केशवराव दाते हा अभिनयासाठीचा सर्वोत्तम पुरस्कार दिला जातो. अतिशय सन्माननीय असा हा पुरस्कार त्या त्या वर्षी सर्वोत्तम अभिनय करणाऱ्या कुणालाही मिळू शकतो. तो पुरस्कार ज्याला/ जिला मिळाला तो त्या वर्षीचा सर्वोत्तम अभिनय. तो पुरस्कार मिळणं म्हणजे आपण अभिनयातला एक्का असल्याची पावती असचं मानलं जातं.

अर्थात त्या पुरस्कारासाठीची चुरस खूप असते आणि त्यासाठीचा कसही मोठा लागतो. मात्र या पुरस्कारामुळे मिळणारा सर्वोत्तमचा आनंद केवळ अतुलनीय असाच! बर्लिन महोत्सव आयोजकांनी घेतलेल्या ताज्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ही अशीच चुरस तयार होईल. सर्वोत्तम अभिनेता अगर सर्वोत्तम अभिनेत्रीच्या सन्मानाची स्वप्न पाहणाऱ्या कलाकारांना सर्वोत्तमाचा खराखुरा आणि निर्भेळ आनंद मिळू शकेल. आपल्या गुणवत्तेचं मापन आपण कोणत्या लिंगाचे आहोत यावर न होता निव्वळ, निखळ गुणवत्तेवर होणं हे फार महत्त्वाचं. अर्थात बर्लिनच्या चित्रपट महोत्सवातल्या पुरस्कारांमधून लिंगभेद हटवला गेल्याने बाकी समाजाला काय फरक पडणार, असा नकारात्मक सूर लावण्याआधी हे लक्षात घ्यायला हवं की आपल्या समाजातून लिंगभेद पूर्ण नष्ट करणं हा खूप लांबवरचा प्रवास आहे. जिथे जायचं आहे त्या ध्येयाशी पोहोचायला खूप काळ लागेल आणि खूप कष्टही पडतील, म्हणून तर या छोट्या पण विचारपूर्वक उचललेल्या पावलांचं महत्त्व अधिक!  

Web Title: Be it ‘he’ or ‘she, the choice is the best! It is not easy to think of erasing gender, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा