वचक असायला हवा

By admin | Published: March 26, 2016 03:27 AM2016-03-26T03:27:31+5:302016-03-26T03:27:31+5:30

एखाद्या व्याधीने गंभीर रूप धारण केल्यावर जागे होण्यापेक्षा त्याची लक्षणे दिसू लागल्यावरच जर योग्य उपचार केले तर दुर्घटना टळू शकतात. पण आपल्याकडे तसे होत नाही.

Be wary | वचक असायला हवा

वचक असायला हवा

Next

एखाद्या व्याधीने गंभीर रूप धारण केल्यावर जागे होण्यापेक्षा त्याची लक्षणे दिसू लागल्यावरच जर योग्य उपचार केले तर दुर्घटना टळू शकतात. पण आपल्याकडे तसे होत नाही. झालेच तर त्यासाठी कोणीतरी त्रयस्थ व्यक्तीकडून कान टोचण्याचे निमित्त तरी लागते. रस्ता अपघाताच्या बाबतीतही उपरोक्त उदाहरण तंतोतंत लागू होते. सध्याच्या काळात प्रत्येक नागरिकाला सतावणाऱ्या ज्या काही गंभीर समस्या आहेत, त्यात अपघातांचे वाढते प्रमाण याचाही अंतर्भाव होतोच. पूर्वी असा समज होता की, अपघात हे केवळ नशापान केल्यामुळेच होतात. परंतु हल्ली तसे राहिलेले नाही. बऱ्याचदा या कारणाने अपघात होतातही पण सर्वच ठिकाणी ते कारण लागू होत नाही. वाहन चालविताना अतिघाई, निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती ही कारणे जशी जबाबदार आहेत तसाच भान हरवून बसलेल्या तरुणाईचा धिंगाणा आणि वाहनांच्या साहाय्याने भररस्त्यावर केली जाणारी मस्तीही तेवढीच कारणीभूत असते. काही मुले जन्मदात्याच्या पैशावर मौजमस्ती करण्यासाठी बाजारातील अत्याधुनिक मोटारसायकली खरेदी करतात आणि महाविद्यालयाचा परिसर असो की शहरातील मुख्य रस्ते असो त्याठिकाणी त्यांच्या नानाविध कसरती धूम स्टाईलने सुरूच असतात. त्यावेळी अल्पवयामुळे वाहन चालविण्याचा परवाना आपल्या खिशात नसतानाचे ठाऊक असतानाही ते भररस्त्यावर सुसाट वेगाने धावतात, कोणाच्या तरी अंगावर जाऊन धडकतात; पण त्याचे सोयरसूतक त्यांनाही नसते आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनाही नसते. कालपरवा अंबाझरी पोलिसांच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाच्या हातून अपघात घडला, तेव्हा शासनाने तीन मुद्द्यांवर पंधरा दिवसाच्या आत अहवाल देण्याचे निर्देश न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला द्यावे लागले. ‘५० सीसी’च्या गाड्या चालवायला हव्या व त्यांच्या परवान्यावर तशी नोंद करायला हवी. आतापर्यंत झालेल्या अपघातांसाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहेत आणि मुलामुलींच्या दृष्टीने सोयीच्या ठरतील अशा पद्धतीने शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गाच्या वेळा ठरविता येऊ शकतात काय, असे हे तीन मुद्दे आहेत. याचा अर्थ राज्यात जे अपघात होत आहेत व दिवसेंदिवस त्यांच्या प्रमाणात वाढ होत असतानाही त्यावर अंकुश ठेवण्याकामी शासनाची वाहतूक नियंत्रण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचाही अर्थ यातून स्पष्ट होतो. आता तरी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दिशाहीन झालेल्या गलबताला किनाऱ्यावर सहीसलामत पोहोचण्यासाठी जशी होकायंत्राची गरज भासते, तशीच भूमिका कठोरपणे का होईना न्यायव्यवस्थेला बजवावी लागत आहे. कोणत्या का मार्गाने होईना रस्ते अपघातमुक्त होण्यासाठी किंवा समाजहिंताच्या अन्य बाबींसाठी न्यायसंस्थेचा असा वचक असायलाच हवा.

Web Title: Be wary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.