World Environment Day: जैवविविधतेचं सौंदर्य टिकायलाच हवं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:37 AM2020-06-05T05:37:57+5:302020-06-05T05:38:53+5:30

पृथ्वीतलावरील एकूण जैवविविधतेपैकी २० टक्केच जैवविविधता आजअखेर शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासलेली आहे. म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञान युगातही पृृथ्वीवरील ८० टक्के जैवविविधता मानवास अपरिचित आहे. सजीवांच्या १८ लाख प्रजाती अभ्यासल्या गेल्या.

The beauty of biodiversity must be maintained | World Environment Day: जैवविविधतेचं सौंदर्य टिकायलाच हवं

World Environment Day: जैवविविधतेचं सौंदर्य टिकायलाच हवं

Next

डॉ. मधुकर बाचूळकर
जैवविविधतेचे संशोधक
निसर्गातील सजीव सृष्टीत असणारे वैविध्य म्हणजे जैवविविधता. कोट्यवधी वर्षांनंतर पृथ्वीतलावर सजीव सृष्टी निर्माण झाली व उत्क्रांती प्रक्रियेतून अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्म जीव तयार झाले. सजीवांच्या असंख्य जाती, प्रजाती निर्माण होऊन जैवविविधता समृद्ध झाली. जैवविविधता पृथ्वीतलावर सर्वत्र समप्रमाणात विभागलेली नाही. त्याचे सर्वाधिक प्रमाण उष्ण कटिबंधीय प्रदेशात असून, तेथील वर्षावने जैवविविधतेने समृद्ध आहेत. ती पृथ्वीवरील फक्त सात टक्के जमिनीवर पसरलेली असून, सुमारे ६५ टक्के जैवविविधता येथे आढळते.


पृथ्वीतलावरील एकूण जैवविविधतेपैकी २० टक्केच जैवविविधता आजअखेर शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासलेली आहे. म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञान युगातही पृृथ्वीवरील ८० टक्के जैवविविधता मानवास अपरिचित आहे. सजीवांच्या १८ लाख प्रजाती अभ्यासल्या गेल्या. त्यांपैकी ११ लाख प्रजाती प्राण्यांच्या, चार लाख वनस्पतींच्या, तर उर्वरित प्रजाती सूक्ष्म जिवांच्या आहेत. १७ देश जैवविविधतेने अत्यंत समृद्ध असून, त्यांतील बहुतांश उष्ण कटिबंधातील आहेत. या देशांना ‘जागतिक महाजैवविविधता देश’ असे संबोधले जाते. त्यात भारताचा समावेश आहे. जागतिक स्तरावर भारत हा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविधतेत सहावा, पक्ष्यांच्या विविधतेत सातवा, उभयचर व सस्तन प्राण्यांच्या संख्येत आठवा असून, सपुष्प वनस्पतींच्या विविधतेत बाराव्या स्थानावर आहे. ही आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
भारतात हवामान व भौगोलिक रचनेत मोठी विविधता असल्यानेच विपुल जैवविविधता दिसून येते. येथे प्राण्यांच्या ८१ हजार, तर वनस्पतींच्या ४८ हजार प्रजाती नोंदविल्या आहेत. सस्तन प्राण्यांच्या ३७२ प्रजाती, पक्ष्यांच्या १२२८, सरपटणाºया प्राण्यांच्या ४२८, उभयचर प्राण्यांच्या २१०, तर माशांच्या २५४६ प्रजाती आढळतात. किटकांच्या ५० हजार, तर इतर अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या सुमारे २६ हजार प्रजाती आहेत. अपुष्प वनस्पतींच्या ३०,५००, तर सपुष्प वनस्पतींच्या १७,५०० प्रजाती नोंदविल्या आहेत. भारतात सर्र्वांत जास्त जैवविविधता हिमालय भूप्रदेश व पश्चिम घाट परिसरातील वनक्षेत्रात आढळते. हे भूप्रदेश जागतिक अतिसंवेदनशील असून, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाचे भूप्रदेश म्हणून ओळखले जातात.

भारतात अस्तित्वात असणाºया एकूण प्रजातींपैकी ६३ टक्के प्रजाती हिमालयात आढळतात. दख्खनचे पठार व पश्चिम किनारपट्टीत पसरलेली पर्वतरांग म्हणजे पश्चिम घाट. एकूण सहा राज्यांत पश्चिम घाट पसरलेला असून, यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.
जंगलवनांत व सभोवताली असणारी जैवविविधता मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त मानली जाते. कच्चा माल व वनौषधी जंगलवनांतून गोळा केल्या जातात. तसेच पिकांचे व पाळीव जनावरांचे जंगली वाणही येथेच आढळतात. पर्यावरण संतुलनाचे कार्य, तसेच प्राणवायू व गोड्या पाण्याची उपलब्धता वनांकडून म्हणजेच पर्यायाने जैवविविधतेकडून पुरविली जाते. यामुळे जैवविविधतेचेही संरक्षण-संवर्धन करणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे.


जैवविविधता व वन्यजिवांच्या संरक्षण-संवर्धनासाठी शासनाकडून अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने तसेच संरक्षित राखीव वनांची निर्मिती केली आहे. वाघ, सिंह, हत्ती, बिबटे, पक्षी यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी संरक्षित केंद्रे तयार केली आहेत; पण दुसºया बाजूस शेती व रस्ते विकास, शहरीकरण व औद्योगिकीकरणासारखे विकास प्रकल्प अनियंत्रितपणे राबविले जास्त असल्याने वनांच्या ºहासाचा वेग प्रचंड वाढलाय. भारतात दरवर्षी १४ लाख हेक्टरवरील जंगलतोड होते. खासगी वने नष्ट झाली आहेत. देशात व राज्यात फक्त २० टक्के वनक्षेत्र शिल्लक आहे. वन्यजिवांची चोरटी शिकार व तस्करी वाढली आहे. या कारणांमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे.
चित्ता भारतातून नामशेष झाला असून गिधाडे पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. माळढोक पक्षी महाराष्ट्रातून जवळपास नामशेष झाला आहे. वाघ, सिंह, हत्ती हे वन्यप्राणी अतिसंकटग्रस्त बनले आहेत. भारतात दरवर्षी ३० हत्ती व ५० वाघांची चोरटी शिकार होते. २०१८ मध्ये भारतात १०२ वाघ, ५७ हत्ती व ४७३ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज भारतात सपुष्प वनस्पतींच्या १५०० प्रजाती व १२० वनौषधी संकटग्रस्त म्हणून जाहीर केल्या आहेत. भारतातील सस्तन प्राण्यांच्या ९० प्रजाती, पक्ष्यांंच्या ७५, सरपटणाºया प्राण्यांच्या २५, उभयचरांच्या २५ व माशांच्या ३९ प्रजाती संकटग्रस्त असून, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलवनांवरील मानवी हस्तक्षेप असाच सुरू राहिल्यास पुढील ३० वर्षांत भारतातील ४८ ते ५० टक्के जैवविविधता नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.


शहरे व गावांच्या परिसरात प्रामुख्याने निलगिरी, आॅस्ट्रेलियात बाभूळ, लिरिसिडीया, सुबाभूळ, सुरू, रेन ट्री, गुलमोहोेर यांसारखे विदेशी वृक्षच दिसून येतात. यामुळे स्थानिक जैवविविधता विस्कळीत झाली आहे. ‘रानमोडी’ या विदेशी तणाचा वनक्षेत्रात शिरकाव झाल्याने तसेच जंगलांचा विनाश व रस्ते विकास प्रकल्पांमधून होणारी वृक्षतोड यांमुळे वनस्पती विविधताही धोक्यात आली आहे.
वाढते प्रदूषण व वनांचा विनाश यामुळे जागतिक तापमानवाढ व बदलते हवामान यांचे गंभीर संकट उभे आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ विचारसरणी आत्मसात करावी लागेल. जंगलवनांचा, जैवविविधतेचा ºहास थांबवावा लागेल, तसेच निसर्ग-पर्यावरण व जैवविविधता यांचे अतोनात नुकसान करणाºया विकास प्रकल्पांविषयी गांभीर्याने विचार करावा लागेल, अन्यथा आपलाच विनाश अटळ आहे, हे लक्षात घ्यावे.

Web Title: The beauty of biodiversity must be maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.