गरीब ‘आयुष्यमान’ होवो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:49 AM2018-05-29T05:49:44+5:302018-05-29T05:49:44+5:30

आर्थिक दुर्बल घटकांवर माफक दरात उपचार करणारी आयुष्यमान योजना केंद्र सरकारने जाहीर केली़

Be poor 'life' | गरीब ‘आयुष्यमान’ होवो

गरीब ‘आयुष्यमान’ होवो

Next

आर्थिक दुर्बल घटकांवर माफक दरात उपचार करणारी आयुष्यमान योजना केंद्र सरकारने जाहीर केली़ या योजनेंतर्गत दुर्बल घटकांवर गंभीर शस्त्रक्रिया १२ ते १८ टक्क्यांनी कमी दरात होणार आहेत़ गरिबांसाठी ही योजना लाभदायी आहे़ मात्र याची अंमलबजावणी कशाप्रकारे होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे़ कारण राज्यघटनेत या देशातील प्रत्येक नागरिकाचे मूलभूत अधिकार अबाधित ठेवण्यात आले आहेत. पुरेसे अन्न मिळणे, मूलभूत शिक्षण, जगण्याचा अधिकार हे सर्वसामान्यांचे हित जपणारे अधिकार राज्यघटनेने बहाल केले आहेत़ त्याची अंमलबजावणी करण्याची नैतिक जबाबदारी सरकारची असते़ मात्र शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात पाच दशकांचा काळ जावा लागला़ त्यातही मोफत व सक्तीचे शिक्षण देताना सरकारने पुरेसा अभ्यास केला नाही़ आठवीपर्यंत नापास न करण्याची संकल्पना योग्य नसून त्यावर पुनर्विचारही सुरु झालेला आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टी हटवण्याचे धोरण दोन दशकांपूर्वी आखण्यात आले़ या योजनेची अंमलबजावणीही केवळ कागदावरच राहिली, या काळात झोपडपट्टी वाढली़ त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनत गेला़ ‘गरिबी हटाव’ योजनेअंतर्गत सरकारच्या अनेक योजना गरिबांपर्यंत पोहोचत नाहीत, हे वास्तव आहे़ त्यात भ्रष्टाचार होतो़ हे टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे बँक खाते उघडण्याचे सरकारने ठरवले़ ही योजनादेखील पुरेशी प्रभावी ठरली नाही़आज अनेक बँक खाती बंद आहेत़ कित्येक बँक खात्यांतून व्यवहार होत नाहीत़ आम्हाला गरिबांची काळजी आहे, असे प्रत्येक सरकार सांगते़ गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना आखल्या गेल्या़ मात्र त्यातून आजवर गरिबी कमी झाली नाही किंवा गरीबही होते तसेच आहेत. गरिबांना सवलतीच्या दरात किंवा मोफत उपचार देणे ही सरकारची मुलभूत जबाबदारी आहे़ अनेक देशांमध्ये गरिबांवर मोफत उपचार केले जातात, पण अशा योजना सरसकटपणे आपल्याकडे राबवणे तूर्तास तरी शक्य होईल असे दिसत नाही. दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्र एवढे महाग झालेले आहे, की आता दैनंदिन आजारावरील औषधेही परवडण्यासारखी राहिलेली नाहीत़ शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या उपकरणांचे दर वाढले आहेत़ त्यामुळे शस्त्रक्रिया महाग झाल्या आहेत़ अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नवीन योजना जाहीर केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न उपस्थित होतो़ तेव्हा एकंदरीत विचार करता गरिबांसाठी आखलेल्या या नवीन योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी एवढीच या निमित्ताने अपेक्षा़़़

Web Title: Be poor 'life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.