माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 07:44 AM2024-10-03T07:44:37+5:302024-10-03T07:44:44+5:30
नागझिरा प्रकल्पातील वाचलेला वाघ नव्या ‘राजा’ला आव्हान देईल, की क्षेत्र सोडून जाईल? माद्या ‘खोटे मिलन’ करून पिलांना वाचवू शकतील? - उत्तरार्ध
संजय करकरे, उपसंचालक, सृष्टी कन्झर्वेशन फाउंडेशन, नागपूर
नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या कुटुंबात आणखी एक वयात येऊ लागलेला नर वाघ आहे. T 4 वाघिणीचा हा दुसरा वाचलेला नर वाघ आता पुढच्या काळात, नव्यानं दाखल झालेल्या या वाघाला कसं सामोरे जातो, पराभूत होतो की, हे क्षेत्र सोडून अन्यत्र निघून जातो हे काळच सांगू शकेल. यासोबतच अन्य तीन माद्यांना असणारी पिलं साधारण वर्षभराची असल्यानं या नव्या नर वाघाच्या तावडीतून कशी वाचतात अथवा या तीन माद्या या शावकांचं कसं संरक्षण करतील, हा कुतूहलाचा विषय राहील.
मार्जारकुळात प्रामुख्याने नर स्वतःचे क्षेत्र तयार करतो. ज्या ठिकाणी मुबलक खाद्य आणि सुरक्षितता आहे असं क्षेत्र तो निवडतो. त्याचबरोबर त्याच्या क्षेत्रामधील माद्यांनाही आपल्या अधिपत्याखाली तो ठेवतो. नर वाघाचंं क्षेत्र ३०-४० चौरस किलोमीटरपासून १५० चौरस किलोमीटरपर्यंत असू शकते. या सर्व क्षेत्राला तो प्राणपणाने जपतो.
अन्य नर वाघ या क्षेत्रात येणार नाही आणि आपल्या माद्यांवर नियंत्रण मिळवणार नाही याची पुरेपूर काळजी हा नर घेतो. मात्र बरेचदा उतारवयाकडे झुकू लागलेल्या नरांना, ताज्या दमाच्या अथवा जबरदस्त ताकदीच्या तरुण नरांकडून आव्हान दिलं जातं आणि येथेच सत्तांतर घडतं.
सत्तांतर घडल्यानंतर बरेच वेळा माद्यांना मिलनास उत्सुक करण्यासाठी, त्यांची पिल्ले (शावक) या नव्या नर वाघाकडून मारली जातात. या पिल्लांना मारल्यावरच माद्या, मिलनासाठी प्रतिसाद देतात. त्यामुळे या कठीण काळाला माद्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा माद्या या नर वाघांशी ‘खोटे मिलन’ करून आपल्या पिल्लांना या नरांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. जंगलात नर वाघांची घनता अधिक असेल तर तेथील माद्यांना अशा कठीण प्रसंगांना वारंवार सामोरे जावे लागते.
ताडोबा, रणथंबोर व बांधवगडच्या व्याघ्र प्रकल्पात अनेक वेळा अशा घटना आणि सत्तांतर बघितले गेले आहे. निसर्ग नियमाचाच हा जणू एक भाग बनला आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात गेल्या काही वर्षांपासून वाघांची संख्या हा कायम चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. रानकुत्र्यांमुळे वाघांची संख्या कमी झाली का, वाघांचे खाद्य तेथे पुरेसे आहे का, यासोबतच येथील जंगलात वाघ फार काळ टिकत नाहीत याबाबत अनेक तर्क मांडले जातात.
या जंगलातील वाघांची संख्या कमी झाल्याचे बघूनच, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून गेल्या दोन वर्षांत तीन वाघिणींना या क्षेत्रात संवर्धन स्थलांतरणाच्या प्रक्रियेद्वारे सोडण्यात आले. यातील तीनपैकी दोन वाघिणी सध्या नागझिरा अभयारण्याच्या वेशीवर स्थिरावल्या आहेत. त्यातील एका वाघिणीला पिल्लं झाल्याचंही सांगितलं जातंय. सध्याची स्थिती बघता येथील जंगलात चार वाघिणींना पिल्लं आहेत.
पूर्वी या व्याघ्र प्रकल्पात वाघिणीला दोन आणि तीन पिलं झाल्याची नोंद आहे. आता मात्र या वाघिणींना तीन आणि चार पिलं झाली आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील या वाघाच्या बळकट जनुकांचा परिणाम या वाघिणींच्या वंशावळीची वृद्धी येथील जंगलात होण्यात झाला असेल असं म्हटलं जाऊ शकतं. मात्र चार पिल्लांना पुरेसं खाद्य उपलब्ध आहे का, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
जंगलात वाघ टिकायचे झाल्यास योग्य निवाऱ्याबरोबरच, चितळ व सांबर हे त्याचंं खाद्य पुरेसं मिळणे आवश्यक आहे. यासाठी या तृणभक्षी प्राण्यांना पुरेसं गवती कुरण आहे का, हेदेखील बघणं महत्त्वाचं ठरेल. म्हणजेच वाघाच्या खाद्याला योग्य पद्धतीने वाढवून, त्यांना संरक्षण देऊन पुढे नेलं तर या जंगलात नैसर्गिकरीत्या वाघांची संख्या वाढून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या संख्येला बळकटी येईल.
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ आहे. तो घडत राहणारच !
sanjay.karkare@gmail.com